RCB चॅम्पियन बनल्यानंतर विराट कोहलीचे मोठे विधान; म्हणाला, 'या संघात मला प्रत्येक वेळी...'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
विराट कोहली
विराट कोहली

 

वर्षानुवर्षे चाहत्यांच्या आणि संघाच्या अपेक्षांचे ओझे आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनल्यानंतर अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. आरसीबीच्या सध्याच्या संघात एकापेक्षा एक सरस मॅच-विनर खेळाडू असल्याने, प्रत्येक वेळी मीच मैदानात उतरून सामना जिंकवून द्यावा, अशी अपेक्षा आता हा संघ माझ्याकडून ठेवत नाही, अशी प्रांजळ कबुली विराटने दिली आहे.

आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर विराटने नाबाद ७५ धावांची खेळी करत संघाला गुजरात टायटन्सवर ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

आमच्याकडे मॅच-विनर्सची फौज

विजेतेपदानंतर अधिकृत प्रसारकांशी बोलताना विराट कोहली म्हणाला, "आम्हाला या सुवर्णकाळासाठी खूप मोठी वाट पाहावी लागली आहे. पण आता आमच्याकडे अशा खेळाडूंचा गट आहे, ज्यांच्यासोबत मैदानात उतरताना तुम्हाला असे वाटत नाही की प्रत्येक वेळी तुम्हीच संघाला सावरून धरले पाहिजे. हे सर्व खेळाडू तुमच्या पाठीशी आणि आजूबाजूला खंबीरपणे उभे आहेत, जे स्वतःच्या दमावर सामने जिंकवून देऊ शकतात. आमच्या संघात अनेक खेळाडूंनी या हंगामात 'मॅन ऑफ द मॅच'चे पुरस्कार जिंकले आहेत, यावरूनच आमची ताकद स्पष्ट होते."

कोहलीने पुढे आरसीबीच्या गोलंदाजीचे कौतुक करताना जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी आणि कृणाल पंड्या यांच्या कामगिरीचा उल्लेख केला. तसेच रसिक सलाम दार याने या हंगामात अप्रतिम गोलंदाजी केल्याचे त्याने आवर्जून सांगितले.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा दडपण कमी होते

"या संघाकडे उत्तम समतोल आणि ताकद आहे. सर्वच फलंदाजांनी आपापल्या परीने योगदान दिले आहे. आम्ही लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिलो, त्यामागे एक ठोस कारण होते. आम्ही मुलांशी फक्त एकच गोष्ट बोललो होतो की, जर आम्ही आमच्या रणनीतीनुसार खेळलो, तर आम्ही या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ आहोत," असे कोहलीने नमूद केले.

यंदाच्या अंतिम सामन्यातील दडपण गेल्या वर्षीपेक्षा खूप वेगळे आणि कमी होते, असे विराटने सांगितले. आरसीबीने साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावल्यानंतर मध्यंतरीच्या विश्रांतीनंतर संघाला काही पराभवांचा सामना करावा लागला होता. मात्र, रायपूरमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध मिळालेल्या अटीतटीच्या विजयाने संघाचा आत्मविश्वास पुन्हा उंचावला आणि तिथून संघाने मागे वळून पाहिले नाही, असा प्रवास विराटने यावेळी उलगडला.