भारतातील बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधातील अतिक्रमण हटाव मोहिमेचे समर्थन करत असतानाच, जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. "सरमा प्रत्येक मुस्लिमाला 'बांगलादेशी' म्हणून चित्रित करत आहेत," असा गंभीर आरोप मदनी यांनी केला आहे. यावर, मुख्यमंत्री सरमा यांनीही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे.
मौलाना महमूद मदनी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "कोणताही बांगलादेशी किंवा परदेशी नागरिक भारतात राहता कामा नये, याला आमचा पाठिंबा आहे. पण आसामचे मुख्यमंत्री प्रत्येक मुस्लिमाला बांगलादेशी ठरवत आहेत. ते मला बांगलादेशात पाठवण्याची भाषा करतात, जी त्यांची मानसिकता दर्शवते."
मौलाना मदनी यांनी पुढे आरोप केला की, "आसाममध्ये निवडणुका जवळ आल्याने, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून जबरदस्तीने घरे पाडली जात आहेत. बेरोजगारी आणि भ्रष्टाचारासारख्या खऱ्या मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकार हे करत आहे."
यापूर्वी आसाम दौऱ्यावर असतानाही मौलाना मदनी यांनी सरकारच्या पद्धतींना "दुर्दैवी आणि वेदनादायी" म्हटले होते.
हिमंता बिस्वा सरमा यांचा पलटवार
मौलाना महमूद मदनी यांच्या आरोपांना उत्तर देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. "कोण आहेत मदनी? मदनी देव आहेत का? मदनींची बहादुरी तेव्हाच चालते जेव्हा काँग्रेस सत्तेत असते. भाजपच्या काळात त्यांच्या बहादुरीचा कोणताही पुरावा नाही," असे सरमा म्हणाले.
"जर त्यांनी जास्त केले, तर मी मदनींना तुरुंगात टाकेन. मी मुख्यमंत्री आहे, मदनी नाहीत," असा थेट इशाराही हिमंता बिस्वा सरमा यांनी दिला. या शाब्दिक चकमकीमुळे आसाममधील अतिक्रमण आणि घुसखोरीच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद अधिकच चिघळला आहे.