नारको-टेरर प्रकरणात १० जणांविरुद्ध आरोप; लश्कर-ए-तोयबाच्या नेटवर्कचा पर्दाफाश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 15 h ago
जम्मू-काश्मीरमधील नारको-टेरर प्रकरणात १० आरोपींविरुद्ध एनआयए न्यायालयाकडून आरोप निश्चित
जम्मू-काश्मीरमधील नारको-टेरर प्रकरणात १० आरोपींविरुद्ध एनआयए न्यायालयाकडून आरोप निश्चित

 

श्रीनगर

जम्मू-काश्मीरमधील अमली पदार्थांच्या तस्करीच्या माध्यमातून दहशतवादाला रसद पुरवणाऱ्या (नारको-टेरर) एका महत्त्वाच्या प्रकरणात येथील विशेष एनआयए (NIA) न्यायालयाने १० आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. यामध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाच्या (LeT) पाकिस्तानस्थित हँडलर्सचाही समावेश आहे.

राज्य तपास संस्थेने (SIA) ऑक्टोबर २०२२ मध्ये दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. सीमेपलीकडून अमली पदार्थांची तस्करी करून त्यातून मिळणारा काळा पैसा जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना बळकट करण्यासाठी आणि दहशतवादाचे जाळे (terror ecosystem) वाढवण्यासाठी वापरला जात असल्याचा दावा एसआयएने केला आहे.

या प्रकरणात एकूण १६ आरोपींची ओळख पटली असून, त्यापैकी १० जणांना अटक करण्यात आली आहे. यात रुबीना नाझीर मलिक, इश्फाक अहमद मीर, मुदस्सिर अहमद पोसवाल, सफीर अहमद मुघल, मोहम्मद रशीद ठक्कर, मोहम्मद रियाझ लोहार, जावेद इक्बाल ठक्कर, अब्दुल रशीद मीर, अब्दुल रशीद भट आणि बशारत अली पोसवाल यांचा समावेश आहे. कुपवाडा येथील सगीर अहमद पोसवाल हा फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

याव्यतिरिक्त, पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेले चार हँडलर्स — तारिक अहमद मलिक, अलीफ-उद-दिन बडाना, मुश्ताक अहमद नाईक आणि फिरदौस अहमद दार — हे देखील आरोपी आहेत. एसआयएने १६ आरोपींविरुद्ध सहा व्यापक आरोपपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये भारता सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, दहशतवादी कारवाया आणि निधी उभारणे यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे. तसेच, दहशतवादी कारवायांशी संबंधित मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.