तमिळनाडूतून ६ संशियत दहशतवाद्यांना अटक

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 h ago
तमिळनाडूतून ६ संशियत दहशतवाद्यांना अटक
तमिळनाडूतून ६ संशियत दहशतवाद्यांना अटक

 

तमिळनाडू

पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआय आणि बांगलादेशी दहशतवादी संघटनांच्या इशाऱ्यावर भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या एका मॉड्यूलचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तमिळनाडूतून सहा जणांना अटक केली असून पश्चिम बंगालमधून आणखी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचाही समावेश आहे.

मिझानूर रहमान, मोहम्मद शबात, उमर, मोहम्मद लिटन, मोहम्मद शाहीद आणि मोहम्मद उज्ज्वल अशी तमिळनाडूतून अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे आहेत. यातील दोघांना उथुकुली, तिघांना पल्लडम आणि एकाला तिरुमुरुगनपुंडी भागातून अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी बनावट आधार कार्डांच्या मदतीने आपली खरी ओळख लपवून तमिळनाडूमधील गारमेंट कारखान्यांमध्ये काम करत होते. कारवाईदरम्यान त्यांच्याकडून आठ मोबाईल फोन आणि सोळा सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत.

हे सर्व आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या समर्थनार्थ मजकूर प्रसारित करत होते. यातील चौघांच्या एका गटाने अलिकडेच दिल्लीत येऊन एआय समिटच्या वेळी एका मेट्रो स्टेशनवर 'फ्री काश्मीर' आणि इतर प्रक्षोभक पोस्टर्स लावली होती. त्यानंतर ते पुन्हा तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये पळून गेले होते. या आरोपींनी देशातील अनेक प्रमुख शहरांची पाहणी केल्याचा संशय पोलिसांना आहे.

या अटकेच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. लष्कर-ए-तैयबा ही दहशतवादी संघटना लाल किल्ला परिसर आणि चांदनी चौक येथील एका प्रमुख मंदिरावर आयईडी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची गुप्तचर माहिती मिळाली आहे. पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये ६ फेब्रुवारीला एका मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटाचा बदला घेण्यासाठी भारतात हा मोठा हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना रेल्वेने दिल्लीला आणले जात आहे. बांगलादेशी दहशतवादी संघटनांशी त्यांचे नेमके काय संबंध आहेत आणि त्यांनी भारतात आणखी कुठे कुठे हल्ल्याचा कट रचला होता याचा सविस्तर तपास आता दिल्ली पोलीस करत आहेत.