आज संपूर्ण देशभरात बकरी ईद म्हणजेच ईद-उल-अजहा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. पण याच काळात महाराष्ट्रातील एका पावन भूमीतून सुखावणारी बातमी समोर आलीये. सणांच्या काळात काही समाज घटकांकडून वातावरण बिघडवले जात असताना, संतभूमी पंढरपूरने मात्र संपूर्ण जगाला सौहार्दाचा संदेश दिलाय.
यंदा बकरी ईदचा मुख्य दिवस आणि हिंदू धर्मीयांची अत्यंत पवित्र मानली जाणारी एकादशी एकाच दिवशी आली होती. हिंदू कॅलेंडरनुसार ११ व्या चंद्रदिनी येणारी एकादशी म्हणजे उपवास, नामस्मरण, आत्मपरीक्षण आणि शरीर-मन शुद्ध करण्याचा अत्यंत पावन काळ. अशा या पवित्र दिवशी पंढरपुरात लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी वारी करून येतात. या वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा आदर राखत, पंढरपुरातील मुस्लिम समाजाने यंदा बकरी ईदच्या दिवशी दिली जाणारी पारंपरिक कुर्बानी न देण्याचा एकमुखी निर्णय घेतलाय.
'आधी विठूरायाच्या वारकऱ्यांचा मान, मग आमचा सण!'
पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे वारकरी संप्रदायाचे मुख्य श्रद्धास्थान आहे. विठ्ठलाचे वारकरी एकादशीच्या काळात त्याठिकाणी भक्तीच्या रंगात रंगलेले असतात. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत मुक्ताबाई यांच्या समतेच्या विचारांवर चालणारा हा मोठा परिवार आहे. अशा या वारकऱ्यांची एकादशीच्या दिवशी कोणतीही गैरसोय होऊ नये, शहरात कुठेही मांसाहार किंवा रक्ताचा अंश दिसू नये, यासाठी येथील मुस्लिम समाजाने अनेक दशककांची आपली जुनी परंपरा यंदाही मोठ्या अभिमानाने जपली आहे.
याविषयी पंढरपूरचे स्थानिक रहिवासी इब्राहिम बोहरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना समाजाची भावना मांडली. ते म्हणाले, "दर तीन वर्षांनी हिंदू पंचांगात एक पवित्र अधिक मास येतो. या काळात आणि प्रत्येक एकादशीला लाखो विठ्ठलभक्त आणि वारकरी पंढरपुरात दाखल होतात. काल एकादशी असल्यामुळे आमच्या संपूर्ण मुस्लिम समाजाने मिळून निर्णय एक निर्णय घेतला. मुख्य दिवशी शहरात कुठेही कुर्बानी दिली जाणार नाही. आम्ही आमची ईदची विशेष नमाज अदा करू, पण प्राण्यांची कुर्बानी मात्र पुढील काही दिवसांनंतर देऊ."
ते पुढे म्हणाले, "पंढरपूर हे वेगवेगळ्या संस्कृतींचे आणि धर्माचे शहर आहे. आम्ही सर्वजण इथे पिढ्यानपिढ्या अत्यंत गुण्यागोविंदाने आणि शांततेत राहत आलो आहोत. आम्हाला इथल्या प्रत्येक नागरिकाच्या आणि वारकऱ्याच्या श्रद्धेचा मनापासून आदर करायचा आहे."
चंद्रभागेच्या वाळवंटातील सौहार्द
पंढरपूरमधून समोर आलेले हे चित्र म्हणजे देशातील गंगा-जमुना संस्कृतीचे सर्वात सुंदर उदाहरण आहे. एका बाजूला विठ्ठलाचे नाव ओठावर घेऊन येणारा वारकरी आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या स्वागतासाठी आपल्या सणाची मुख्य प्रथा पुढे ढकलणारा मुस्लिम बांधव! हा मेळ खरोखरच आजच्या काळात डोळ्यात अंजन घालणारा आहे.
इथल्या वारकरी संप्रदायाने कधीही जातीपातीचे राजकारण मानले नाही. इथे सर्व लोक गुण्यागोविंदाने नांदतात. सुफी संतांच्या दर्ग्यावर जसा हिंदू बांधव चादर चढवतो, अगदी तसेच विठूरायाच्या पंढरीत मुस्लिम समाज वारकरी माऊलींची सेवा करतो. आजच्या या घडीला जेव्हा सोशल मीडियावर अनेकदा किरकोळ कारणावरून वाद उकरले जातात, अशा वेळी पंढरपूरच्या मुस्लिमांनी घेतलेला निर्णय आदर्श आहे.