हैलाकांडी : दक्षिण आसाममधील बारक व्हॅलीच्या हैलाकांडी जिल्ह्यातील एका दुर्गम गावात हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील सलोख्याचे एक दुर्मिळ उदाहरण समोर आले आहे. सरकारी पाणीपुरवठा प्रकल्प बिघडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणाऱ्या शेजारील हिंदू वस्तीतील लोकांसाठी मुस्लिम समुदायाने मदतीचा हात पुढे केला आहे.
मानवतेचे एक अनोखे उदाहरण देत परिसरातील मुस्लिम समुदाय पुढे आला. त्यांनी स्थानिक मस्जिदच्या वजूखानामधून हिंदूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. या घटनेचे बारक व्हॅलीतील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या आणि आंदोलने
राजेश्वरपूर गावातील ही घटना आहे. हे गाव हैलाकांडी शहरापासून सुमारे २० किलोमीटर दूर आहे. हैलाकांडी जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 'कमरांगारपार पाणीपुरवठा योजने' अंतर्गत येथे पाणीपुरवठा सुविधा बसवण्यात आली होती. मात्र, ती बऱ्याच काळापासून बंद आहे. सरकारने ती दुरुस्त करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत.
ग्रामस्थ गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, पण सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (PHE) विभागाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. लाला महसूल मंडळांतर्गत राजेश्वरपूर परिसरात दुसरी जुनी पाणीपुरवठा सुविधाही बंद असल्याने संपूर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात, यातील बहुतेक भागात पूर आला. तेव्हापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली.
मस्जिदने भागवली नागरिकांची तहान
हिंदूबहुल भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा मुद्दा स्थानिक नलुबक जामा मस्जिदच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर मस्जिदच्या पाण्याचे नळ गावातील सर्व समुदायांतील लोकांसाठी खुले करण्यात आले.
'जामे मस्जिद व्यवस्थापन समिती'चे सचिव बिलाल अहमद बारभुईया म्हणाले, "गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे, हे खूप दुःखद आहे." ते पुढे म्हणाले, "त्यामुळेच सर्वांसाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे." पाणी नसल्यामुळे कोणाला त्रास व्हावा, हे स्वीकारार्ह नाही. 'मानव धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे,' असेही त्यांनी सांगितले.
स्थानिकांनी मानले मुस्लिमांचे आभार
परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की, त्यांना मस्जिदमधून पिण्याचे पाणी मिळत आहे आणि त्यांनी मस्जिद व्यवस्थापनाचे यासाठी आभार मानले.
स्थानिक नागरिक सुमित नाथ, नारायण नाथ, प्रभाकर नाथ, अभिषेक नाथ, धीरेंद्र सिन्हा, पूर्णिमा नाथ, लक्ष्मी नाथ, सिथी नाथ, बापन नाथ, कृपामय राय, अमरजीत सिन्हा, जयंति राय आणि इतरांनी राजेश्वरपूरच्या ५ व्या ब्लॉकमधील पाणीपुरवठा योजना पूर्ववत करण्याची दीर्घकाळापासून मागणी केली आहे. आसाम लेबर युनियनचे सचिव परवाज खसरू यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे.
- सतानंद भट्टाचार्य