नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (३ मार्च २०२६) सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (MSME) संबोधित करताना भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी एक नवा आणि महत्त्वाचा मंत्र दिला आहे. "आपली दिशा स्पष्ट आहे आणि संकल्पही पक्का आहे: जास्त बांधा (Build More), जास्त उत्पादन करा (Produce More), जास्त जोडणी करा (Connect More) आणि आता जास्तीत जास्त निर्यात करा (Export More)," असे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले.
बजेट २०२६-२७ नंतरच्या 'आर्थिक विकास टिकवून ठेवणे आणि मजबूत करणे' या विषयावरील दुसऱ्या वेबिनारमध्ये पंतप्रधान बोलत होते. यावेळी त्यांनी उद्योजक, गुंतवणूकदार आणि राज्य सरकारांना बजेटमधील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
गुणवत्तेशी तडजोड नको
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात उत्पादनांच्या गुणवत्तेवर (Quality) विशेष भर दिला. ते म्हणाले, "आज संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासार्ह आणि लवचिक मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर म्हणून पाहत आहे. भारताने अनेक देशांशी मुक्त व्यापार करार (FTA) केले असून त्यामुळे आपल्यासाठी संधींची मोठी दारे उघडली आहेत. अशा परिस्थितीत आपण गुणवत्तेशी कधीही तडजोड करता कामा नये. आपल्या उत्पादनांचा दर्जा जागतिक स्तराचा असला पाहिजे."
संशोधन आणि तंत्रज्ञानावर भर
पंतप्रधानांनी उद्योगांना संशोधन आणि विकास (R&D) क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केले. "आता संशोधनाच्या बाबतीत शॉर्टकट घेण्याचे दिवस संपले आहेत. नवीन बाजारपेठांमध्ये स्थान मिळवण्यासाठी आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा आणि संशोधनाचा आधार घ्यावाच लागेल," असे त्यांनी नमूद केले. ज्या कंपन्या वेळेत 'क्लीन टेक्नॉलॉजी' (Clean Technology) मध्ये गुंतवणूक करतील, त्यांना भविष्यात जागतिक बाजारपेठेत मोठी संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
एमएसएमई आणि अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ
मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक्स, एमएसएमई आणि छोटी शहरे हे भारताच्या विकासाचे मुख्य आधारस्तंभ असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. सूक्ष्म आणि लघू उद्योग केवळ प्रगतीला वेग देत नाहीत, तर ते मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचेही काम करतात. बजेटमध्ये एमएसएमई क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे स्थानिक पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेबिनारमध्ये उद्योगांना गुंतवणूक वाढवण्यासाठी, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला (Sustainability) आपल्या व्यवसायाचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.