CRICKET WORLDCUP: वनडे आणि टी-२० विश्वचषकाची रचना बदलली; नवीन फॉरमॅट कसा असेल?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 16 h ago
आयसीसीकडून क्रिकेट विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदल
आयसीसीकडून क्रिकेट विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदल

 

एडिनबर्ग

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी वनडे आणि टी-२० विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. एडिनबर्ग येथे पार पडलेल्या आयसीसी वार्षिक परिषदेत हे निर्णय घेण्यात आले असून, स्पर्धेत अधिक चुरस आणि स्पर्धात्मकता निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

२०२७ वनडे विश्वचषक आता 'थ्री-स्टेज' स्पर्धेत

दक्षिण आफ्रिकेत होणारा २०२७ चा वनडे विश्वचषक आता तीन टप्प्यांत खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत १४ संघ सहभागी होणार असून, गट फेरीपूर्वी 'सुपर सीरिज' राउंड खेळवला जाईल. यानंतर संघ दोन गटांत विभागले जातील. उपांत्य फेरीपूर्वी 'सुपर ७' टप्प्याचा समावेश करण्यात आला असून, त्यातील चार सर्वोत्तम संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. या बदलामुळे स्पर्धेतील प्रत्येक सामन्याला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे.

टी-२० विश्वचषक २०२८: 'सुपर १०' चा समावेश

२०२८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठीही आयसीसीने नियमांत बदल केले आहेत. गट फेरीनंतर आता 'सुपर ८' ऐवजी 'सुपर १०' टप्पा खेळवला जाईल. चार संघांचे पाच गट तयार केले जातील आणि प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ सुपर १० मध्ये प्रवेश करतील. तसेच, उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी एल्युमिनेटर सामन्यांचीही जोड देण्यात आली आहे, ज्यामुळे स्पर्धेची रंगत वाढणार आहे.

आयसीसीने ही घोषणा करताना सांगितले की, २०२६ च्या टी-२० विश्वचषकात उदयोन्मुख संघांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे प्रेरित होऊन आम्ही ही संख्या वाढवली आहे. हे नवीन फॉरमॅट आयसीसीच्या बोर्डाने मंजूर केले असून, नोव्हेंबरमधील बैठकीनंतर यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.