माणुसकीला कोणताही धर्म नसतो आणि खऱ्या सेवेला कोणतीही जात नसते, याचा प्रत्यय सांगलीत पुन्हा एकदा आला आहे. सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्टने जात, पात आणि धर्माच्या भिंती ओलांडून सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. जिल्ह्यातील गोरगरीब आणि कष्टकरी कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या संस्थेने ५० गरजू कुटुंबांना फळांसह हातगाड्यांचे मोफत वाटप केले आहे. परिसरातीलच आणखी दोन मुस्लिम संस्था रेहबर फाउंडेशन आणि सफा बैतुलमाल यांनीही या उपक्रमाला हातभार लावला. या तिन्ही मुस्लिम संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सूफियान पठाण म्हणाले की, "सांगली जिल्ह्यातील गरीब आणि गरजू कुटुंबांना मदत करण्याचे आमचे स्वप्न होते. याच हेतूने ५० गरजू कुटुंबांना आम्ही हातगाड्या व आवश्यक साहित्य देत आहोत. मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यापुढेही कोणताही धर्म किंवा जात न पाहता आपले सामाजिक कार्य अखंडपणे सुरूच ठेवेल."
सांगली शहरात पार पडलेल्या या कार्यक्रमात जेव्हा लाभार्थी कष्टकऱ्यांनी त्यांच्या हक्काच्या हातगाड्या आणि विक्रीसाठी लागणारी फळे स्वीकारली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसून येत होता. समदोळी येथील लाभार्थी सविता सुभाष जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "माझा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. मदनी ट्रस्टकडून मला हातगाडी, फळे आणि वजनकाटा देऊन मोठी मदत करण्यात आली. आमच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी दिलेल्या या मदतीबद्दल आम्ही त्यांचे मनापासून ऋणी आहोत."
सांगलीत मदतीचा 'मदनी' पॅटर्न! 🎖️ मुस्लीम संस्थेने सर्वधर्मीय कष्टकऱ्यांना दिले स्वावलंबनाचे साधन. लाभार्थी सविता सुभाष जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले...#MadaniTrust #AwazTheVoiceMarathi pic.twitter.com/wXRrOrZmYQ
— Awaz - The Voice मराठी (@awaz_marathi) January 27, 2026
इस्लामी मूल्यांतून माणुसकीची जोपासना
इस्लाम धर्मात जकात, सदका आणि खैरात या संकल्पना समाजातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आणि मानवी मूल्यांच्या जोपासनेसाठी आहेत. "जो माणूस इतरांच्या सर्वाधिक उपयोगी पडतो, तोच खऱ्या अर्थाने सर्वोत्तम असतो," हे पैगंबर मुहम्मद यांचे विचार केंद्रस्थानी ठेवून ही संस्था कार्यरत आहे. या कार्याचे कौतुक करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राठोड म्हणाले की, "या उपक्रमामुळे गरजू लोकांचे जगणे अधिक सुकर झाले आहे. अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येतो. मदनी चॅरिटेबल ट्रस्टसारख्या संस्थांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे."
२६ जानेवारी २०१८ रोजी स्थापन झालेली ही संस्था केवळ तात्पुरती मदत करण्यावर भर न देता, लोकांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी काम करते. हाफिज सद्दाम सय्यद, सूफियान पठाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेली ही चळवळ आज महिला, बालक आणि उपेक्षित घटकांसाठी आशेचा किरण ठरली आहे. जेव्हा एखादी मुस्लीम संस्था पुढाकार घेऊन सर्वधर्मीय गरजूंपर्यंत पोहोचते, तेव्हा समाजातील गैरसमज दूर होऊन आपुलकीचा एक नवा दुवा निर्माण होतो, हेच या उपक्रमाने सिद्ध केले आहे.