कोचीच्या ज्यू टाऊनमध्ये मुस्लिम शिष्याने जपला ज्यू गुरुचा वारसा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
थाहा इब्राहिम
थाहा इब्राहिम

 

केरळच्या कोचीत एका बाजूला ज्यू धर्मीयांच्या प्राचीन प्रार्थनास्थळांचा इतिहास तर दुसरीकडे अजानचा शांत स्वर ऐकायला मिळतो. या दोन्ही संस्कृतींच्या मिलनाची साक्ष देणारे एक छोटेसे दुकान आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. हे छोटेसे दुकान एका मुस्लिम शिष्याने आपल्या ज्यू गुरुला दिलेल्या शब्दाची आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वारशाची साक्ष आहे.

एका अमेरिकन लेखिकेने या दुकानाचा व्हिडिओ शेअर केल्याने सर्वत्र त्या दुकानाची चर्चा सुरू झाली आहे. हे दुकान स्थानिक ज्यू लोकसंख्या स्थलांतरित झाल्यानंतरही अनेक दशकांपासून सुरू आहे. ऐजा मेरोॅक यांनी पोस्ट केलेला हे व्हिडिओ थाहा इब्राहिम या मुस्लिम व्यक्तीच्या दुकानाचा आहे. इब्राहिम कोचीच्या ऐतिहासिक ज्यू टाऊनमध्ये ज्यू भरतकामाचे जुने दुकान चालवतात.
 

हे दुकान मूळचे एका ज्यू महिलेचे होते. त्यांनी लहानपणापासून इब्राहिम यांना मार्गदर्शन केले आणि पुढे आपला व्यवसाय त्यांच्याकडे सोपवला. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

कोचीमधील ज्यू दुकानाची गोष्ट
 
हे दुकान कोचीच्या मटणचेरी भागातील ज्यू टाऊनमध्ये आहे. ज्यू टाऊन हे एकेकाळी कोचीन ज्यू समुदायाचे निवासस्थान होते. हा समुदाय अनेक शतकांपासून केरळमध्ये वास्तव्यास होता. विसाव्या शतकाच्या मध्यानंतर या समुदायातील बहुतेक लोक परदेशात स्थलांतरीत झाले. यामुळे अनेक घरे आणि व्यवसाय बंद पडले. या भरतकाम व्यवसायाच्या दुकानासह मोजक्याच ठिकाणांचे कामकाज मात्र सुरू राहिले. 

या दुकानाच्या मालकिणी सारा कोहेन (१९२५–२०१९) होत्या. ज्यू टाऊनमध्ये कायमस्वरूपी राहणाऱ्या शेवटच्या ज्यू व्यक्तींमध्ये कोहेन यांचा समावेश होतो. विविध मुलाखती आणि अहवालांनुसार, इतर लोक सोडून गेले तरी त्यांनी कोचीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या दुकानात हाताने केलेले भरतकाम आणि स्मृतीचिन्हे विकली जात असत. त्यामुळे हे दुकान तेथील परिसरात प्रसिद्ध झाले होते.
 

थाहा इब्राहिम लहानपणी कोहेन यांच्या दुकानाजवळ रस्त्यावर वस्तू विकण्याचे काम करायचे. पुढे कोहेन यांनी त्यांना कामावर ठेवले आणि भरतकामासह दुकानाचा दैनंदिन व्यवहार शिकवला. गेल्या अनेक वर्षांत इब्राहिम या व्यवसायाशी पूर्णपणे जोडले गेले. ग्राहकांना सांभाळणे, उत्पादन आणि देखभालीमध्ये त्यांनी कोहेन यांना मदत केली. हे व्यावसायिक नाते अनेक दशके टिकून राहिले. 

मात्र कोहेन यांची प्रकृती खालावू लागल्यानंतर आपल्या मृत्यूनंतरही हे दुकान सुरू राहावे असा निर्णय त्यांनी घेतला. २०१९ पूर्वी त्यांनी स्वतः दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इब्राहिम यांना दुकान चालवण्याची आणि त्याचे स्वरूप टिकवून ठेवण्याची विनंती केली होती. इब्राहिम यांनी कोहेन यांना शब्द दिला आणि त्यांच्या निधनानंतर इब्राहिम आणि त्यांच्या कुटुंबाने या व्यवसायाची आणि दुकानातील साहित्याची जबाबदारी स्वीकारली.

 
दुकानाचा कारभार

हे दुकान आजही त्याच नावाने आणि जुन्याच मांडणीत सुरू आहे. ज्यू धर्माच्या शब्बाथ पाळण्याच्या प्रथेनुसार शनिवारी हे दुकान बंद असते आणि शुक्रवारी संध्याकाळी तिथे मेणबत्त्या लावल्या जातात. दुकानात कोहेन यांच्याशी संबंधित छायाचित्रे, भरतकामाचे नमुने आणि वैयक्तिक वस्तू प्रदर्शित केलेल्या आहेत. आपण आजही मुस्लिम आहोत आणि आपला धर्म न बदलता केवळ दुकान चालवणे आणि तिथल्या जुन्या प्रथा जपणे हीच आपली भूमिका असल्याचे इब्राहिम यांनी स्पष्ट केले आहे.

ऐतिहासिक संदर्भ

नेथन कात्झ आणि शाल्वा वेल यांसारखे इतिहासकार तसेच कोची ज्यू संग्रहालय आणि केरळ पर्यटन विभागाच्या नोंदीनुसार, ज्यू लोक दोन हजार वर्षांहून अधिक काळ हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांसोबत केरळमध्ये राहत असल्याचे मानले जाते. या उपस्थितीचे सर्वात जुने पुरावे मध्ययुगीन ताम्रपटांतून मिळत असले तरी, स्थानिक परंपरा आणि संशोधनानुसार मलबार किनारपट्टीवर प्राचीन व्यापार जाळ्याच्या काळापासून ज्यूंचे अस्तित्व आढळते. 

ऐतिहासिक अभ्यास आणि सरकारी वारसा संस्थांच्या माहितीनुसार, १९४८ नंतर मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतरामुळे २०वीं शतकात केरळमधील ज्यू लोकसंख्या झपाट्याने कमी झाली. तरीही कोचीच्या ज्यू टाऊनमधील सिनेगॉग, दफनभूमी आणि जुने व्यवसाय या इतिहासाचे साक्षीदार म्हणून आजही उभे आहेत. सारा कोहेन यांच्या भरतकाम दुकानाचे सातत्य हे मोठे लोकसंख्याशास्त्रीय बदल होऊनही अशा वास्तू कशा वापरात राहिल्या आहेत, याचे उत्तम उदाहरण म्हणून स्थानिक इतिहासकार आवर्जून सांगतात.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter