काश्मीरमधील निर्बंध अखेर शिथिल होणार! आंदोलने थंडावल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या निधनानंतर काश्मीर खोऱ्यात उसळलेली आंदोलने आता शांत होऊ लागली आहेत. गेल्या आठवडाभरापासून खबरदारीचा उपाय म्हणून लादलेले कडक सुरक्षा निर्बंध उद्यापासून (८ मार्च २०२६) टप्प्याटप्प्याने शिथिल केले जाणार आहेत. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यात अयातुल्ला खामेनी यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर काश्मीरमध्ये, विशेषतः शिया बहुल भागात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. खबरदारी म्हणून प्रशासनाने श्रीनगरसह अनेक जिल्ह्यांत जमावबंदी लागू केली होती आणि मोबाईल इंटरनेटचा वेगही मर्यादित केला होता. तसेच, खोऱ्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण मंत्री सकीना इटू यांनी दिले होते.

जनजीवन पुन्हा मार्गावर

गेल्या सहा-सात दिवसांपासून काश्मीर खोऱ्यातील बाजारपेठा, शाळा आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. श्रीनगरचा ऐतिहासिक लाल चौक आणि 'घंटा घर' परिसर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केला होता. मात्र, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी धार्मिक नेत्यांशी आणि नागरी संस्थांच्या प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेनंतर आंदोलने थंडावली आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले होते.

उद्यापासूनचे बदल

८ मार्चपासून खोऱ्यातील बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच, इंटरनेटवरील निर्बंधही टप्प्याटप्प्याने हटवले जातील. संवेदनशील भागात तैनात असलेले अतिरिक्त सुरक्षा दल आणि निमलष्करी दलाची तुकडी आता हळूहळू मागे घेतली जाईल. मात्र, तरीही पोलीस आणि प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच काश्मीरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आंदोलने पाहायला मिळाली. पण सुदैवाने, प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे कोणतीही मोठी अप्रिय घटना घडली नाही. आता जनजीवन पुन्हा रुळावर येत असल्याने स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.