'JAI' मंत्राने भारतीय लष्कर होणार अधिक सक्षम, 'सदर्न कमांड' करणार नेतृत्व!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ

 

"जॉइंटनेस (एकत्रित कार्य), आत्मनिर्भरता आणि इनोव्हेशन (नवकल्पना)" हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला 'JAI' मंत्र भारताच्या भविष्यातील संरक्षण सज्जतेचा आधारस्तंभ ठरेल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. पंतप्रधानांच्या या दृष्टीकोनाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नेतृत्वाखालील 'सदर्न कमांड' (Southern Command) आघाडीवर आहे.

'सदर्न कमांड'ने नेहमीच तिन्ही सैन्यदलांमध्ये (लष्कर, नौदल, हवाई दल) समन्वय साधून एकत्रित कार्याचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले आहे. आता ते 'आत्मनिर्भर भारत' आणि नवकल्पनांवर आधारित बदलांसाठीही कटिबद्ध आहेत.

लवकरच भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाच्या समन्वयाने होणारा त्रिवेणी सेवा सराव "एक्सरसाइज त्रिशूल" (Ex Trishul), हा 'JAI' रणनीतीचा प्रत्यक्ष आविष्कार असेल. या सरावात 'सदर्न कमांड'चे सैनिक सक्रियपणे सहभागी होतील. विविध आव्हानात्मक प्रदेशांमध्ये एकत्रित मोहिमांची चाचणी घेतली जाईल. यामध्ये खाडी आणि वाळवंटी भागातील आक्रमक कारवाया, सौराष्ट्र किनारपट्टीवरील उभयचर (Amphibious) ऑपरेशन्स आणि गुप्तचर, पाळत ठेवणे, टेहळणी (ISR), इलेक्ट्रॉनिक युद्ध (EW) आणि सायबर क्षमतांचा समावेश असलेल्या एकत्रित मल्टी-डोमेन ऑपरेशन्सचा समावेश असेल.

या सरावात स्वदेशी प्रणालींचा प्रभावी वापर, आत्मनिर्भरतेचा अवलंब आणि भविष्यातील युद्धांच्या बदलत्या स्वरूपाला अनुसरून डावपेच आणि कार्यपद्धती सुधारण्यावरही भर दिला जाईल.

संपूर्ण देश सणासुदीच्या आनंदात असताना, 'सदर्न कमांड'चे सैनिक ऑपरेशनल भागात तैनात आहेत आणि आगामी त्रिवेणी सेवा सराव "एक्सरसाइज त्रिशूल" साठी कठोर प्रशिक्षण घेत आहेत. त्यांची निष्ठा आणि व्यावसायिकता भारतीय लष्कराच्या "सदैव वचनबद्ध, सदैव सज्ज" (Ever Committed, Ever Ready) या ब्रीदवाक्याचे खरे प्रतीक आहे.