डॉ. योगिता करचे
भक्ती चाळक
आधुनिक काळातील नार्को-टेररिझम आणि सायबर-टेररिझम यांसारख्या अदृश्य शत्रूंना पराभूत करण्यासाठी आता खेळाचे मैदानच रणांगण बनले आहे. पुण्याची सामाजिक संस्था ‘वाटो ट्रस्ट’ने (WATO - वर्ल्ड अँटी टेररिजम ऑर्गनायझेशन ) भारतीय लष्कराच्या ‘आसाम रायफल्स’, ‘आसाम रेजिमेंट’ आणि ‘टेरीटोरीअल आर्मी मिझोरम’ यांच्या साथीने ‘प्रोजेक्ट ब्रह्मास्त्र: टॅलेंट हंट प्रोग्राम’ हा अभिनव उपक्रम मिझोरममध्ये सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवून एका सुरक्षित भविष्याची पायाभरणी केली जात आहे.
या प्रेरणादायी प्रकल्पामागे मुळच्या पुण्याच्या असलेल्या डॉ. योगिता करचे यांची दूरदृष्टी आहे. आजच्या युगातील दहशतवादाविरुद्धची लढाई केवळ लष्करी कारवाईने जिंकता येणार नाही तर त्यासाठी तरुणांची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळवणे आवश्यक आहे, असे त्यांचे ठाम मत आहे. ‘प्रोजेक्ट ब्रह्मास्त्र’ तरुणांना विविध उपक्रमांमध्ये गुंतवून या जागतिक समस्येवर एक प्रभावी तोडगा त्या काढत आहेत.
स्वर्गीय जे. ओ. पाटील फाऊंडेशनने देखील ‘वाटो ट्रस्ट’च्या या महत्त्वपूर्ण कार्याला भक्कम पाठिंबा दिला आहे. भारतीय लष्कराने या उपक्रमाला दिलेला सक्रिय पाठिंबा हे या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. लष्कर केवळ देशाच्या सीमांचे रक्षण करत नाही तर समाजाच्या उभारणीतही एक महत्त्वाचा भागीदार आहे. डॉ. योगिता यांची संकल्पना एक व्यसनमुक्त आणि सामर्थ्यशाली पिढी घडवण्याचा प्रयत्न करत आहे.
या संकल्पानेबद्दल बोलताना योगिता म्हणतात, “माझ्या वडिलांनी खाकी वर्दीत देशसेवा दिली आहे. त्यामुळे गुन्हेगारी मानसिकता कशी तयार होते हे मी माझ्या बाबांकडून ऐकत आलेय. म्हणून मी सुरुवातीपासूनच ठरवले की गुन्हेगारी कशी रोखता येईल यावर काम करायचे.”
त्या पुढे म्हणतात, “हे काम सुरू करण्यामागे दुसरे कारण म्हणजे २६/११ चा हल्ला. दुर्दैवाने ही दुःखद घटना माझ्या वाढदिवशी घडली. अशोक कामठे सर, करकरे सर या सर्वांसोबत माझ्या बाबांनी काम केले होते. अशोक कामठे तर एकेकाळी सोलापूरला खूप प्रसिद्ध आयपीएस अधिकारी होते. त्यावेळी माझे बाबा एपीआय ऑफिसर असताना त्यांची बऱ्याचदा भेट व्हायची, त्यावेळी मी बाबांच्या तोंडून त्यांचे नाव अनेकदा ऐकले होते. परंतु २६/११ हल्ल्याची बातमी समजल्यावर मला धक्का बसला आणि त्याचवेळी मी या गोष्टीवर काम करण्याचे ठरवले.”
या कार्यासाठी प्रेरित होण्यामागे आणखी एका घटनेचा उल्लेख करताना त्या म्हणतात, “२०१५ ला काही कारणास्तव मी पंजाबला गेली असताना त्याच वर्षी पठाणकोटला दहशतवादी हल्ला झाला. अशा अनेक घटना माझ्या आजूबाजूला घडत होत्या. पंजाबमध्ये पहिल्यांदाच ड्रग्ज काय असतात याचा अनुभव मी जवळून घेतला. तेथील तरुण प्रचंड प्रतिभावान आहेत. ते खेळामध्येही तरबेज आहेत आणि ते लोक त्यांच्या फिटनेसकडे जास्त लक्ष देतात, परंतु तरीही ते अमलीपदार्थांच्या आहारी गेलेले होते.”
त्या पुढे म्हणतात, “२००७ मध्ये पुण्यात तत्कालीन पोलिस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील सरांनी छापा टाकून एक मोठी रेव्ह पार्टी उद्धवस्त केली होती. तेव्हा मी बाबांकडून याबद्दल खूप ऐकले होते आणि त्यावेळी पुण्यात ड्रग्जच्या केसेस जास्त ऐकायला मिळत नव्हत्या. परंतु ज्यावेळी मी पंजाबला आले तेव्हा माझ्या लक्षात आलं, समाजाला नार्कोटेररिजम नावाची वाळवी लागायला प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहेत.”
‘वाटो’ची स्थापना…
पंजाबमध्ये असताना योगिता यांनी पॉलिटिकल सायन्सचे शिक्षण घेतले. त्याचवेळी त्या पॉलिटिकल ॲडव्हायझर म्हणूनही कार्यरत होत्या. याविषयी योगिता सांगतात, “जेव्हा प्रत्यक्षात मी राजकीय कार्याचा भाग झाले तेव्हा माझ्या लक्षात आले की देशाचे भवितव्य घडवायचे असेल तर आजच्या तरुणाईवर बारकाईने काम करणे गरजेचे आहे. आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. हेच कार्य हाती घेण्याच्या हेतूने २०२४ ला ‘वाटो’ची स्थापना झाली.”
इतकी वर्षे दहशतवादाविरोधात काम केल्यानंतर योगिता तरुणांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी कंबर कसून प्रयत्न करत आहेत. त्या म्हणतात, “पूर्वी धार्मिक मुद्याचा वापर करून दहशतवाद पसरवला जायचा परंतु, याचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले आहे. हल्ली दहशतवादी संघटना ‘न्यू एज टेररिजम’चा वापर करत आहेत, म्हणजे यातून थेट तरुणीला टार्गेट करायचे. त्यामध्येही नार्को टेररिजम, सायबर टेररिजम, इको टेररिजम असे प्रकार आहेत. तरुणाई यांमध्ये कशी ओढली जाते याचा त्यांना गंधही लागत नाही.”
ड्रग्ज हे दहशतवाद्यांचे सर्वात मोठे शस्त्र
आमली पदार्थांच्या विळख्यात अडकून आजची तरुण पिढी अप्रत्यक्षपणे दहशतवादाला कसा पाठींबा देतेय याविषयी योगिता सांगतात, “दहशतवादी संघटनांचे लक्ष्य हे तरुण असतात. या संघटना भरती आणि फंडिंगसाठी ड्रग्जचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढतात. ड्रग्ज हे दहशतवाद्यांचे सर्वात मोठे शस्त्र आहे. धार्मिक भावना, मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेली आजची तरुणाई यामध्ये सहज फसते. आणि दहशतवाद्यांचा हेतू साध्य होतो.”
त्या पुढे म्हणतात, “सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आजची तरुण पिढी इंस्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून सहजपणे सायबर टेररिजमचा बळी बनत आहे. तसेच इको टेररिजम ऐकायला सोपे वाटत असले तरी याचे खूप मोठे दुष्परिणाम आहेत. देशातील हस्तिदंत, सापाचे विष, प्राण्यांची कातडी यांची तस्करीकरून या संघटना आपल्या उपजीविका करतात.”
देशापुढे अमलीपदार्थांची एवढी मोठी समस्या असताना यावर निदान म्हणून योगिता यांनी ‘प्रोजेक्ट ब्रह्मास्त्र’ सुरु केला. या अंतर्गत त्यांनी देशभरात क्रीडा स्पर्धा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरुणाई फिटनेसकडे लक्ष देऊन अमलीपदार्थांपासून दूर राहील. योगिता सांगतात, “आपण पारंपारिक शिक्षण पद्धतीला महत्व देतो. परंतु आजची पिढी फास्ट आणि फॉरवर्ड विचारांची आहे त्यामुळे त्यांना त्यांच्याच पद्धतीने याबाबतचे शिक्षण देते गरजेचे आहेत. त्यामुळे यासाठी मी खेळाचा मार्ग निवडला.”
आवडीतून ध्येय साध्य
‘व्हेन पॅशन फाईंड परपज’ या शीर्षकाखाली योगिता यांनी प्रोजेक्ट ब्रह्मास्त्रची सुरुवात मिझोरमपासून केली. त्याठिकाणी त्यांनी बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन केले. याद्वारे प्रतिभावान खेळाडूंना आर्मीमध्ये भरती होण्याची संधी देखील मिळणार आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. योगिता म्हणतात, “‘वाटो’च्या एक वर्षाच्या मेहनतीनंतर तब्बल ११ देशांतील प्रतिनिधी आम्हाला जोडले गेले आहेत. श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाचे सल्लागार हे वाटोचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा तिथे कार्यरत आहेत. अशाप्रकारे विविध देशांमधील तरुण प्रतिनिधी, नेतेमंडळी संस्थेशी जोडले गेलेले आहेत. ही आमच्यासाठी सर्वात मोठी बाब आहे.”
मिझोरममध्ये सुरु झालेल्या या उपक्रमाची पायाभरणी पुण्यातून झाली. या उपक्रमाला व्यावसायिक सौरभ पाटील यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे योगिता यांनी सांगितले. तसेच या उपक्रमाला कमांडो इन चीफ जनरल पेंढारकर, मेजर जनरल भांबू, ब्रिगेडियर पुष्पेंद्र आणि ब्रिगेडियर भाटी यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमचे मार्गदर्शन आणि पाठबळ मिळाले. इतकेच नव्हे, तर ‘फिट इंडिया’, मिझोरम सरकार, नार्कोटिक्स विभाग आणि समाज कल्याण विभाग यांनीही 'वाटो ट्रस्ट'ला एकजुटीने साथ दिली आहे.
Gen Z च्या मानसिकतेवर काम करणे गरजेचे
आजकाल ड्रग्जच्या नशेत हाय होणे तरुणाईला कूल वाटते. परंतु त्यांच्या याच मानसिकतेवर घाला घालण्याचे काम योगिता करत आहेत. योगिता म्हणतात, “ड्रग्ज घेऊन आपण आतंकवादी संघटनेला अप्रत्यक्षपणे मदत करतोय, याची जाणीव नशा करणाऱ्या प्रत्येक तरुण-तरुणीला आम्ही करून देणार आहोत. ही अपराधी भावना जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होईल तेव्हा कुठेतरी अमलीपदार्थांची खरेदी-विक्री बंद होऊ शकेल.”
तेलंगणा सरकारकडून योगिता यांना पहिल्या युथ बायोडायव्हरसिटी कॉन्फरन्समध्ये इको टेररिजम या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. हीच त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणावी लागेल. सध्या महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, पंजाब, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार, मध्यप्रदेश, तेलंगना अशा १८ राज्यांमध्ये ‘वाटो’चे प्रतिनिधी कार्यरत आहेत. देशातच नाही तर विदेशातही त्यांचे प्रतिनिधी काम करतात. तरुणाईला आमलीपदार्थांपासून दूर ठेऊन देशाला बलाढ्य बनवण्याच्या दिशेने योगिता यांनी उचलेले पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे.