सेनापती/इम्फाळ
मणीपूरच्या सेनापती जिल्ह्यात एका सर्च ऑपरेशननंतर संतप्त जमावाने आसाम रायफल्सच्या तळावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जमावाने कॅम्पवर दगडफेक केली आणि सुरक्षारक्षकांच्या तीन वाहनांना आगीच्या स्वाधीन केले. मध्यरात्रीपर्यंत सुरक्षा दलांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले असून, सध्या परिस्थिती शांत आणि नियंत्रणात आहे.
ऑपरेशन आणि संघर्ष
आसाम रायफल्सला मकुइलॉन्गडी परिसरात सशस्त्र गटांच्या हालचालींची माहिती मिळाली होती. हे ठिकाण ओकलॉन्ग येथील 'एनएससीएन (आयएम)' शिबिराच्या जवळ आहे. शस्त्रे आणि गणवेशधारी सशस्त्र केडर फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर आसाम रायफल्सने 'एरिया डॉमिनेशन' आणि सर्च ऑपरेशन सुरू केले होते. दरम्यान, ओकलॉन्ग गावात स्थानिक रहिवाशांनी सुरक्षा दलांच्या कॉलमला अडवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तणाव वाढला.
वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ
तणाव वाढल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास सेनापती शहरातील मोठा जमाव आसाम रायफल्सच्या कॅम्पच्या दिशेने निघाला. साडेनऊच्या सुमारास तळावर पोहोचलेल्या जमावाने दगडफेक केली आणि मालमत्तेचे नुकसान केले. आंदोलकांनी एका लहान वाहनाला आणि एका खाजगी कारला आग लावली, तर दोन ट्रक उलटवून त्यांचे नुकसान केले. कॅम्पसमोरील एक वेटिंग शेडही जमावाने पेटवून दिली.
या प्रकरणी तातडीने स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफची मदत घेण्यात आली. मणिपूर पोलिसांच्या समन्वयाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मणीपूरमध्ये तीन वर्षांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारामुळे सुरक्षा दलांकडून संवेदनशील भागात सातत्याने सर्च ऑपरेशन्स राबवली जात आहेत.