पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; धावपट्टी बंद असल्याने अनेक कंपन्यांची उड्डाणे रद्द

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर शुक्रवारी रात्री भारतीय हवाई दलाच्या एका विमानाला अपघात झाला. यामुळे पुण्याहून येणारी आणि जाणारी सर्व व्यावसायिक विमान वाहतूक विस्कळीत झाली, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका लढाऊ विमानाचे धावपट्टीवर उतरताना हार्ड लँडिंग झाले आणि ही घटना घडली.

एका निवेदनात हवाई दलाने स्पष्ट केले की, रात्रीच्या नियमित सरावादरम्यान ही स्थिती उद्भवली. सुदैवाने, यामधील वैमानिक आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत.

हवाई दलाने म्हटले आहे की, "भारतीय हवाई दलाच्या विमानाशी संबंधित एका घटनेमुळे पुणे विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. विमानातील कर्मचारी सुरक्षित असून नागरी मालमत्तेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. धावपट्टी पुन्हा सुरू करण्यासाठी आणि विमान सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत."

नंतर X वरील एका पोस्टद्वारे हवाई दलाने पुष्टी केली की, पुणे विमानतळाची धावपट्टी आता दुरुस्त करण्यात आली असून ती कार्यान्वित झाली आहे. सर्व आवश्यक सुरक्षा तपासणी आणि परवानग्या पूर्ण झाल्या आहेत. आता टप्प्याटप्प्याने विमान सेवा पुन्हा सुरू होत आहे.

विमानतळ आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान धावपट्टीला स्पर्श करत असताना त्याचे अंडरकॅरेज निकामी झाले असावे, ज्यामुळे धावपट्टी अडकून पडली. मात्र, याबाबतचा सविस्तर तांत्रिक तपशील अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, ही घटना रात्री सुमारे १०:२५ वाजता घडली. या घटनेनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून विमान वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली.

लोहगाव येथील हवाई दलाच्या तळावर नागरी उड्डाणे आणि लष्करी हालचाली अशा दोन्ही सेवा एकाच ठिकाणाहून चालतात. या घटनेमुळे व्यावसायिक विमानांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. हवाई दलाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) अधिकाऱ्यांनी अंदाज वर्तवला होता की, धावपट्टी मोकळी करून सेवा पूर्ववत करण्यासाठी सुमारे ४ ते ६ तास लागू शकतात. या काळात विमान कंपन्यांना विस्कळीत सेवेची कल्पना देण्यात आली आणि त्यानुसार विमान वेळापत्रकावर परिणाम झाला.

नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या परिस्थितीला दुजोरा दिला. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. धावपट्टी लवकरात लवकर मोकळी करण्यासाठी अधिकारी एकमेकांच्या संपर्कात असून सेवा विनाविलंब सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

रात्रभर संबंधित विमान हटवण्याचे आणि धावपट्टीच्या सुरक्षेची तपासणी करण्याचे काम सुरू होते. विमानतळ प्रशासन आणि हवाई दलाचे कर्मचारी समन्वयाने ही मोहीम राबवत होते.

विमान उड्डाणे आणि लँडिंगवर परिणाम
धावपट्टी बंद झाल्यामुळे १७ आणि १८ एप्रिल रोजी पुणे विमानतळावरील विमान सेवेवर मोठा परिणाम झाला. अनेक विमान कंपन्यांना आपली उड्डाणे रद्द करावी लागली. यामध्ये इंडिगोने सर्वाधिक म्हणजे ३१ येणारी आणि ३४ जाणारी विमाने रद्द केली. एअर इंडियाची येणारी ३ आणि जाणारी ३ उड्डाणे रद्द झाली. 

स्पाइसजेट आणि आकासा एअरची प्रत्येकी २ येणारी आणि ३ जाणारी उड्डाणे रद्द करण्यात आली. एअर इंडिया एक्सप्रेसने ५ येणारी आणि ५ जाणारी उड्डाणे रद्द केल्याचे कळवले आहे. या मोठ्या गोंधळामुळे प्रवाशांच्या प्रवासाचे नियोजन कोलमडले. विमान कंपन्या प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि विमानांचे फेरनियोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

इंडिगोकडून प्रवाशांना सूचना
पुणे विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद झाल्यानंतर इंडिगोने प्रवाशांसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. पुण्याहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या अनेक विमानांवर याचा परिणाम होऊ शकतो, असा इशारा कंपनीने दिला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या निवेदनात, विमानतळावर निघण्यापूर्वी प्रवाशांनी आपल्या विमानाची स्थिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

ज्या प्रवाशांच्या प्रवासावर परिणाम झाला आहे, ते पर्यायी विमानाचे बुकिंग करू शकतात किंवा त्यांच्या प्लॅन बी धोरणांतर्गत पूर्ण पैसे परत मिळवू शकतात. इंडिगोने म्हटले आहे की, त्यांचे पथक ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना अपडेट्स देत आहे. तसेच विमानतळ आणि ग्राहक सेवा कर्मचारी प्रवाशांच्या मदतीसाठी उपलब्ध आहेत.