इराणमधील भारतीयांना देश सोडण्याचे आदेश; युद्धाच्या सावटाखाली केंद्र सरकारचा निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी

 

येत्या काही दिवसांत अमेरिकेकडून संभाव्य हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता, इराणमधील भारतीयांना देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय दूतावासाने जारी केलेल्या ताज्या मार्गदर्शक सूचनेत आपल्या नागरिकांना व्यावसायिक विमानांसह उपलब्ध वाहतुकीच्या साधनांचा वापर करून इराण सोडण्यास सांगितले आहे. ही सूचना विद्यार्थी, यात्रेकरू, व्यावसायिक आणि पर्यटक अशा इराणमधील सर्वच व्यक्तींना लागू आहे.

"१४ जानेवारी २०२६ च्या मार्गदर्शक सूचनेचा येथे पुनरुच्चार करण्यात येत आहे. सर्व भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींनी (PIOs) योग्य खबरदारी घ्यावी, आंदोलने किंवा निदर्शने होणारे भाग टाळावेत, इराणमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे आणि स्थानिक घडामोडींसाठी माध्यमांवर लक्ष ठेवावे," असे या सूचनेत म्हटले आहे.

इराणमधील भारतीयांना त्यांचे पासपोर्ट आणि ओळखपत्रांसह प्रवास आणि इमिग्रेशनची सर्व कागदपत्रे स्वतःजवळ तयार ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. कोणत्याही मदतीसाठी त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय दूतावासाने तातडीच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक आणि ईमेल जारी केला आहे: +९८९१२८१०९११५; +९८९१२८१०९१०९; +९८९१२८१०९१०२; +९८९९३२१७९३५९. ईमेल: [email protected]
इराणमधील GenZ चे आंदोलन
जानेवारीतील सरकारविरोधी रॅलींमध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या ४० दिवसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी इराणमध्ये पुन्हा नवीन आंदोलने सुरू झाली. त्यानंतर ही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, रविवारी राजधानी तेहरानमधील पाच विद्यापीठांमध्ये आणि मशहद शहरातील एका विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. एएफपी या वृत्तसंस्थेने शरीफ युनिव्हर्सिटीमधील निदर्शनांचा एक व्हिडिओ भौगोलिकदृष्ट्या पडताळून पाहिला आहे. यामध्ये मोठा जमाव पदच्युत राजेशाहीचा ध्वज फडकवणाऱ्या विद्यार्थ्यांभोवती जमून सरकारविरोधी घोषणाबाजी करताना दिसत आहे.

अमेरिका-इराण तणाव
अमेरिका आणि इराण यांच्यातील अणू चर्चेची पुढची फेरी गुरुवारी जिनिव्हा येथे होणार आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल-बुसैदी यांनी या चर्चेला दुजोरा दिला आहे. ओमानने यापूर्वी इस्लामिक रिपब्लिकच्या अणू कार्यक्रमावर अप्रत्यक्ष चर्चा आयोजित केली होती आणि गेल्या आठवड्यात जिनिव्हा येथील चर्चेच्या फेरीसाठी सहकार्य केले होते. दुसरीकडे, इराणसोबतच्या संभाव्य अणू करारावरील वाटाघाटी नाजूक टप्प्यावर असताना ट्रम्प प्रशासनाने मध्यपूर्वेकडे लष्करी विमानांची हालचाल वाढवली आहे. फ्लाईट ट्रॅकिंग डेटानुसार, या प्रदेशात कर्मचारी, दारूगोळा आणि उपकरणे घेऊन जाणाऱ्या विमानांचा ओघ सतत सुरू आहे.