बारामती येथील लिअरजेट ४५ विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारी रोजी किंवा त्यापूर्वी प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमानचालन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी दिली. या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि अन्य चार जणांचा मृत्यू झाला होता.
येथील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले, "२८ जानेवारी रोजी झालेल्या या अपघाताच्या घटनेला एक महिना पूर्ण होण्यापूर्वी, म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी किंवा त्यापूर्वी प्राथमिक अहवाल समोर येईल."
अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विमान मालक असलेल्या खासगी कंपनीवर सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. या घटनेबाबत तर्कवितर्क लढवले जात असून आमदार रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन विमान मालक कंपनीशी संबंधित अनियमितता आणि इतर तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवले आहे. त्यांनी या प्रकरणी घातपाताची शक्यताही व्यक्त केली आहे.
नागरी विमानचालन मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, "आमच्या नियामक संस्था पारदर्शकता, सुरक्षा देखरेख आणि उत्तरदायित्वासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत. हितधारकांना विनंती आहे की त्यांनी अफवा पसरवू नये आणि वैधानिक तपास व नियामक प्रक्रियेला विहित कार्यपद्धतीनुसार पुढे जाऊ द्यावे."
आयसीएओ (ICAO) नियमांनुसार, बारामती येथील लिअरजेट ४५ (VT-SSK) अपघाताच्या तपासाचा प्राथमिक अहवाल अपघाताच्या ३० दिवसांच्या आत प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. अंतिम अहवाल यथावकाश सादर केला जाईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले. विमान अपघात तपास ब्युरोचा (AAIB) हा तपास तांत्रिक आणि पुराव्यांवर आधारित असून यामध्ये विमानाचे अवशेष, परिचालन आणि देखभालीच्या नोंदींची पद्धतशीर तपासणी तसेच आवश्यकतेनुसार घटकांची प्रयोगशाळेत चाचणी केली जात आहे.
या विमानात दोन स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर होते. एल-३ कम्युनिकेशन्सने उत्पादित केलेल्या डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील (DFDR) माहिती नवी दिल्लीतील एएआयबीच्या केंद्रात यशस्वीरित्या डाऊनलोड करण्यात आली आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचे (CVR) आगीमुळे नुकसान झाले आहे. हे यंत्र हनीवेल कंपनीचे असल्याने आयसीएओ नियमांनुसार ज्या देशात याची निर्मिती झाली, त्या देशाची तांत्रिक मदत घेण्यात आली आहे.
२०२५ दरम्यान नागरी विमानचालन महासंचालनालयाने (DGCA) नॉन-शेड्युल ऑपरेटरच्या ५१ नियामक ऑॉडिट पूर्ण केल्या. याशिवाय, मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्सच्या फ्लाईट सेफ्टी सिस्टीम, फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन, मेंटेनन्स कंप्लायन्स, कागदपत्रे आणि स्टेशन सुविधा अशा विविध क्षेत्रांची अनेकदा पाहणी करण्यात आली. त्यावेळच्या सर्व त्रुटी दूर करून प्रकरणे बंद करण्यात आली होती, असे निवेदनात म्हटले आहे.
या अपघातानंतर मंत्रालयाने डीजीसीएला व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिले. यामध्ये नियामक अनुपालन, ऑपरेशनल कंट्रोल सिस्टीम, देखभाल पद्धती, क्रू ट्रेनिंग मानके, सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली आणि सीव्हीआर/एफडीआर मॉनिटरिंगचा सर्वंकष आढावा घेतला जाईल. हे ऑडिट ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू झाले असून ते लवकरच पूर्ण होणे अपेक्षित आहे. यातील निष्कर्षांचे पुनरावलोकन करून डीजीसीएच्या धोरणानुसार कारवाई केली जाईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.