मेवातमध्ये मुस्लिम कुटुंबांनी उघडले हिंदू तीर्थयात्रेकरूंसाठी घराचे दरवाजे!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
ब्रज ८४ कोस परिक्रमेसाठी निघालेले भाविक
ब्रज ८४ कोस परिक्रमेसाठी निघालेले भाविक

 

मन्सूरुद्दीन फरीदी 

हरियाणामधल्या नूह जिल्ह्यातील मेवात भागातून नुकतंच एक दिलासादायक चित्र समोर आलं आहे. आजच्या काळात हे चित्र एक नवी आशा जागवणारं आहे. आजकाल देशात जिथं-तिथं धर्म आणि अस्मितांवरून वाद होताना दिसतात. पण अशा गढूळ वातावरणातही मेवातच्या काही गावांनी माणुसकी, बंधुभाव आणि एकमेकांबद्दलच्या आदराचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या याच कृतीची चर्चा आता सर्वदूर होऊ लागली आहे.

'ब्रज ८४ कोस परिक्रमा' यात्रेदरम्यान मेवातच्या नेमका आणि बछोर या दोन गावांतल्या मुस्लिम कुटुंबांनी आपली घरं, शाळा आणि इतर सर्व साधनं हिंदू भाविकांसाठी खुली करून दिली. त्यांच्या या कृतीने यात्रेकरूंची मनं तर जिंकलीच, पण त्यासोबतच आणखी एक मोठा संदेशही दिला. तो म्हणजे, सामान्य माणसांची नाती आजही प्रेम आणि विश्वासाच्या मजबूत धाग्यावर टिकून आहेत.

सध्या ब्रज मंडल यात्रा याच मेवात भागातून मार्गक्रमण करत आहे. हजारो भाविक या यात्रेत सहभागी झाले आहेत. अशा मोठ्या प्रवासात राहण्याची, जेवण्या-खाण्याची आणि विश्रांतीची सोय करणं, हे सगळ्यात मोठं जिकिरीचं काम असतं. पण अशा वेळी स्थानिक ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेत ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि आलेल्या यात्रेकरूंचा घरच्या पाहुण्यांसारखा पाहुणचार केला.

नेमका गावात राहणारे आणि 'डीसीएम पब्लिक स्कूल'चे संस्थापक आरिफ खान हे या सेवाकार्यातला एक प्रमुख चेहरा आहेत. त्यांनी आपल्या शाळेच्या सर्व खोल्या यात्रेकरूंसाठी विनासंकोच उपलब्ध करून दिल्या. एवढंच नाही, तर त्यांनी स्वतःचं राहतं घरही चक्क भाविकांच्या हवाली केलं आणि ते स्वतः आपल्या कुटुंबासोबत गावातल्याच दुसऱ्या एका घरात राहायला गेले.

शाळेच्या संपूर्ण आवारात शेकडो भाविकांच्या राहण्याची चोख सोय करण्यात आली होती. खोल्यांमध्ये वीज, पंखे, पिण्याचं पाणी आणि इतर सर्व गरजेच्या सुविधांची पुरेपूर काळजी घेतली गेली. दिवसभर पायपीट करून आलेल्या भाविकांना जरा निवांत वाटेल आणि त्यांचा थकवा दूर होईल, यासाठी स्थानिक लोक दिवस-रात्र राबत होते.

याबद्दल आरिफ खान यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, प्रवासात अनेकदा नवखे भाविक रात्री-अपरात्री येऊन पोहोचतात. अशा वेळी त्यांची सगळी टीम या यात्रेकरूंसाठी झोपायला जागा आणि इतर सुविधा तत्परतेने पुरवते. घरी आलेल्या पाहुण्यांची सेवा करणं, हाच माणुसकीचा खरा धर्म आहे, अशी त्यांची ठाम धारणा आहे.

या यात्रेकरूंसाठी त्यांनी स्वतःच्या घरचं स्वयंपाकघरही मोकळं करून दिलं. पीठ, दूध, चहा आणि इतर लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तू त्यांना पुरवण्यात आल्या. अगदी मोबाईल चार्ज करण्यापासून ते त्यांच्या मुक्कामात कसलीही अडचण येऊ नये, इथपर्यंतच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींची पुरेपूर काळजी घेण्यात आली.

यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांनीही या सर्व व्यवस्थेचं अगदी भरभरून कौतुक केलं. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणामधून आलेल्या अनेक भाविकांनी एक गोष्ट प्रकर्षाने नमूद केली, ती म्हणजे इथे त्यांना कुठलाही दुजाभाव जाणवला नाही. उलट, स्थानिक मुस्लिम कुटुंबांनी त्यांना आपल्याच घरातल्या माणसांसारखी वागणूक दिली.

एका महिला भाविकाने तर अगदी भावनिक होऊन सांगितलं, "माणुसकी आणि प्रेम हाच जगातला सर्वात मोठा धर्म आहे." गावातल्या लोकांनी ज्या जिव्हाळ्याने त्यांचं स्वागत केलं, त्यामुळे तिच्या मनातली मेवातबद्दलची जुनी प्रतिमा पार पुसून गेली असून, आता एक नवी आणि सकारात्मक ओळख निर्माण झाली आहे. याच नेमका गावात राहणाऱ्या मुश्ताक खान यांनीही आपल्या घराचे दरवाजे यात्रेकरूंसाठी सताड उघडे केले. आलेल्या भाविकांना कसलाही त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने स्वतःचं घर सोडून दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या घराच्या दोन्ही मजल्यांवर यात्रेकरूंची सोय करण्यात आली होती. काही महिला भाविक तिथेच सर्वांसाठी मिळून अगदी हसत-खेळत जेवण बनवताना दिसत होत्या, तर गावातली अनेक मंडळी त्यांच्या सेवेत मग्न होती. हे सगळं वातावरण बघून तो एखादा धार्मिक कार्यक्रम वाटण्यापेक्षा, एखाद्या मोठ्या कौटुंबिक सोहळ्यासारखं वाटत होतं.

मध्य प्रदेशातल्या सागरवरून आलेल्या सविता यांनीही असाच एक सुखावणारा अनुभव सांगितला. त्यांच्या तेरा जणांच्या पूर्ण ग्रुपला इथे राहायला उत्तम जागा मिळाली. सामानासाठी जागा दिली गेली, जेवण बनवण्यात गावकरी मदत करत होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्थानिक लोकांनी त्यांना आपण 'बाहेरचे' आहोत, याची जराही जाणीव होऊ दिली नाही.

नीरज कुमार शर्मा या भाविकानेही असंच मत मांडलं. "जर स्थानिक मुस्लिम कुटुंबांनी आम्हाला साथ दिली नसती, तर एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांची सोय करणं काही सोपं काम नव्हतं," असं ते म्हणाले. हा अनुभव आपल्या आयुष्यातल्या कायम स्मरणात राहणाऱ्या क्षणांपैकी एक असेल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

दुसरीकडे, बछोर गावातही असाच एक बंधुभावाचा हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला. या दृश्याने तिथे उपस्थित असलेल्या अनेकांचे डोळे पाणावले. 'ब्रज ८४ कोस परिक्रमा' सुरू करण्यापूर्वी वकील परशुराम गौतम यांनी गावातले एक ज्येष्ठ मुस्लिम नागरिक इक्बाल जेलदार यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले.

तिथे हजर असणाऱ्या सर्वांसाठीच हा क्षण खूप खास होता. परशुराम गौतम भरल्या अंतःकरणाने म्हणाले, "माझ्या आयुष्यात इक्बाल जेलदार यांची जागा फार मोठी आहे. त्यांनी मला नेहमीच योग्य वाट दाखवली आणि अगदी पित्यासारखं प्रेम दिलं."

पुढे ते असंही म्हणाले की, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यात नंदबाबांचं अढळ स्थान होतं, तसंच स्थान माझ्या आयुष्यात इक्बाल जेलदार यांचं आहे. त्यामुळेच, या यात्रेला निघण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. हे ऐकून इक्बाल जेलदार यांचेही डोळे पाणावले. त्यांनी परशुराम यांना कडकडून मिठी मारली आणि त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी दुवा मागितली. एवढंच नाही, तर प्रेमाचं प्रतीक आणि एक वडीलधारा म्हणून त्यांनी त्यांना एक हजार रुपयांची छोटीशी भेटही दिली.

स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार, मेवातची माती ही सामायिक संस्कृती, एकमेकांबद्दलचा आदर आणि सामाजिक सलोख्यासाठी ओळखली जाते. पिढ्यानुपिढ्या इथला हिंदू आणि मुस्लिम समाज एकमेकांचे सण-वार, सुख-दुःख आणि घरगुती कार्यक्रमांमध्ये आनंदाने सहभागी होत आला आहे.

ब्रज मंडल यात्रेच्या निमित्ताने समोर आलेली ही चित्रं त्याच जुन्या परंपरेची जिवंत साक्ष देतात. समाजाची खरी ताकद ही धर्माच्या नावावर उभ्या केलेल्या भिंतींमध्ये नसून, लोकांची मनं जोडणाऱ्या या रेशमी नात्यांमध्येच दडलेली असते, हेच या गावकऱ्यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

'ब्रज ८४ कोस परिक्रमा' ही प्रामुख्याने भगवान श्रीकृष्णाशी संबंधित असणाऱ्या पवित्र स्थानांची यात्रा मानली जाते. नूह इथल्या नल्हड मंदिरातून या यात्रेला सुरुवात होते, आणि मग अनेक धार्मिक स्थळांना भेटी देत ती सिंगार या भागापर्यंत जाऊन पोहोचते. 'विश्व हिंदू परिषद' हे या यात्रेच्या प्रमुख आयोजकांपैकी एक आहेत.

हेही वाचा : विठूरायाच्या पंढरीत हिंदू-मुस्लिम सलोख्याची एकादशी

यावर्षीच्या यात्रेच्या निमित्ताने मेवातून जो एक मोठा संदेश देशभर गेला आहे, तो केवळ एका धार्मिक कार्यक्रमापुरता नक्कीच मर्यादित नाहीये. हा संदेश आहे परस्परांवरच्या विश्वासाचा, हा संदेश आहे आपल्या सामायिक वारशाचा! आणि या सगळ्यातून वरचा असा, हा संदेश आहे की माणुसकी आजही तितकीच जिवंत आहे.

नेमका आणि बछोर गावातल्या लोकांनी एक अत्यंत सोपी पण महत्त्वाची गोष्ट जगाला दाखवून दिली आहे. जर माणसाचं मन मोठं असेल, तर घराचे दरवाजे आपोआप उघडले जातात. खऱ्या अर्थाने हीच मेवातची खरी ओळख आहे आणि आपल्या भारताच्या 'विविधतेत एकता' असलेल्या सामायिक संस्कृतीचं हेच सर्वात विलोभनीय चित्र आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter