जम्मू-काश्मीर पोलिसांचे मोठे यश! देशव्यापी 'व्हाईट कॉलर' दहशतवादी जाळे उध्वस्त

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा
जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा

 

जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे. पोलिसांनी देशव्यापी पसरलेले 'व्हाईट कॉलर' (सुशिक्षित लोकांचे) दहशतवादी मॉड्युल उध्वस्त करून देशातील अनेक संभाव्य दहशतवादी हल्ले रोखले आहेत, असे सिन्हा यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी नौगाम पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या अपघाती स्फोटातील बळींना श्रद्धांजलीही वाहिली.

जम्मूतील एका गुरुद्वारात गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या हुतात्मा दिनानिमित्त आयोजित 'नगर कीर्तन'मध्ये सहभागी असताना नायब राज्यपालांनी ही माहिती दिली.

नौगाम स्फोट: कट नाही, अपघात

श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी (१४ नोव्हेंबर २०२५) रात्री झालेल्या भीषण स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ३२ जण जखमी झाले. यात बहुतेक पोलीस कर्मचारी होते. या घटनेबद्दल बोलताना सिन्हा यांनी स्पष्ट केले की, "नौगाममधील अपघाती स्फोटामागे कोणताही दहशतवादी कट किंवा बाह्य हस्तक्षेप नाही. मी या घटनेच्या कायद्यानुसार दंडाधिकारी स्तरावरील चौकशीचे (Magisterial Probe) आदेश आधीच दिले आहेत".

त्यांनी सांगितले की, १० नोव्हेंबरला दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांचे नमुने फॉरेन्सिक टीम गोळा करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. शुक्रवारी रात्री ११.२० च्या सुमारास नमुने गोळा करताना हा स्फोट झाला, ज्यामुळे पोलीस कर्मचारी आणि महसूल अधिकाऱ्यांसह अनेक मौल्यवान जीव गमावले लागले. पोलीस ठाण्यात गेल्या दोन दिवसांपासून सॅम्पलिंगची प्रक्रिया सुरू होती.

'व्हाईट कॉलर' मॉड्युलचा पर्दाफाश

देशव्यापी दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करून, जम्मू-काश्मीर पोलिसांनी देशातील अनेक दहशतवादी घटना हाणून पाडल्या आहेत आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मोठे यश मिळवले आहे, असे एलजींनी नमूद केले.

तपासकर्त्यांच्या मते, १९ ऑक्टोबर रोजी नौगामच्या बुनपोरा भागात पोलीस आणि सुरक्षा दलांना धमकावणारे 'जैश-ए-मोहम्मद' (JeM) चे पोस्टर भिंतींवर दिसले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान हे मोठे नेटवर्क उजेडात आले.

तपासाचा प्रवास :

  • सीसीटीव्ही फुटेज: सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणातून आरिफ निसार दार उर्फ ​​साहिल, यासिर-उल-अश्रफ आणि मकसूद अहमद दार उर्फ ​​शाहिद या तीन संशयितांना अटक करण्यात आली.

  • मौलवीला अटक: त्यांच्या चौकशीतून मौलवी इरफान अहमद याला अटक करण्यात आली. तो पूर्वी पॅरामेडिक होता आणि नंतर इमाम बनला होता. त्यानेच पोस्टर पुरवले आणि डॉक्टरांना कट्टरतावादी बनवले, असा आरोप आहे.

  • अल-फलाह विद्यापीठ: हा तपास पुढे हरियाणातील फरिदाबाद येथील 'अल-फलाह विद्यापीठा'पर्यंत पोहोचला. तिथे डॉ. मुझम्मिल गनई आणि डॉ. शाहीन सईद यांना अटक करण्यात आली आणि मोठा स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला.

तपासकर्त्यांचा असा विश्वास आहे की, डॉक्टरांचे एक मुख्य त्रिकूट हे मॉड्युल चालवत होते. यात डॉ. गनई, उमर नबी (लाल किल्ल्याजवळ स्फोटकांनी भरलेली कार चालवणारा चालक) आणि मुझफ्फर राथेर (फरार) यांचा समावेश होता. आठवा अटक केलेला व्यक्ती, डॉ. अदील राथेर (मुझफ्फरचा भाऊ) याच्या भूमिकेचा अद्याप तपास सुरू आहे.

गुरु तेग बहादूर यांना श्रद्धांजली वाहताना सिन्हा म्हणाले, "आपल्या आदरणीय शीख गुरूंनी महत्त्वपूर्ण योगदान आणि निस्वार्थ बलिदानाद्वारे भारताचे वैभव सुनिश्चित केले. शतकानुशतके परकीय आक्रमणे आणि आर्थिक लूट होऊनही भारत आजही पूर्ण ताकदीने आणि अभिमानाने उभा आहे".


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter