Ramzan Special : इफ्तारसाठी पुण्यातील काही बेस्ट ठिकाणे!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

रमजानचा पवित्र महिना सुरू झाला असून पुण्याच्या वातावरणात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. उपवासाच्या काळात सायंकाळच्या वेळी इफ्तारसाठी पुण्यातील विविध खाद्यगल्ल्या सजल्या आहेत. केवळ मुस्लिमच नव्हे, तर पुण्यातील तमाम खवय्ये या दिवसांत रमजानच्या खास पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. कबाब, बिर्याणी, हलीम आणि मालपुआ अशा वैविध्यपूर्ण पदार्थ चाखण्यासाठी पुण्याचे रस्ते गजबजून गेले आहेत. तुम्हीही या रमजानमध्ये चविष्ट पदार्थांच्या शोधात असाल, तर पुण्यातील या खास ठिकाणांना नक्कीच भेट द्यायला हवी.

कॅम्प परिसर (एम.जी. रोड)
 

पुण्यातील रमजान खाद्यसंस्कृतीचा हा सर्वात मोठा केंद्रबिंदू मानला जातो. एम.जी. रोड आणि आसपासच्या गल्ल्यांमध्ये सायंकाळपासूनच कोळशावर भाजल्या जाणाऱ्या पदार्थांचा खमंग सुवास दरवळू लागतो. येथे रात्री उशिरापर्यंत कबाब, बिर्याणी आणि विविध उत्सवी मिठाईचे स्टॉल्स खवय्यांचे स्वागत करतात. कोळशाच्या धगीवर शिजणारे सीख कबाब आणि त्यावर मारलेला लोण्याचा तवका खवय्यांच्या पसंतीस पडतो. गोड खाण्याची आवड असणाऱ्यांसाठी येथील मालपुआ आणि रबडी हे समीकरण पर्वणीच ठरते. एम.जी. रोडवर मिळणारे चिकन रोल्स आणि थंडगार फिरनी ही तर खवय्यांची पहिली पसंती असते.

कौसरबाग, कोंढवा
 
 
पुण्यातील रमजानच्या प्रमुख खाद्य केंद्रांपैकी हे एक भव्य ठिकाण आहे. इथली खाद्ययात्रा म्हणजे मुघलाई पदार्थांचा खजिनाच जणू. कोंढव्यातील हलीम तर इतके प्रसिद्ध आहे की ते चाखण्यासाठी तासन् तास रांगा लागतात. अनेक तास घोटून तयार केलेले मटण हलीम आणि त्यासोबतचा तळलेला कांदा चवीची उंचीचं गाठतो. याशिवाय येथील गल्लीबोळात मिळणारे खुसखुशीत चिकन शोरमा आणि रसरशीत ग्रील्ड चिकन खवय्यांच्या जिभेवर दीर्घकाळ रेंगाळते.

भवानी पेठ
 

इफ्तारच्या वेळी भवानी पेठेतील रस्ते चैतन्याने न्हाऊन निघतात. हे ठिकाण प्रामुख्याने आपल्या अस्सल बिर्याणी आणि खमंग समोशांसाठी ओळखले जाते. येथे मिळणारी चिकन बिर्याणी हि त्याच्यातील मसाले आणि तांदळाच्या योग्य मिश्रणामुळे वेगळी ठरते. तसेच येथील खिमा समोसा हा पदार्थ घरोघरी इफ्तारसाठी नेला जातो. चविष्ट रस्सेदार भाज्या आणि नानाविध प्रकारच्या करी हे येथील आणखी एक वैशिष्ट्य असून येथील मसाल्यांचा स्वाद घरगुती वाटतो.

मोमीनपुरा

 
रमजानच्या काळात मोमीनपुऱ्यात पाय ठेवला की आपण एखाद्या वेगळ्याच विश्वात आल्याचा भास होतो. येथे कबाबच्या अनेक प्रकारांची रेलचेल असते. कोळशावर भाजलेले सीख कबाब खाण्यासाठी दूरदूरहून लोक येतात. जेवणानंतर मिळणारा शाही तुकडा येथील मेजवानीला पूर्णत्व देतो. मिठाईच्या दुकानांमध्ये मिळणारे इतर गोड पदार्थ आणि येथील रात्रीचे चैतन्य काही औरच असते.

वानवडी आणि हडपसर
 

वानवडी परिसर अलीकडच्या काळात खवय्यांचे नवीन आवडते ठिकाण म्हणून उदयास आले आहे. येथे रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. येथील हलीम आणि तंदूरी चिकनचा स्वाद घेण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने येते. दुसरीकडे हडपसर भागातील इफ्तार बाजारही आता बराच विस्तारला आहे. येथे मुघलाई डिशेस सोबतच विविध प्रकारचे शोरमा आणि चिकन टिक्का प्लॅटर्स अत्यंत लोकप्रिय आहेत. येथील पदार्थांमध्ये मिळणारा मसाल्यांचा योग्य समतोल खवय्यांना पुन्हा पुन्हा येथे खेचून आणतो.

कोरेगाव पार्क
 

ज्यांना रमजानच्या पारंपरिक चवीसोबतच थोडा आधुनिक माहोल हवा आहे, त्यांच्यासाठी कोरेगाव पार्क हे उत्तम ठिकाण आहे. येथे पारंपरिक पद्धतीने बनवलेली चिकन बिर्याणी आणि त्याच जोडीला मिळणारा गरमागरम मालपुआ एका वेगळ्याच अंदाजात पेश केला जातो. येथील वातावरण आणि रात्री उशिरापर्यंत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे हे ठिकाण तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय झाले आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter