महाराष्ट्र सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ज्या भागांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, त्या क्षेत्रांसाठी ही सुट्टी लागू असेल. मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या आदेशानुसार, ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत, तेथील राज्य व केंद्र सरकारची कार्यालये, निमशासकीय संस्था, सार्वजनिक उपक्रम, बँका आणि इतर आस्थापनांना ही सुट्टी लागू राहील.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, हा नियम खाजगी क्षेत्रालाही बंधनकारक असेल. खाजगी कंपन्या, कारखाने, दुकाने आणि इतर आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी पगारी रजा देणे आवश्यक आहे. कामाच्या स्वरूपामुळे पूर्ण दिवसाची रजा देणे शक्य नसल्यास, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळणे गरजेचे आहे. मात्र, अशा सवलतीसाठी संबंधित आस्थापनांना जिल्हाधिकारी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.
जर कोणत्याही मालकाने कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत नाकारली आणि त्यामुळे कर्मचारी मतदाण्यापासून वंचित राहिला, तर संबंधित आस्थापनेवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि लोकशाही प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग नोंदवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. १५ जानेवारी (बुधवार) रोजी होणाऱ्या या मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.