सोलापुरात 'इफ्तार संवाद'मधून सर्वधर्मीय महिलांचा एकजुटीचा निर्धार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
सोलापुरात झालेल्या 'इफ्तार संवाद' कार्यक्रमातील क्षण
सोलापुरात झालेल्या 'इफ्तार संवाद' कार्यक्रमातील क्षण

 

सरफराज अहमद, सोलापूर

भारतीय समाजाची बहुसांस्कृतिक वीण अधिक घट्ट करण्यासाठी सांस्कृतिक संवाद हाच एकमेव मार्ग आहे. विविध भाषा आणि धर्म जपणाऱ्या भारतीय समाजात एकजूट निर्माण करण्यासाठी संवादाची नितांत गरज आहे. याच भावनेतून सोलापुरात आयोजित 'इफ्तार संवाद' कार्यक्रमात सर्वधर्मीय महिलांनी विसंवादावर मात करत समाजाला अधिक उन्नत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पाहुण्यांऐवजी महिलांनाच मिळाले व्यासपीठ

'इफ्तार संवाद'चे हे दुसरे वर्ष होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही औपचारिक परंपरेला थारा न देता, कोणालाही प्रमुख पाहुणे किंवा वक्ता म्हणून बोलावले नव्हते. "कुणी पाहुणा नव्हता ना कुणी वक्ता, आलेला प्रत्येकजण मेहमान आणि मेजवान होता," अशी भावना यावेळी दिसून आली. उपस्थित महिलांना आपले अनुभव मोकळेपणाने मांडता यावेत, यासाठी खुले विचारपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते.

सुरुवातीला संस्थेचे प्रमुख आसिफ इकबाल आणि सावित्री संघटनेच्या सरिता मोकाशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर सुरू झाला तो संवादाचा प्रवास. वातावरणात इतकी मोकळीक होती की, आरल गव्हाणे या दहा वर्षांच्या चिमुरडीनेही कोणतेही दडपण न घेता आपले मनोगत व्यक्त केले.

"संवादातूनच समस्यांवर उपाय शोधता येतील"

यावेळी बोलताना डॉ. अस्मिता बालगांवकर म्हणाल्या, "महिला जेव्हा एकमेकांशी संवाद साधतील, तेव्हाच त्या स्वतःच्या समस्यांवर उपाय शोधू शकतील. त्यामुळे महिलांना सांस्कृतिक सण आणि उत्सवांच्या माध्यमातून एकत्रित येण्याची संधी दिली पाहिजे. ज्यातून त्या अधिक जवळ येतील आणि संघटित होतील." या उपक्रमाचे यश पाहून उपस्थित अनेक महिलांनी दिवाळी, ख्रिसमस अशा सणांवेळीही असेच कार्यक्रम आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हृदयस्पर्शी सोहळा आणि एकतेचे गाणे

या सोहळ्यात तब्बल ३०० सर्वधर्मीय महिला सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक महिलेचा एकमेकींशी परिचय होईल, अशी सुंदर रचना तिथे करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी एकमेकींचा हात हातात घेऊन "हम होंगे कामयाब" हे गीत गायले, तेव्हा उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. खऱ्या अर्थाने हा सोहळा हृदयस्पर्शी आणि संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित्रा देशमुख यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकला देशमुख, मोईज सिराज अहमद, अल्ताफ कुडले, वाईज सय्यद, आकिद शेख, कुदसिया मनियार, गौसिया याकूब अली, समिना मनियार, निकहत परवीन, शबाना काझी, रेहाना शेख, विकारुन्नीसा बंदुकवाले यांनी विशेष परिश्रम घेतले.

एशिअन सेंटर फॉर सोशल स्टडीज: सामाजिक परिवर्तनाचे केंद्र

या कार्यक्रमाचे आयोजन एशिअन सेंटर फॉर सोशल स्टडीज आणि सावित्री महिला संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. एशिअन सेंटर फॉर सोशल स्टडीज ही संस्था २०२३ मध्ये स्थापन करण्यात आली असून, सोलापूर शहराजवळ १०० एकर जमिनीत विस्तारलेल्या भव्य 'एशिअन मायनॉरिटी युनिव्हर्सिटी'ची ही मातृसंस्था आहे. सामाजिक परिवर्तनाचे ध्येय उराशी बाळगून ही संस्था अनुवाद, सांस्कृतिक उपक्रम, काव्य संमेलनं आणि विविध शैक्षणिक परिषदांच्या माध्यमातून सक्रियपणे कार्य करत आहे. याच संस्थेच्या माध्यमातून सावित्रीच्या लेकींनी हा संस्मरणीय सोहळा यशस्वी केला. 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter 



Latest News