इराणमध्ये सुरू असलेल्या व्यापक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई यांनी शुक्रवारी जनतेला एकतेचे आवाहन केले. देशात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांच्या विरोधात उभे राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इराणच्या सरकारी टीव्हीवरून प्रसारित झालेल्या एका भाषणात खामनेई यांनी या आंदोलनांवर कडाडून टीका केली. ही आंदोलने म्हणजे परकीय शत्रूंचा, प्रामुख्याने अमेरिकेचा कट असल्याचे सांगत, या अशांततेवर सरकार कठोर कारवाई करेल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
खामनेई यांनी आंदोलकांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला. दंगलखोर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत आहेत, असे सांगत परकीयांचे भाडोत्री म्हणून काम करणाऱ्या लोकांना तेहरान खपवून घेणार नाही, असा सज्जड दम त्यांनी भरला. ट्रम्प यांचे हात इराणी नागरिकांच्या 'रक्ताने माखलेले' आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
इराणी चलन रियालच्या किमतीत झालेली मोठी घसरण आणि आर्थिक अडचणींमुळे संतापलेल्या तेहरानमधील व्यापाऱ्यांनी या आंदोलनांची सुरुवात केली होती. २८ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या निदर्शनांमध्ये आतापर्यंत अनेक आंदोलक आणि सुरक्षा दलाचे किमान चार जवान ठार झाले आहेत.
हे आंदोलन दडपण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी इंटरनेट सेवा बंद केली. शुक्रवारीही इंटरनेट बंदी कायम होती, तसेच फोन यंत्रणा देखील विस्कळीत झाली होती. याशिवाय विमान कंपन्यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत.
शुक्रवारी इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी या आंदोलनांवरील मौन सोडले. अमेरिका आणि इस्रायलच्या 'दहशतवादी एजंट्स'नी आगी लावल्या आणि हिंसाचार भडकावला, असा आरोप माध्यमांनी केला. तसेच या घटनांमध्ये काही 'जीवितहानी' झाल्याचेही त्यांनी नमूद केले, परंतु त्याबद्दल अधिक माहिती दिली नाही.
दुसरीकडे, ट्रम्प यांनी गुरुवारी पुन्हा एकदा धमकी दिली की, अमेरिका तेहरानला आंदोलकांची हत्या करू देणार नाही.
आपल्या टीव्ही भाषणात खामनेई म्हणाले, "आंदोलक दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला (ट्रम्प) खुश करण्यासाठी स्वतःच्याच रस्त्यांची नासधूस करत आहेत." यावेळी उपस्थितांनी अमेरिकेचा नाश होवो अशा घोषणा दिल्या.