'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या राजकारणाला कलाटणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 19 h ago
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र

 

पाकिस्तानात हुकूमशाही प्रवृत्ती, हिंसाचार, आर्थिक दुरवस्था या सर्वच गोष्टींच्या बाबतीत आता नव्याने सांगण्यासारखे काही नाही. याचे कारण देशाच्या स्थापनेपासूनच त्या देशाचा इतिहास हेच ओरडून सांगतो आहे. त्यात सुधारणा घडली नाही. ज्यांनी तसे प्रयत्न केले, त्यांना नामोहरम करण्यात आले. हा देश भारताचा शेजारी असल्याने तेथील घडामोडींची गांभीर्याने दखल घ्यावी लागते. लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी स्वतःकडे अमर्याद अधिकार घेऊन लोकशाहीच्या अवशेषांच्याही चिंधड्या उडविण्याचा विडा उचललेला दिसतो. 

या पार्श्वभूमीवर तुरुंगात डांबण्यात आलेल्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविषयीच्या अफवांना ऊत आला आहे. त्यांचा मृत्यू झाल्याच्या वावड्या उठल्या. गेल्या अडीच वर्षांपासून तुरुंगात असलेले इम्रान खान यांच्या तब्येतीविषयी, तुरुंगात होत असलेल्या त्यांंच्या छळवणुकीविषयी समाजमाध्यमांवर बनावट व्हिडिओ, छायाचित्रे आणि आधारहीन बातम्यांच्या माध्यमातून सतत उलटसुलट चर्चा होत असतात. त्यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक त्यामुळे विचलित होऊन पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर उतरून उग्र आंदोलने करतात, न्यायालयात धाव घेतात. या अफवांची शहानिशा करण्यासाठी इम्रान खान यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना तुरुंगात भेटायला जातात, तर काही जण सरकारला इम्रान खान हयात असल्याचे पुरावे मागतात. 

पाकिस्तानच्या अफगाणिस्तानसोबत लष्करी चकमकी उडायला लागल्यापासून हे प्रकार वाढले आहेत, हे लक्षात घेण्याजोगे आहे. त्यामागे पाकिस्तानमध्ये अस्थैर्य निर्माण करण्याचा अफगाणिस्तानचा हेतू असल्याचे म्हटले जाते. कारण अन्य कोणत्याही आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये इम्रान खान यांच्याशी संबंधित चर्चा नसते. पाकिस्तानात मात्र इम्रान खान, त्यांचा पक्ष आणि कुटुंब अफवांच्या दुष्टचक्रात अडकले. अखेर इम्रानच्या बहिणीला तुरुंगात भेटण्याची परवानगी देण्यात आली व तो जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. अडीच वर्षांपासून तुरुंगवास भोगत असलेल्या इम्रान खान यांच्या पश्चात पाकिस्तानातील लोकशाहीला लागलेल्या ग्रहणाचे वर्तुळ लष्करप्रमुख, फिल्ड मार्शल सईद असीम मुनीर यांच्या विस्मयकारक उदयाने पूर्ण झाले आहे. 

एप्रिल महिन्यात झालेल्या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा हिशेब चुकविण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेली लष्करी कारवाई पाकिस्तानच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. या संघर्षानंतर पाकिस्तानची सुरक्षा चर्चा लष्करकेंद्रित होऊन असीम मुनीर यांचा पाकिस्तानच्या राजकारणातील प्रभाव वेगाने वाढला. त्यांची भारतविरोधातील बेताल वक्तव्ये याच काळातील. असीम मुनीर यांचा उदय हा लोकशाही मार्गाने सत्तेत असलेली सरकारे निष्प्रभ करुन पाकिस्तानच्या राजकारणात, अर्थकारणात आणि परराष्ट्र धोरणात हस्तक्षेप करीत सरतेशेवटी सर्वेसर्वा लष्करी शासकाची भूमिका बजावणारे फिल्ड मार्शल मोहम्मद अयूब खान, जनरल मोहम्मद झिया-उल-हक आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या परंपरेशी सुसंगतच ठरतो आहे. 

या लष्करप्रमुखांनी थेट सत्ता काबीज केली किंवा पडद्यामागून सरकारे चालवून पाकिस्तानातील लोकशाही खिळखिळी केली. स्वतःचे मोठे व्यावसायिक साम्राज्य असलेल्या पाकिस्तानच्या लष्कराची अर्थकारणावरही घट्ट पकड आहे. भारत, अफगाणिस्तान, अमेरिका आणि चीन या देशांबरोबरचे संबंध आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सर्व महत्त्चाचे निर्णय लष्कराच्या अधीनच असतात. असीम मुनीर यांना ‘फिल्ड मार्शल’ हा सर्वोच्च दर्जा तसेच लष्कर, नौदल आणि हवाईदल या तिन्ही दलांचे सरसेनाध्यक्षपद बहाल करीत पाकिस्तानच्या राज्यघटनेतील २७ व्या दुरुस्तीने त्यांना आजीवन गुन्हेगारी कारवाईपासून संरक्षण देत आपला दर्जा आणि सुविधा आजीवन राखण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. 

या दुरुस्तीमुळे मुनीर यांचा कार्यकाळ नव्याने सुरू झाला असून ते किमान पुढील दहा वर्षे पदावर राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या इतिहासात लष्करप्रमुखाचा एवढा मोठा कार्यकाळ अभूतपूर्व ठरणार आहे. असीम मुनीर यांच्या पाकिस्तानच्या राजकारणातील वाढत्या वर्चस्वाला चीन, अमेरिका, सौदी अरेबिया आणि पश्चिम आशियातील देशांकडून मिळालेले बळही तेवढेच महत्त्वाचे ठरले आहे. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ हे पद खास मुनीर यांच्यासाठी तयार करण्यात आले आहे. अण्वस्त्र यंत्रणा पूर्णपणे त्यांच्या ताब्यात जाणार, ही त्यातील एक गांभीर्याने दखल घ्यावी, अशी बाब आहे. थोडक्यात मुलकी सरकार हे केवळ त्यांच्या हातातले बाहुले ठरणार. 

पाकिस्तानातील लोकशाही म्हणजे खरे तर फार्सच म्हणावा लागेल. लोकप्रतिनिधिगृह, न्यायालय, पंतप्रधान, अध्यक्ष ही पदे आणि यंत्रणा अस्तित्वात तर आहेत, पण त्यांच्यातला अधिकारांचा प्राणच काढून घेण्यात आला आहे. कधीही नियंत्रणशून्य कारभार हे धोक्याचेच लक्षण असते. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताकडून बसलेल्या तडाख्यानंतर चवताळलेल्या, चडफडणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांकडून आगळीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे भारताला सावध राहावे लागेल. नजीकच्या भविष्यात तरी पाकिस्तानी जनतेची ससेहोलपट थांबण्याची चिन्हे नाहीत. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणाचे तरी प्यादे बनून राहण्याची तयारी असलेले पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्करशहा भारतद्वेषाची धून आळवत लोकांना भुलवत राहतात. त्यामुळेच त्या देशातील सध्याच्या एकूण परिस्थितीवर भारताला सातत्याने लक्ष ठेवावे लागेल.