पाकिस्तानच्या सैन्याने अफगाणिस्तानच्या सीमेजवळील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईत किमान ७० दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानात अलीकडेच झालेल्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचे सैन्याने म्हटले आहे. मात्र, काबुलमधील तालिबान नेतृत्वाने हा दावा फेटाळून लावला आहे.
पाकिस्तानचे गृहराज्यमंत्री तलाल चौधरी यांनी 'जिओ न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत कोणताही पुरावा न देता ७० दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले. पाकिस्तानच्या सरकारी माध्यमांनी नंतर हा आकडा ८० वर पोहोचल्याचे वृत्त दिले, परंतु या आकडेवारीला पुष्टी देणारा कोणताही पुरावा देण्यात आला नाही.
अफगाणिस्तानची भूमिका
अफगाण सरकारचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या हद्दीत हे हल्ले केल्याचा दावा केला आहे. त्यांनी एक्सवर लिहिले की, नंगरहार आणि पक्तीका प्रांतातील नागरी भागांना लक्ष्य करण्यात आले असून यात महिला आणि मुलांसह डझनभर लोक मारले गेले व जखमी झाले. ७० दहशतवादी मारल्याचा पाकिस्तानचा दावा चुकीचा असल्याचे सांगत मुजाहिद यांनी स्पष्ट केले की, आपल्या देशातील सुरक्षेतील उणिवा झाकण्यासाठी पाकिस्तानने हे हल्ले केले आहेत.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानेही पूर्व अफगाणिस्तानमधील नंगरहार आणि पक्तीका प्रांतातील "विविध नागरी भागांवर" हल्ले झाल्याचे म्हटले आहे. यात एक धार्मिक मदरसा आणि अनेक घरांना फटका बसला आहे. हे हल्ले अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचे आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे निवेदनात म्हटले आहे. नंगरहार प्रांतातील अफगाण रेड क्रिसेंट सोसायटीचे प्रांतीय संचालक मौलवी फजल रहमान फैयाज यांनी १८ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगितले. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी काबुलमधील पाकिस्तानच्या दूतांना पाचारण केले. अफगाणिस्तानच्या भूभागाचे रक्षण करणे ही इस्लामिक अमिरातीची "शरिया जबाबदारी" असून अशा हल्ल्यांच्या परिणामांना पाकिस्तान जबाबदार असेल, असा इशारा मंत्रालयाने दिला आहे.
पाकिस्तानची भूमिका
पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांच्या मते, सैन्याने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानी तालिबान आणि त्यांच्याशी संबंधित सात तळांवर "गुप्त माहितीवर आधारित निवडक मोहिमा" राबवल्या. सीमावर्ती भागात इस्लामिक स्टेटशी संबंधित एका गटालाही लक्ष्य केल्याचा दावा तरार यांनी केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इस्लामाबादमधील शिया मशिदीवर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात ३१ भाविकांचा मृत्यू झाला होता. यासह अलीकडील सर्व हल्ले अफगाणिस्तानमधील नेतृत्व आणि हँडलर्सच्या सांगण्यावरून झाल्याचे "ठोस पुरावे" पाकिस्तानकडे असल्याचे तरार यांनी सांगितले. इस्लामाबादने नेहमीच प्रादेशिक शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत, परंतु पाकिस्तानी नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
दहशतवादाशी पाकिस्तानचा संघर्ष
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातील बहुतेक हल्ल्यांसाठी 'तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) आणि प्रतिबंधित बलुच फुटीरतावादी गटांना जबाबदार धरले जाते. टीटीपी हा अफगाण तालिबानशी जवळचा मित्र असला तरी तो वेगळा गट आहे. टीटीपी अफगाणिस्तानमधून आपले कार्य चालवते असा आरोप इस्लामाबाद करत आहे, मात्र अफगाण सरकार आणि टीटीपी दोघेही हा आरोप फेटाळतात.
पाकिस्तानच्या वायव्य सीमेवरील बन्नू जिल्ह्यात सुरक्षा ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर काही तासांतच हे हल्ले करण्यात आले. या आत्मघाती हल्ल्यात एका लेफ्टनंट कर्नलसह दोन जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने इशारा दिला होता की, ते आता कोणताही संयम बाळगणार नाहीत आणि जबाबदार असलेल्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहील. गेल्या आठवड्यात खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातही दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा चौकीवर धडकवले होते, ज्यात ११ जवान आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता. हा हल्ला करणारा अफगाण नागरिक असल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी नंतर सांगितले.
ऑक्टोबर २०२५ मध्येही पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. त्यावेळीही तालिबानने नागरी वस्तीवर हल्ले झाल्याचे म्हटले होते. कतारच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली होती, परंतु नोव्हेंबरमध्ये इस्तंबूलमध्ये झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांत कोणताही औपचारिक करार होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध आजही तणावपूर्ण आहेत.