बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. एका नव्या यादीनुसार, तो जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक बनला आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची वार्षिक क्रमवारी जाहीर करणाऱ्या 'हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५' नुसार, ५९ वर्षीय शाहरुखची एकूण संपत्ती तब्बल १.४ अब्ज डॉलर्स (१.०३ अब्ज पौंड) इतकी आहे. या कामगिरीमुळे तो अर्नोल्ड श्वार्झनेगर, पॉप स्टार रिहाना, गोल्फपटू टायगर वूड्स आणि गायिका टेलर स्विफ्ट यांसारख्या जागतिक सेलिब्रिटींच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. फोर्ब्सनुसार, टेलर स्विफ्टची एकूण संपत्ती १.६ अब्ज डॉलर्स आहे.
या यादीत इतर बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे, ज्यात अभिनेत्री जुही चावला, अभिनेते हृतिक रोशन, अमिताभ बच्चन आणि चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यांची नावे आहेत.
'किंग ऑफ रोमान्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखने हिंदी चित्रपटसृष्टीत तीन दशकांहून अधिक काळ काम केले आहे. त्याने स्वतःला केवळ एक अभिनेता म्हणून मर्यादित न ठेवता एक मोठे प्रॉडक्शन हाऊस आणि एका क्रिकेट संघाचा मालक म्हणूनही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.