लाल चौकात दिवाळी : श्रीनगरमध्ये दिसले ऐक्याचे नवे रंग

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

एकेकाळी आंदोलने आणि दगडफेकीसाठी ओळखला जाणारा श्रीनगरचा प्रसिद्ध लाल चौक (Lal Chowk) आता शांतता आणि एकतेचे प्रतीक बनत आहे. दिवाळीनिमित्त रविवारी या ऐतिहासिक ठिकाणी दिव्यांची भव्य आरास करण्यात आली होती आणि स्थानिक मुस्लिम, हिंदू बांधव तसेच पर्यटकांनी एकत्र येऊन दिव्यांचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. कलम ३७० हटवल्यानंतर खोऱ्यात परतलेल्या शांततेचे आणि सलोख्याचे हे दृश्य होते.

लाल चौकातील प्रसिद्ध 'घंटाघर' दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्थानिक लोकांसोबतच देशभरातून आलेले पर्यटकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी पणत्या पेटवून आणि एकमेकांना मिठाई वाटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाने केले होते. काश्मीर खोऱ्यात शांतता आणि सामान्य जीवन परत आल्याचा संदेश यातून देण्यात आला. लाल चौकात दिवाळी साजरी होणे, ही येथील बदलत्या परिस्थितीचे आणि लोकांच्या बदलत्या मानसिकतेचे द्योतक मानले जात आहे.

"लाल चौकात असा दिवाळीचा उत्सव पाहणे, हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. काश्मीर खरोखरच बदलत आहे आणि येथील लोक शांततेने एकत्र राहत आहेत, याचा आनंद आहे," अशी भावना एका पर्यटकाने व्यक्त केली. या उत्सवाने देशातील विविधतेतील एकतेचे सुंदर दर्शन घडवले.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter