जगातील सर्वात मोठ्या रामायण मंदिरासाठी मुस्लिम कुटुंबांने दिली जमीन दान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
इश्तियाक अहमद खान यांच्यासमवेत महावीर मंदिर ट्रस्टचे सचिव एस. कुणाल
इश्तियाक अहमद खान यांच्यासमवेत महावीर मंदिर ट्रस्टचे सचिव एस. कुणाल

 

बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात कंबोडियाच्या अंकोरवाट धर्तीवर जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर उभारले जात आहे. या मंदिरासाठी अनेक मुस्लिम कुटुंबांनी आपली जमीन दान केली आहे. मंदिराच्या उभारणीमुळे या भागात आर्थिक उलाढाल वाढेल, या आशेने स्थानिक मुस्लिम व्यापाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. हा पुढाकार सामाजिक सहकार्य आणि परस्पर विश्वासाचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जात आहे.

पूर्व चंपारणच्या कैथवलिया भागात हे मंदिर उभे राहत आहे. हे जगातील सर्वात उंच आणि मोठे रामायण मंदिर असेल. याची उंची २७० फूट असेल. लांबी १०८० फूट आणि रुंदी ५४० फूट असेल. यामध्ये १८ शिखरे आणि २२ मंदिरे असतील. आकाराच्या बाबतीत हे अयोध्येच्या राम मंदिरापेक्षाही मोठे असेल. पूर्व चंपारणमध्ये येत असलेल्या या 'विराट रामायण मंदिरा'त जगातील सर्वात मोठे शिवलिंग देखील असेल. यामुळे स्थानिक लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सध्या स्थानिक वृत्तवाहिन्या आणि यूट्यूब चॅनेलवर सर्वत्र याचीच चर्चा सुरू आहे.

याबाबत महावीर मंदिर ट्रस्टचे सचिव एस. कुणाल यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. मंदिराच्या उभारणीसाठी एका मुस्लिम कुटुंबाने कोट्यवधी रुपयांची जमीन दान केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी याला हिंदू वारशाचे एक जिवंत उदाहरण म्हटले आहे.

मंदिराच्या बांधकामादरम्यान, कंटेंट क्रिएटर अजय कुमार यांनी फेसबुकवर इश्तियाक अहमद खान यांच्याशी संवाद साधला. इश्तियाक खान हे चंपारणच्या कैथवलिया गावचे रहिवासी असून सध्या गुवाहाटी येथे राहतात. इश्तियाक अहमद खान आणि त्यांच्या कुटुंबाने २०२२ मध्ये मंदिर ट्रस्टला २३ एकर जमीन दान केली होती.

बांधकाम ठिकाणी शिवलिंग स्थापनेच्या कार्यक्रमात इश्तियाक खान उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले, "मी जिथे उभा आहे, ती जमीन आमची होती. ही जमीन उपलब्ध झाली नसती, तर मंदिराचा प्रकल्प शक्य झाला नसता." ही बाब लक्षात घेऊन त्यांनी आपली जमीन दान करण्याचा निर्णय घेतला.

कुणाल यांनी आपल्याकडे जमीन मागितली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. ट्रस्टला ही जमीन बाजारभावाने विकत घ्यायची होती. पण आपण जमीन विकणार नाही, असे खान यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी ही जमीन दान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या जमिनीची अंदाजित किंमत २.५ कोटी रुपये इतकी आहे.

केसरिया नोंदणी कार्यालयात जमिनीच्या दानाचे दस्तऐवज अधिकृतपणे नोंदवण्यात आले. खान कुटुंबाच्या या पुढाकारानंतर इतर गावकऱ्यांनीही सवलतीच्या दरात जमीन देण्यास सुरुवात केली.

पद्मश्री आचार्य किशोर कुणाल यांचे पुत्र आणि महावीर मंदिर ट्रस्टचे सचिव एस. कुणाल यांनी फेसबुकवर आपले विचार मांडले. विराट रामायण मंदिर हे सामायिक हिंदू वारशाचे जिवंत प्रतीक असल्याचे त्यांनी लिहिले. या मंदिरासाठी मुस्लिम कुटुंबाने केलेल्या जमिनीच्या दानामुळे समाजात सकारात्मक संदेश गेल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक रहिवाशांच्या मते, या जमिनीचा सध्याचा बाजारभाव खूप जास्त आहे. असे असूनही, दानशूरांनी कधीही पैशाचा विषय काढला नाही. धर्म कोणताही असो, प्रार्थनास्थळे शांतता आणि नैतिकतेचा संदेश देतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

या घटनेचे स्थानिक पातळीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे रहिवाशांचे मानणे आहे. वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांमध्ये परस्पर विश्वास वाढला आहे. हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समुदायांचे सदस्य मंदिराच्या उभारणीत सहकार्य करत आहेत आणि देणगीही देत आहेत.

सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. द्वेषाच्या राजकारणाऐवजी बंधुभावाचे हे एक जिवंत उदाहरण असल्याचे म्हटले जात आहे. अशा पुढाकारामुळे देशाची खरी ओळख मजबूत होते, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

धर्मापलीकडे जाऊन हेतू शुद्ध असल्यास समाजात एकता आणि सुसंवाद वाढवता येतो, ही घटना याचे ठोस उदाहरण आहे. बिहारमध्ये मंदिरासाठी ८ बिघा जमिनीचे दान द्वेषाच्या वातावरणात माणुसकीचा एक बुलंद आवाज म्हणून समोर आले आहे.

हे मंदिर सुमारे १००० कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे. हे काम ५ वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. बांधकामासाठी उत्तर प्रदेशातील गुलाबी चुनार दगडाचा वापर केला जाईल. राजस्थानी कोरीव काम आणि स्पॅनिश शैलीतील शिल्पकला यामुळे त्याची भव्यता आणखी वाढेल.

राम जानकी मार्गावरील ऐतिहासिक केसरिया बौद्ध स्तुपाजवळ हे मंदिर वसलेले आहे. भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे बांधकाम केले जात आहे. यात हेलिपॅड, एक मोठे प्रदर्शन क्षेत्र आणि रामायणातील प्रसंगांचे जिवंत चित्रण यांचाही समावेश असेल.