स्वातंत्र्यदिनानिमित्त काश्मीर खोऱ्यात मुस्लिम राष्ट्रीय मंच आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित करण्यात आलेली तिरंगा आणि सौहार्द यात्रा
स्वातंत्र्यदिनानिमित्त काश्मीर खोऱ्यात एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. पहलगाम येथे मुस्लिम राष्ट्रीय मंच (एमआरएम) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांनी आयोजित केलेल्या तिरंगा आणि सौहार्द यात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या तोंडून 'जय हिंद माता की'चा नारा घुमत होता. ही यात्रा केवळ मिरवणूक नव्हती, तर काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील, असा ठाम संदेश यातून देण्यात आला.
हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश
या यात्रेने जगाला स्पष्ट सांगितले की भारतीय हिंदू आणि मुस्लिम कायम एकत्र आहेत. राष्ट्र, मानवता, पिढीजात परंपरा, राष्ट्रीय ध्वज, नागरिकत्व आणि कायद्याने दोन्ही समुदाय जोडले गेले आहेत. भूतकाळातील घटना किंवा आजची आव्हाने यामुळे हे समुदाय विभागले जाऊ शकत नाहीत. ही यात्रा अटल एकतेचे प्रतीक होती. या यात्रेने हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत, ही समजूत खोटी ठरवली. शतकानुशतके हे समुदाय एकत्र राहिले, आजही राहतात आणि पुढेही राहतील, असा संदेश या यात्रेने दिला.
भारतीय एकता
या यात्रेचे महत्त्व स्थानिक पातळीपुरते मर्यादित नव्हते, तर ते संपूर्ण भारत आणि जगापर्यंत पोहोचले. पहलगामच्या निसर्गरम्य खोऱ्यातून उठलेल्या आवाजांनी सांगितले की दहशतवाद आणि फुटीरता आता भूतकाळात जमा झाली आहे. आता इथून पुढे शांती, विकास आणि सौहार्दाचा काळ आहे. मुस्लिम आणि हिंदू समुदायांनी एकत्र येऊन दाखवले की भारताची खरी ताकद विविधतेतील एकतेत आहे. 'हर घर तिरंगा, हर दिल हिंदुस्तान' अशा घोषणांनी यात्रेत देशभक्तीचा उत्साह वाढवला.
जवानांसाठी रक्षाबंधन
पहलगाम यात्रेनंतर एमआरएमच्या कार्यकर्त्यांनी लथपुरा येथील १८५ सीआरपीएफ छावणीत भेट दिली. यावेळी देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना राखी बांधण्यात आली. भारताच्या मुली आणि बहिणी नेहमीच जवानांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात, हे यावेळी स्पष्ट झाले. महिला कार्यकर्त्या आणि तरुणींनी जवानांना टिळा लावून राखी बांधली.
यावेळी बोलताना जवानांनी भावूक होऊन सांगितले की, त्यांना आपल्या कुटुंबासोबत रक्षाबंधन साजरे करत असल्यासारखे वाटले. हा केवळ समारंभ नव्हता, तर भारतातील नागरिक आणि सैन्य यांच्यातील नाते दृढ करणारा क्षण होता.
याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हटले की, “काश्मीर हा भारताचा मुकुट आहे आणि नेहमीच राहील. आता दहशतवाद आणि फुटीरतेची मुळे कमकुवत झाली आहेत. पाकिस्तानने बळकावलेला काश्मीर हा सुद्धा भारताचा भाग आहे आणि एक दिवस तो तिरंग्याच्या सावलीत परत येईल, हा संदेश आजच्या यात्रेतून देण्यात आला. कोणतीही शक्ती भारताची एकता आणि सार्वभौमत्व तोडू शकत नाही.” काश्मीर बदलत आहे आणि भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडला जात आहे, हे त्यांनी ठामपणे सांगितले.
एमआरएमचे राष्ट्रीय समन्वयक मोहम्मद अफझल यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हणले की, “आज एमआरएमचे कार्यकर्ते आणि काश्मीरचे लोक हे सिद्ध करत आहेत की दिल्ली, मुंबई किंवा चेन्नईप्रमाणेच काश्मीरमध्येही भारताचे हृदय तितक्याच ताकदीने धडधडत आहे. येथील प्रत्येक घरात तिरंगा आणि प्रत्येकाचे हृदय भारतासाठी समर्पित करण्याचा आमचा ध्यास आहे.” अफझल यांच्या या विधानाने मुस्लिम समुदाय केवळ भारताच्या अखंडतेचा भाग नाही, तर त्याचे रक्षण करण्यात आघाडीवर असल्याचे अधोरेखित केले.
या यात्रेविषयी बोलताना एमआरएमचे नेते अबू बकर नकवी यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, "ही यात्रा हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन भारताची एकता आणि अखंडता कशी जपतात याचे प्रतिक आहे. भारताला विभागण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात भारतीय मुस्लिम आणि हिंदू एकजुटीने उभे आहेत आणि अखंड भारतासाठी एकत्र काम करत आहेत, असा संदेश या यात्रेतून देण्यात आला."
यावेळी प्राध्यापक डॉ. शाहिद अख्तर यांनी काश्मीरचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व सांगितले. ते म्हणाले, “काश्मीर केवळ एक भौगोलिक प्रदेश नाही, तर भारताचा आत्मा आणि सांस्कृतिक वारसा आहे. या भूमीत ऋषी, सूफी आणि संतांनी बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला आहे. दहशतवाद ही काश्मीरची ओळख नाही, तर शांती आणि प्रेम हीच खरी काश्मीरची परंपरा आहे. या भूमीतून जेव्हा बंधुत्वाचा आवाज पुन्हा जगापर्यंत पोहोचेल, तेव्हाच अखंड भारताचे स्वप्न पूर्ण होईल.”
एमआरएमच्या राष्ट्रीय समन्वयक डॉ. शालिनी अली यांनी या यात्रेला एक चळवळ म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, “आमचे राष्ट्र एक आहे, आमचा ध्वज एक आहे आणि आमचे नागरिकत्व एक आहे. आम्ही भारतीय होतो, आहोत आणि नेहमीच राहू. पाकिस्तानने बळकावलेला काश्मीर सुद्धा आमचाच आहे आणि एक दिवस तो भारतीय ध्वजाखाली अखंड काश्मीरचा भाग बनेल.”
यावेळी धार्मिक विद्वान कारी अब्रार जमाल प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “इस्लामचा खरा संदेश शांती आणि बंधुभावाचा आहे. एमआरएमने या यात्रेद्वारे हा संदेश जगापर्यंत पोहोचवला. जवानांना राखी बांधणे हे केवळ प्रतीकात्मक नाही, तर भारतीय मुस्लिम या भूमीला मातृभूमी मानतात हे स्पष्ट केले. जेव्हा मुस्लिम बहिणी जवानांना राखी बांधत होत्या तेव्हा आमची संस्कृती आणि श्रद्धा देशाच्या रक्षणासाठी समर्पित असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते.”
या यात्रेत रेश्मा हुसेन, एस.के. मुदीन, इस्लाम अब्बास, मोहम्मद फारूक, मीर नझीर, शिराज कुरेशी, डॉ. सलीम राज, शायस्ता खान, ठाकूर राजा रईस, हाफिज साबरीन, मोहम्मद इम्रान, फैज खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते. काश्मीरची खरी ओळख दहशतवादात नाही, तर शांती, सौहार्द आणि विकासात आहे, असा त्यांचा एकमुखी आवाज होता.
श्रीनगरमधील सूफी संतांच्या दर्ग्यात प्रार्थना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी यात्रेदरम्यान श्रीनगरमधील झियारत बाबा झैनुद्दीन रिशी यांच्या दर्ग्याला भेट दिली. यावेळी त्यांनी शांती आणि बंधुत्वासाठी प्रार्थना केली. जम्मू आणि काश्मीर वक्फ मंडळाच्या अध्यक्ष सय्यद दाराख्शान अंद्राबी त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. दोघांनी दर्ग्यात नतमस्तक होऊन मानवतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक प्रा. शाहिद अख्तर हेही यावेळी उपस्थित होते.
प्रसारमाध्यमांशी बोलताना इंद्रेश कुमार यांनी सूफी दर्ग्यातील विकासकामांचे कौतुक केले. ते म्हणाले, “हे दर्ग्याचं ठिकाण सौहार्द आणि प्रेमाचे प्रतीक आहे. डॉ. दाराख्शान यांच्या नेतृत्वाखाली या आध्यात्मिक स्थळांचा विकास पाहून आम्हाला आनंद वाटला."
ते पुढे म्हणाले की, "जम्मू आणि काश्मीर हा भारताचा मुकुट आहे आणि भारत हा जगाचा मुकुट आहे. ‘सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा’ ही वास्तविकता आहे. हा देश सर्व धर्मियांचा आहे. इथे कोणत्याही भेदभावाला थारा नाही. येथे कायमस्वरूपी शांती, समृद्धी आणि बंधुता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्वजण कठोर परिश्रम करत आहेत."
सय्यद दाराख्शान अंद्राबी यांनी इंद्रेश कुमार यांच्या भेटीबद्दल आभार मानले. त्यांनी देशभरातील मुस्लिम समुदायांच्या कल्याणासाठी इंद्रेश कुमार यांच्या योगदानाचे कौतुक केले. या भेटीवेळी वक्फ मंडळाचे सदस्य सय्यद मोहम्मद हुसेन आणि कार्यकारी दंडाधिकारी इश्तियाक मोहिउद्दीन उपस्थित होते.
काश्मीरचा बदलता चेहरा
काश्मीरला दहशतवाद आणि फुटीरतेने दीर्घकाळ ग्रासले होते. परंतु आता काळ बदलत आहे. काश्मीरची खरी ओळख हिंसा नसून बंधुता आणि मानवता हीच आहे. स्वातंत्र्यलढ्यात सर्व धर्म आणि समुदायांनी एकत्र येऊन भारतमातेचे रक्षण केले, ती परंपरा या यात्रेने पुन्हा अधोरेखित केली.
जागतिक शांतीचा संदेश
पहलगाम तिरंगा आणि सौहार्द यात्रा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर भारताच्या एकतेचा उद्घोष होता. लथपुरा १८५ सीआरपीएफ छावणीत जवानांना राखी बांधल्यानंतर हा संदेश अधिक खोलवर रुजला. भारताची खरी ताकद विविधतेतील एकतेत आहे. 'आमचे राष्ट्र एक आहे, आमचा ध्वज एक आहे' काश्मीरमधून उठलेला हा आवाज येत्या काळात भारताच्या अखंडतेचा पाया बनेल आणि जगासाठी शांती आणि बंधुत्वाचा दीपस्तंभ ठरेल.