पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात हॉर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षेवर चर्चा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

 

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली आणि सागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर विशेष भर दिला.

पंतप्रधान मोदींनी या संभाषणाचे तपशील X वर शेअर केले आहेत. "आम्ही पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील सुरक्षा आणि नौकानयनाचे स्वातंत्र्य तातडीने पूर्ववत करण्याच्या गरजेवर आमचे एकमत झाले आहे," असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

"या प्रदेशात आणि त्यापलीकडे शांतता तसेच स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आमचे घनिष्ठ सहकार्य सुरूच राहील," असे सांगत त्यांनी भारत आणि फ्रान्समधील वाढत्या समन्वयावर प्रकाश टाकला.

हॉर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यापारी मार्गांपैकी एक आहे. जगातील तेल आणि वायू निर्यातीचा मोठा हिस्सा याच मार्गावरून वाहून नेला जातो. या अरुंद जलमार्गातील कोणत्याही अडथळ्याचा थेट परिणाम ऊर्जा बाजार, मालवाहतूक आणि विम्याच्या खर्चावर होतो. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या तणावामुळे चिंता वाढली असून अनेक देशांनी तणाव कमी करण्याची आणि व्यापारी जहाजांना अधिक संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील हा संवाद अशा वेळी झाला आहे जेव्हा या प्रदेशातील राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. गेल्या आठवड्यात सुमारे सहा आठवड्यांच्या युद्धानंतर दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला होता. आता अमेरिका आणि इराणमधील चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी लष्करी प्रमुख असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी शिष्टमंडळ तेहरानमध्ये पोहोचले आहे.

हा युद्धविराम २२ एप्रिल रोजी संपणार आहे. या संघर्षात आतापर्यंत पश्चिम आशियात ४,००० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला असून सर्वाधिक जीवितहानी इराण आणि लेबनॉनमध्ये झाली आहे. हा संघर्ष संपवण्यासाठी चर्चेची एक मर्यादित संधी सध्या निर्माण झाली आहे.

चर्चेची पहिली फेरी गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या मध्यस्थीने इस्लामाबादमध्ये झाली होती. मात्र तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यात कोणताही करार होऊ शकला नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध "संपण्याच्या अगदी जवळ" असल्याचे म्हटले आहे. तसेच चर्चेची दुसरी फेरी येत्या काही दिवसांत पुन्हा पाकिस्तानच्या राजधानीत होऊ शकते, असे संकेत दिले आहेत.