PAPER LEAK PROTEST: उपोषण मागे घेण्यास सोनम वांगचुक यांचा नकार; २० जुलैला संसद मार्चसाठी केले आवाहन.

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 Months ago
'उपोषण मागे घेणार नाही', सोनम वांगचुक यांचा ठाम पवित्रा
'उपोषण मागे घेणार नाही', सोनम वांगचुक यांचा ठाम पवित्रा

 

नवी दिल्ली 

नीट (NEET) परीक्षेत झालेल्या कथित अनियमिततेच्या विरोधात जंतरमंतरवर उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राजकीय नेते आणि हितचिंतकांकडून उपोषण मागे घेण्याबाबत सातत्याने विनंत्या येत असल्या, तरी सरकारकडून जोपर्यंत ठोस उत्तर मिळत नाही, तोपर्यंत उपोषण संपवणे चुकीचा संदेश देणारे ठरेल, अशी भूमिका वांगचुक यांनी घेतली आहे.

उपोषणाचा १८ वा दिवस पूर्ण झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा एका व्हिडिओ संदेशाद्वारे वांगचुक यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधला. "जर मी आज उपोषण सोडले, तर सरकारला वाटेल की आंदोलक येतात आणि निघून जातात, त्यांना उत्तरदायित्वाची गरज नाही. त्यामुळे उपोषण मागे घेण्यापेक्षा २० जुलै रोजी होणाऱ्या संसद मार्चला अधिक बळ द्या," असे आवाहन त्यांनी केले.

प्रकृतीबाबत दिली स्पष्टोक्ती

आपल्या आरोग्याबाबत निर्माण झालेली चिंता दूर करताना वांगचुक म्हणाले की, आतापर्यंत केलेल्या वैद्यकीय तपासण्यांमध्ये तात्काळ कोणताही धोका दिसून आलेला नाही. "माझी प्रकृती अशी नाही की मी दोन-चार दिवसांत मरणार आहे. माझे ईसीजी (ECG) रिपोर्टही फारसे खराब नाहीत. शरीरात कमजोरी असली, तरी मी आणखी काही दिवस उपोषण सुरू ठेवू शकतो," असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

२० जुलैच्या संसद मार्चवर भर

वांगचुक यांनी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना २० जुलै हा दिवस 'अनुभवात्मक शिक्षणाचा' दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांनी या दिवशी 'संसद मार्च'मध्ये सहभागी होऊन लोकशाही आणि राज्यशास्त्राचा प्रत्यक्ष धडा घ्यावा, असेही ते म्हणाले. कॉकरोच जनता पार्टीने (CJP) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २० जुलै रोजी 'चलो संसद' मार्चची घोषणा केली आहे. या मार्गाद्वारे आपण आपल्या मागण्या संसदेपर्यंत पोहोचवू आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने हा विषय योग्य हातांत गेल्याचे आपल्याला वाटेल, असे वांगचुक यांनी स्पष्ट केले.



Latest News