आवाज द व्हॉईस : संवाद आणि सौहार्दावर भर देणारे हक्काचे व्यासपीठ

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

आतिर खान

वाचकांनो, मनःपूर्वक आभार!

भारताची सर्वात मोठी ताकद येथील धार्मिक परंपरा आणि त्यातून लोकांमध्ये रुजलेल्या मूल्यांमध्ये दडलेली आहे. भारतातील धर्म केवळ विश्वासाचा विषय राहिला नाही, तर तो एक नैतिक होकायंत्र ठरला आहे ज्याने सामाजिक आचरण, सांस्कृतिक सहअस्तित्व आणि मानवतेची सामायिक भावना घडवली आहे.

'आवाज द व्हॉईस'ने एक माध्यम म्हणून सातत्याने या विविधतेचा आणि भारताच्या खोलवर रुजलेल्या सर्वसमावेशकतेचा गौरव केला आहे. जागतिक आणि देशांतर्गत जातीय ध्रुवीकरणाच्या अत्यंत अशांत काळातही, 'आवाज'ने संवाद, समतोल आणि परस्पर आदराचे कथ्य मांडण्यासाठी आपली वचनबद्धता कायम ठेवली आहे. असे करताना, समाजात फूट पाडण्याऐवजी भारताच्या खऱ्या आत्म्याला अधिक बळकट करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

आमच्या टीम्सची आशय निर्मितीची (content creation) पद्धत नेहमीच वेगळी राहिली आहे. पत्रकारितेचा सामान्य कल हा मतभेद आणि नकारात्मकता हायलाइट करण्याचा असतो, पण आमचं काम त्याहून कठीण आहे; आम्हाला आमच्या दिवसाची सुरुवात अशा कल्पनांनी करावी लागते ज्या लोकांना विभागण्याऐवजी समाजात एकता निर्माण करतील.

आम्ही या गोष्टीची जाणीव ठेवतो की, अनादी काळापासून भारताने एका संमिश्र संस्कृतीचे पोषण केले आहे. जी हळूहळू अविभाज्य आणि चैतन्यपूर्ण ओळखीमध्ये विकसित झाली आहे. हिंदू, इस्लाम, शीख, बौद्ध, जैन आणि इतर धार्मिक परंपरा केवळ स्वतंत्रपणे अस्तित्वात राहिल्या नाहीत, तर त्यांनी स्वतःला भारतीयत्वाच्या व्यापक विणीमध्ये गुंफून घेतले आहे. दृष्टिकोनांमध्ये मतभेद अपरिहार्यपणे अस्तित्वात असले तरी, भारतीयांना एकत्र बांधून ठेवणारे सर्वोच्च मूल्य नेहमीच माणुसकी राहिले आहे.

याच संदर्भात, आजच्या काळातील धार्मिक मतभेद असूनही, हिंदू, मुस्लिम आणि इतर समुदायांमध्ये विधायक संवादासाठी पोषक वातावरण हळूहळू निर्माण होत आहे.

सर्वसमावेशकतेचा विचार बळकट करण्यासाठी सध्याच्या काळापेक्षा अधिक महत्त्वाचा क्षण दुसरा असूच शकत नाही. आज, विविध समुदायांचे सदस्य वाढत्या प्रमाणात आत्मपरीक्षण करत आहेत—त्यांच्यातील पूर्वग्रह ओळखून ते एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.

भारतीय इतिहासाच्या जवळपास एक हजार वर्षांच्या काळात, सर्व धर्मीयांच्या भावना पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी खूप कमी सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्न झाले. अलीकडच्या काळात मात्र, जातीय ध्रुवीकरणाची लाट ओसरताना दिसत आहे. भारतीय समुदायांनी त्यांच्यातील मतभेदांवर गेल्या दशकात जितकी उघडपणे चर्चा केली, तितकी यापूर्वी कधीही झाली नव्हती.

या बदलामध्ये सोशल मीडियाने एक गुंतागुंतीची भूमिका बजावली आहे. एका बाजूला, याने सरकारी पातळीवर चालवल्या जाणाऱ्या जातीय सलोख्याच्या त्या कथ्याला छेद दिला जे अनेकदा कृत्रिम वाटायचे आणि ज्यात खोली कमी होती. दुसऱ्या बाजूला, याने तीव्र ध्रुवीकरणालाही खतपाणी घातले. मात्र, आता हा ध्रुवीकरणाचा प्रभावही ओसरताना दिसत असून अधिक वास्तववादी संवादासाठी जागा निर्माण होत आहे.

भविष्याचा विचार करता, काही जण कृत्रिम बुद्धिमत्तेकडे (AI) एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून पाहतात—ज्याची प्रतिकात्मक तुलना कल्की किंवा मेहंदीशी केली जाते—जी खोलवर रुजलेल्या पूर्वग्रहांना आव्हान देऊन अधिक सुसंवाद आणि समानता आणण्यास सक्षम आहे. भारतात सुरू असलेली डिजिटल क्रांती आधीच या क्षमतेची झलक दाखवत आहे.

भारतीय हिंदू समुदायाने पूर्वीची स्थिती आणि त्यांची आकांक्षा यातील अंतर मोठ्या प्रमाणात भरून काढले असतानाच, शिक्षण, कौशल्य विकास आणि वाढत्या महत्त्वाकांक्षेमुळे भारतीय मुस्लिम आणि इतर समुदायांमध्येही लक्षणीय प्रगती दिसून आली आहे.

गेल्या दशकात महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत जागरूकता आणि कृतीमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. सातत्यपूर्ण सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणामुळे, भारताचे विविध समुदाय येत्या काही वर्षांत अधिक समृद्ध होण्यासाठी सज्ज झाले आहेत.

आमचा पाचवा वर्धापनदिन साजरा करत असताना, 'आवाज द व्हॉईस'च्या इंग्रजी, हिंदी, उर्दू, आसामी, मराठी, बांगला आणि अरबी भाषेतील सर्व टीम्स भारतीयांना एकमेकांच्या जवळ आणण्याच्या त्यांच्या मोहिमेसाठी ठामपणे वचनबद्ध आहेत. 'फाउंडेशन फॉर प्लुरॅलिस्टिक रिसर्च अँड एम्पॉवरमेंट'ने आम्हाला दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल आणि आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत.

२०२५ मधील आमची 'मुस्लिम चेंजमेकर्स' ही मालिका सामान्य भारतीय नागरिकांच्या पसंतीस उतरली आणि आम्हाला खात्री आहे की आमची आगामी मालिका 'परवाझ' (PARVAAZ), जी यशस्वी भारतीय मुस्लिम महिलांवर आधारित आहे, तिलाही असेच प्रेम मिळेल. आमची टीम या प्रकल्पाबाबत खूप उत्सुक आहे.

'आवाज द व्हॉईस'च्या वेबसाइटची वाचकसंख्या आणि व्हिडिओ व्ह्यूअरशिपमध्ये मोठी वाढ झाली आहे. आमच्या प्रेक्षकांनी दिलेल्या अखंड पाठिंब्याबद्दल आणि प्रेवाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.

आमच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त, आम्ही सर्वसमावेशकता, प्रामाणिकपणा आणि भारताच्या शाश्वत संकल्पनेवर आधारित उच्च दर्जाची पत्रकारिता करण्याची आमची शपथ पुन्हा एकदा ताजी करतो.

(लेखक 'आवाज द व्हॉईस'चे मुख्य संपादक आहेत.)