बंगळूरमधील ऐतिहासिक मिलाद संमेलनात पैगंबरांच्या मानवतावादी विचारांचा गौरव

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 h ago
पैगंबर मुहम्मद यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त आयोजित परिषदेला संबोधित करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या
पैगंबर मुहम्मद यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त आयोजित परिषदेला संबोधित करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

 

सबिहा फातिमा / बंगळूर

"प्रेषित मुहम्मद यांच्या शिकवणीने १५०० वर्षांपासून मानवी इतिहासात क्रांतिकारी बदल घडवले आहेत," असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. विनोबा भावे यांचे प्रसिद्ध वाक्य उद्धृत करत, की 'प्रेषित मुहम्मद हे शांतिदूत होते', मुख्यमंत्री म्हणाले की, इस्लाम हा एक शांतताप्रिय धर्म आहे.

प्रेषित मुहम्मद यांचे जीवन आणि संदेश यांची तुलना १२ व्या शतकातील तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक बसवण्णा यांच्या समानता आणि शांततेच्या शिकवणीशी करताना मुख्यमंत्री म्हणाले, "सहिष्णुतेमुळे मानवी विकास अधिक मजबूत होतो आणि हेच आपल्या संविधानातही समाविष्ट आहे."

"प्रेषित मुहम्मद यांनी शांती, करुणा आणि सलोख्याचा उपदेश केला, जसे बसवण्णा यांनी समानतेसाठी काम केले. जेव्हा सहिष्णुता वाढते, तेव्हाच मानवता वाढते. आपण संविधानाच्या भावनेचा आदर करत, एकतेने राहिले पाहिजे," असे ते म्हणाले.

याप्रसंगी, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले की, "प्रेषितांनी सर्व समाजांमध्ये समानता निर्माण केली आणि ते दीनदुबळ्या व असहाय्य लोकांच्या पाठीशी उभे राहिले."

"प्रत्येक धर्म शांती शिकवतो. प्रत्येक प्रार्थना एकाच देवाकडे निर्देश करते. कोणताही धर्म दुसऱ्याला दुःख देण्यास सांगत नाही. प्रेषितांच्या शिकवणीप्रमाणे, या देशात सलोखा टिकवून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. मुस्लिमांनी स्वतःला अल्पसंख्याक समजू नये - तुम्ही डॉक्टर, व्यावसायिक आणि नेते आहात. आपण सर्वांनी मिळून या राष्ट्राच्या एकता आणि अखंडतेसाठी काम केले पाहिजे," असे शिवकुमार म्हणाले.

हे दोन्ही नेते 'जॉइंट मिलाद कमिटी'च्या बॅनरखाली आयोजित केलेल्या '१५०० व्या आंतरराष्ट्रीय मिलाद-उन-नबी संमेलन २०२५' मध्ये बोलत होते. ५ सप्टेंबर रोजी बंगळूरच्या पॅलेस मैदानावर झालेल्या या ऐतिहासिक, दिवसभराच्या कार्यक्रमात, गुलबर्गा, रायचूर आणि हुबळीसह संपूर्ण कर्नाटकातून हजारो लोक प्रेषित मुहम्मद यांची १५०० वी जयंती साजरी करण्यासाठी जमले होते.

या संमेलनात अनेक प्रमुख नेते आणि विद्वानांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री, त्यांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, भारतातील अनेक इस्लामिक विद्वानही या परिषदेत सहभागी झाले होते. त्यापैकी काही प्रमुख नावे म्हणजे: प्रा. डॉ. मुफ्ती मुहम्मद सज्जाद आलम (कोलकाता), मौलाना तौसीफ रझा (बरेली), मुफ्ती फैज रझा खान (बरेली), हजरत अल्लामा पीर सय्यद मोहम्मद खासिम अश्रफ बाबा आणि केरळचे विद्वान इब्राहिम खलील थंगल.

याप्रसंगी बोलताना मुफ्ती सज्जाद आलम यांनी प्रेक्षकांना आठवण करून दिली की, मस्जिदे-नबवीमध्ये एक गट उपासना करत असे, तर दुसरा गट ज्ञान घेत असे. ते म्हणाले, "आजच्या संकटांवर उपाय 'सीरत'मध्ये (प्रेषितांचे जीवन चरित्र) आहे. मानवतेच्या आव्हानांची उत्तरे प्रेषितांच्या जीवनाचा अभ्यास करूनच मिळतील. इस्लाम शिकवतो की ज्ञान, करुणा आणि शांती हातात हात घालून चालले पाहिजेत."

इब्राहिम खलील थंगल (केरळ) यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सांप्रदायिक सलोख्याचे एक आदर्श मॉडेल म्हटले.

सय्यद मोहम्मद खासिम अश्रफ बाबा म्हणाले, "प्रेषितांनी पडलेल्यांना उचलले, तुटलेल्यांना जोडले, निर्माता आणि निर्मिती यांच्यातील नाते पुन्हा स्थापित केले आणि मानवतेला जगण्याची कला शिकवली. संपत्ती आणि सत्तेला तोपर्यंत काहीच अर्थ नाही, जोपर्यंत ती इतरांच्या कामी येत नाही. इस्लाम हा शांतीचा धर्म आहे."

डॉ. अब्दुल हकीम अझहरी यांनी आठवण करून दिली की, प्रेषितांच्या अतुलनीय चारित्र्यामुळे इस्लाम आजही अनुयायांना आकर्षित करत आहे. ते म्हणाले, "जे त्यांना मारायला आले होते, तेच त्यांचे प्रशंसक बनले. ही त्यांच्या करुणा आणि शांतीची ताकद आहे."

जामा मशिदीचे इमाम, मौलाना अब्दुल कादिर यांनी 'नात ख्वां' (नात पठण करणारे) यांचा सन्मान अधोरेखित केला आणि म्हटले, "अल्लाहने प्रेषितांना सर्वोच्च दर्जा दिला आणि त्यांची प्रशंसा करणाऱ्यांनाही सन्मान दिला. प्रत्येक शेरमध्ये प्रेम, करुणा आणि शांतीचा संदेश आहे."

या परिषदेत मुहम्मद मोइनुद्दीन, मुहम्मद जुनैद अश्रफी कलकत्तवी आणि मुहम्मद बाकर यांनी भावपूर्ण नात सादर केली. याप्रसंगी एसवायएसचे नेते बशीर सिद्दीकी आणि नूरानी यांनी रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ केला.

१५००व्या आंतरराष्ट्रीय मिलाद-उन-नबी संमेलनाचे अध्यक्षस्थान अल-हाज अमीर जान कादरी यांनी भूषवले, तर सूत्रसंचालन मौलाना झुल्फिकार नूरी आणि मौलाना एन.के.एम. शफी सादी यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप शांती, सलोखा आणि प्रेषितांची शिकवण दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याच्या संकल्पासह प्रार्थनेने झाला.