FIFA World Cup 2026 Live: फुटबॉल चाहत्यांसाठी मोठी गूड न्यूज! भारतात 'या' चॅनलवर होणार फिफा विश्वचषकाचे थेट प्रक्षेपण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी अखेर एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित 'फिफा विश्वचषक २०२६' (2026 FIFA World Cup) चे भारतात थेट प्रक्षेपण होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जागतिक फुटबॉल नियामक संस्था (FIFA) आणि 'झी' (Zee) समूहाने सोमवारी याबाबतच्या प्रसारणाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार फुटबॉल महाकुंभ सुरू होण्यास अवघे १० दिवस शिल्लक असताना पार पडल्याने क्रीडाप्रेमींमधील संभ्रम आता दूर झाला आहे. ११ जून रोजी अमेरिकेत या भव्य स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाणारा हा विश्वचषक भारतात 'झी एंटरटेनमेंट'च्या नव्याने लाँच झालेल्या 'युनायटेड८ स्पोर्ट्स' (Unite8 Sports) नेटवर्कवर दूरदर्शनवर थेट पाहता येईल. तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर फुटबॉल चाहत्यांना 'झी ५' (Zee5) या ॲपवर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

२०२६ ते २०३४ पर्यंतच्या सर्व फिफा स्पर्धांचे प्रक्षेपण

फिफा आणि झी यांच्यात झालेला हा करार केवळ आगामी विश्वचषकापुरता मर्यादित नसून, तो २०३४ पर्यंतच्या सर्व प्रमुख फिफा स्पर्धांसाठी लागू असणार आहे. यामध्ये २०३० मध्ये मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये होणारा फिफा विश्वचषक, तसेच उरुग्वे, अर्जेंटिना आणि पॅराग्वे येथे होणारे शताब्दी विशेष सामने आणि २०२७ चा महिला फिफा विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धांचा समावेश आहे. फिफा आणि झी समूहाने एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, "हा भागीदारी करार भारतातील फुटबॉलची पोहोच वाढवण्यासाठी आणि क्रीडाप्रेमींना बहुभाषिक समालोचनासह थेट सामन्यांचा आनंद देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल."

या दीर्घकालीन भागीदारीअंतर्गत झी समूह पुढील ८ वर्षांच्या कालावधीत पुरुष, महिला आणि युवा गटातील एकूण ३९ फिफा स्पर्धांचे थेट प्रक्षेपण करणार आहे. यामध्ये फिफा अंडर-१७ विश्वचषक, फिफा अंडर-२० विश्वचषक, फिफा महिला अंडर-१७ आणि अंडर-२० विश्वचषक, फिफा फुट्सल विश्वचषक आणि फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप यांसारख्या प्रमुख स्पर्धांचा समावेश आहे. यासोबतच या स्पर्धांशी संबंधित माहितीपट आणि विशेष कार्यक्रमांचे हक्कही झी समूहाकडे राहतील.

भारतातील फुटबॉल प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे फिफाचे उद्दिष्ट

झी समूहाच्या भक्कम टेलिव्हिजन नेटवर्क आणि डिजिटल इकोसिस्टमचा वापर करून भारतातील वाढत्या फुटबॉल प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे आणि आपल्या स्पर्धांची दृश्यमानता वाढवणे हे या करारामागचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे फिफाने स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील वेळेनुसार सामने होणार असल्याने भारतातील प्रेक्षकांसाठी बहुतांश सामने रात्री आणि पहाटेच्या वेळी पाहावे लागणार आहेत. मात्र, झी मीडियाच्या डिजिटल आणि प्रादेशिक भाषांमधील प्रक्षेपणाच्या नियोजनामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील फुटबॉल प्रेमींना घरबसल्या या जागतिक थराराचा आनंद घेता येणार आहे.