म्यानमार
म्यानमारमधील रोहिंग्या अल्पसंख्याक समुदायाला घेऊन जाणाऱ्या दोन नौका बंगालच्या उपसागरात बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित उच्चायुक्त (UNHCR) आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने (IOM) या वृत्ताला दुजोरा दिला असून, या घटनेमुळे मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जूनच्या अखेरीस या दोन नौका म्यानमारच्या रखाइन राज्यातून निघाल्या होत्या. पहिल्या नौकेत २५०, तर दुसऱ्या नौकेत २८० प्रवासी होते. ८ जुलै रोजी म्यानमारच्या आय्येरवाडी किनारपट्टीजवळ दुसरी नौका बुडाल्याचा अंदाज आहे. मान्सून आणि समुद्रातील धोकेदायक स्थितीमुळे या काळात रोहिंग्या लोक सहसा असा प्रवास टाळतात, मात्र परिस्थितीमुळे त्यांना हा धोका पत्करावा लागला.
सुमारे १२ लाख रोहिंग्या निर्वासित सध्या बांगलादेशातील निर्वासित छावण्यांमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत राहत आहेत. म्यानमारमधील लष्करी संघर्ष आणि परदेशी मदतीत झालेली कपात यामुळे हे लोक हतबल होऊन मलेशियाच्या दिशेने जीवघेणा सागरी प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत.
२०२५ हे वर्ष रोहिंग्या निर्वासितांसाठी सर्वाधिक जीवघेणे ठरले असून, त्यात ६,५०० हून अधिक लोकांनी म्यानमार सोडले होते आणि सुमारे ९०० जण बेपत्ता किंवा मृत झाले होते. ही जगातील सर्वात धोकादायक सागरी मार्गांपैकी एक आहे. या दुर्घटनेनंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने मदतकार्य आणि शोधमोहीम राबवण्याची गरज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.