नवी दिल्ली
भारताच्या यजमानपदाखाली राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या पाच दिवसांच्या 'एआय इम्पॅक्ट समिट २०२६'चा (AI Impact Summit 2026) शनिवारी 'नवी दिल्ली घोषणापत्रा'च्या (New Delhi Declaration) स्वीकृतीसह यशस्वी समारोप झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाचा लाभ केवळ मोजक्या देशांपुरता मर्यादित न राहता तो मानवतेच्या कल्याणासाठी सर्वांपर्यंत पोहोचावा, या भारताच्या 'एआय फॉर ऑल' (AI for All) या भूमिकेला जगातील ८८ देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी आपले समर्थन दिले आहे.
'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' या तत्त्वावर आधारित असलेल्या या घोषणापत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर आर्थिक वाढ आणि सामाजिक हितासाठी करण्यावर एकमत झाले आहे. भारत, अमेरिका, चीन, फ्रान्स आणि युरोपियन युनियनसह अनेक प्रमुख देशांनी यावर स्वाक्षरी केली आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात प्रगत आणि विकसनशील देशांमधील दरी कमी करण्यासाठी हे घोषणापत्र मैलाचा दगड ठरेल, असे मानले जात आहे.
नवी दिल्ली घोषणापत्राची रचना सात मुख्य स्तंभांवर (ज्याला 'सात चक्रे' असे संबोधले गेले आहे) करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मानवी भांडवल विकास, सामाजिक सक्षमीकरणासाठी प्रवेश, सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय प्रणाली, ऊर्जा-कार्यक्षम एआय, विज्ञानातील एआयचा वापर, एआय संसाधनांचे लोकशाहीकरण आणि आर्थिक वाढीसाठी एआयचा वापर यांचा समावेश आहे. या माध्यमातून एआय तंत्रज्ञान अधिक सुलभ आणि परवडणारे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या शिखर परिषदेत अनेक महत्त्वाचे जागतिक उपक्रम जाहीर करण्यात आले आहेत. यात 'चार्टर फॉर द डेमोक्रॅटिक डिफ्यूजन ऑफ एआय' आणि 'ग्लोबल एआय इम्पॅक्ट कॉमन्स' यांसारख्या व्यासपीठांचा समावेश आहे, ज्याद्वारे विविध देश आपल्याकडील यशस्वी एआय प्रयोगांची देवाणघेवाण करू शकतील. विशेष म्हणजे, या समिटमध्ये सुमारे २५० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची आश्वासने मिळाली असून, २० अब्ज डॉलर्स 'डीप टेक' संशोधनासाठी जाहीर करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समिटदरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. एआय तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारताने या समिटच्या माध्यमातून ग्लोबल साउथमधील (विकसनशील देश) देशांचा आवाज जागतिक व्यासपीठावर प्रभावीपणे मांडला आहे.
या शिखर परिषदेत तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज सुंदर पिचाई, सॅम ऑल्टमन आणि बिल गेट्स (व्हर्च्युअली) यांच्यासह जगातील ३,५०० पेक्षा जास्त तज्ज्ञांनी सहभाग घेतला. राजकीय वाद आणि काही आंदोलने झाली असली, तरी तांत्रिक आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून ही परिषद भारतासाठी अत्यंत यशस्वी ठरली आहे.