भक्ती चाळक
हिंदू आणि मुस्लिमांचे शांततापूर्ण सहजीवन कसे अशक्य आहे, हे ठसवणाऱ्या बातम्या आणि घटनांचा सतत मारा होत आपल्यावरअसतो. त्यामुळे सण-उत्सवांच्या काळात आनंद आणि जल्लोषापेक्षा हिंदू-मुस्लीम तणाव आणि भीतीचे वातावरण लोकांच्या मनात तयार झालेय. इतके की, गणेशोत्सव काळातच धार्मिक सौहार्द वृद्धींगत करण्याच्या सदहेतूने एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने व्हिडीओ बनवला होता. मात्र त्या व्हिडीओमध्ये मुस्लिम मुर्तीकाराकडून मूर्ती विकत घेतल्यामुळे वादंग पेटले आणि त्याला तो व्हिडिओ डिलीट करणे भाग पडले.
समाजात एकीकडे द्वेषयुक्त विचारांची सरशी होत असली तरी महाराष्ट्रातील कित्येक गावांमध्ये उत्सवांच्या विशेषतः गणेशोत्सवाशी संबंधित हिंदू-मुस्लीम सौहार्दाच्या परंपरा आहेत. या परंपरांचे दाखले ‘आवाज द व्हॉईस’वर ठिकठिकाणी वाचायला आणि पाहायला मिळतील..
आपण आपल्या समाजात किंवा जिवलगांसोबत असतो तेव्हा हे शांततापूर्ण सहजीवन जगणे एकवेळ जरा सोपे असते. कारण तेव्हा आपल्याजवळ संसाधने सहज उपलब्ध असतात. मात्र आपण जेव्हा परदेशात वास्तव्यास असतो तेव्हा परिस्थितीप्रतिकूल असते. मात्र अशा परिस्थितीतही आपल्या संस्कृतीशी नाळ घट्ट जोडून ठेवल्याचीही अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात.
त्यापैकीच एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे अल्फिया शेख आणि राधिका यादव या मराठमोळ्या मुलींनी कॅनडामध्ये साजरा केलेला गणेशोत्सव. मात्र त्यांच्या या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या छोट्याशा कृतीतून दिलेला धार्मिक सौहार्दाचा मोठा संदेश.
मूळच्या पुण्याच्या असलेल्या अल्फिया आणि राधिका यांनी फूड टेकमध्ये सोबतच पदवी मिळवली. आणि पुढच्या शिक्षणासाठी कॅनडाला जाण्याचे ठरवले. आणि त्यात त्यांना यशही आले. मात्र तिथे गेल्यावर दोघींची ताटातूट झाली. कारण अल्फियाला माँट्रीयलच्या जगप्रसिद्ध मॅकगील युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला, तर राधिकाला तिथून तब्बल साडेचार हजार किलोमीटर दूर असलेल्या प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबियामध्ये प्रवेश मिळाला. त्यामुळे दोन्ही मैत्रिणींची ताटातूट झाली. परंतु पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यावर आणि वर्षभर नोकरीचा अनुभव मिळवून त्या पुन्हा एकत्र आल्या आणि सोबत राहू लागल्या. या दोघीही सध्या वेन्कुअरमध्ये नोकरी करत आहेत.
एकत्र राहायला लागल्यावर या जिवलग मैत्रिणींनी आपापले सण आणि उत्सव साजरे करायचे ठरवले. अल्फिया मुस्लीम तर राधिका हिंदू. दोघींचे सण आणि उत्सव वेगवेगळे मात्र या दोघींनी अतिशय प्रेमाने आणि संवेदनशीलपणे केवळ सण साजरेच केले नाहीत तर एक मेकांच्या सणांमध्ये हिरीरीने भागही घेतलाय. यंदा एकत्र आल्यावर गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले.
आपल्या लहानश्या घरी गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद व्यक्त करताना अल्फिया आणि राधिका ‘आवाज द व्हॉईस’ला सांगतात, “आम्ही गेल्या ३ वर्षांपासून कॅनडामध्ये राहतोय. परंतु मुळच्या पुण्याच्या असल्याने गणेशोत्सव आमच्या जिव्हाळ्याचा विषय. . आधी आम्ही दोघीही वेगवेगळ्या शहरात राहत होतो, परंतु यावर्षी राहायला एकत्र आल्याने आम्ही आमच्या घरी बाप्पांना आणायचे ठरवले.”
गणेशमूर्ती विकत घेऊन न बसवता, हाताने घडवायचे त्यांनी ठरवले. कॅनडातील आपल्या छोट्याशा घरात या दोघींनी बसून माती मळली, मूर्तीला आकार दिला, रंगकाम केले आणि बाप्पा साकारले. गणपतीची आरास करण्यापासून ते पूजेसाठी ताट आणि नैवेद्य बनवण्यापर्यंत सर्व काही दोघींनी अगदी बारकाईने केले.
गणेशोत्सवाच्या तयारीविषयी अल्फिया सांगते की, “इथे कॅनडामध्ये सजावटीच्या सगळ्या वस्तू मिळणे अवघड होते. मग आमच्याकडे असलेल्या ओढण्या आणि टिकल्यांपासून आम्ही सजावट केली. भावनिक स्पर्श द्यायचा म्हणून आम्ही बाप्पाची मूर्ती घरीच घडवण्याचे ठरवले होते.”
राधिका सांगते की, “नैवेद्य बनवताना मला अल्फियाची खूप मदत झाली. आम्ही एकमेकींच्या साथीने सगळे पदार्थ बनवले. एकीने मोदक बनवले तर दुसरीने जेवण. आम्ही दोन वेळची आरतीसुद्धा सोबत करायचो. यासगळ्या वातावरणात पुण्यात गणेशोत्सव साजरा केल्याची अनुभूती मिळाली.”
अल्फियाला आरती, नैवद्य यांविषयी खोलवर माहिती नव्हती. यंदा राधिकासोबत घरात गणेशोत्सव साजरा करताना तिला अनेक गोष्टी नव्याने कळल्या, ती म्हणते, “पुण्यात असताना दरवर्षी गणेशोत्सवात मी राधिकाच्या घरी दर्शनाला जायचे. परंतु त्यामागची संपूर्ण तयारी मला कधीच अनुभवायला मिळाली नव्हती. यावर्षी मात्र मी सगळ्या लहानमोठ्या गोष्टींमध्ये सहभागी होते आणि मला सगळं अनुभवायला मिळालं. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप खास होता.”
घरापासून दूर असलेल्या या मुली सातासमुद्रापार एकमेकींचा आधार बनून राहत आहेत. यंदा घरात गणपतीचे आगमन झाल्याने राधिका भावूक झाली. ती म्हणते की, “पुण्यात असताना अल्फिया आणि मी दरवर्षी आमचे सण एकत्रित साजरे करायचो. ती दिवाळी, गणेशोत्सवाला माझ्या घरी यायची आणि मी ईदला तिच्या घरी जायचे. यावर्षी आम्ही बाप्पाला घरी आणल्यामुळे मला घरी असल्यासारखेच वाटले. यात अल्फियाचा खूप मोठा वाटा आहे.”
ती पुढे म्हणते, “एकत्र राहताना ती मुस्लीम आणि मी हिंदू असल्याचे आम्हाला कधी जाणवलेच नाही. कारण आम्ही एकमेकींचे सगळे सण साजरे करतो आणि दोन्ही सणांसाठी आम्ही खूप उत्सुक असतो. यानिमित्ताने आम्हाला एकमेकींची संस्कृती अनुभवायला मिळतेय. घरापासून दूर आम्हाला एकमेकींचाच आधार आहे. आमच्यात केवळ एकच नातं आहे, ते म्हणजे मैत्रीच. यावेळी आम्ही इथे रमजान ईदही सोबत साजरी केली होती. मेहेंदी काढली, बिर्याणी, शिरकुर्मा बनवला आणि आमच्या मित्रमैत्रिणींना आमंत्रण दिले होते.”
अल्फियासोबतच्या जिव्हाळ्याच्या मैत्रीचे गोडवे गाताना राधिका म्हणते, “आमची मैत्री खूप खास आहे. जात-धर्म बघून मैत्री होतंच नसते. त्यामुळे आमचं नातं हे केवळ प्रेम आणि आदर यावर टिकून आहे.”
राधिकाला दुजोरा देत अल्फिया म्हणते, “सुरुवातीपासूनच आम्ही एकमेकींकडे केवळ माणूस पाहतो. आमच्यात भेदभाव कधी आलाच नाही. धर्म आणि संस्कृती कधीच आमच्या मैत्रीआड आली नाही. आम्ही एकमेकींच्या सणांचा आदर करतो. परंपरा जाणून घेतोय आणि यातून खूप सुंदर आठवणी निर्माण करतोय. त्यामुळे आमच्यातील सांस्कृतिक वैविध्याला आम्ही केवळ स्वीकारले नाही तर त्याला साजरे पण करतोय.”
घरापासून लांब राहूनही अल्फिया आणि राधिकाची यांची ही छोटीशी कृती दोन सांस्कृतिक एकतेचीआणि मैत्रीची नव्याने ओळख करून देणारी आहे. धर्म-जात विसरून एकमेकांच्या सणांचा आदर करणं, त्यांना आपलंसं करणं म्हणजेच खरी भारतीयता, असा संदेश या दूरदेशी राहणाऱ्या दोन तरुणींनी भारतीयांना विशेषतः महाराष्ट्रीय जनतेला दिलाय.