'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026' च्या दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी तरुणांना संबोधित करताना नेतृत्व, निर्णयक्षमता आणि इच्छाशक्ती या त्रिसूत्रीवर भर दिला. भविष्य काळ अशाच नेत्यांचा असेल जे वेळेची गरज ओळखून दूरदृष्टीने आणि शिस्तीने निर्णय घेतील, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
अजित डोवाल यांनी आपल्या भाषणात गिर्यारोहक अरुणिमा सिन्हाचे उदाहरण दिले. रेल्वे प्रवासात चोरांचा प्रतिकार करताना अरुणिमाचा पाय रेल्वेखाली येऊन निकामी झाला होता. मात्र, डॉक्टरांना पाय कापावा लागल्यानंतरही तिने हार मानली नाही. अपघातानंतर दोन वर्षांच्या आत ती माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचली. डोवाल म्हणाले, "तुमची परिस्थिती कितीही कठीण असली, तरी तुमचा संकल्प आणि आत्मविश्वास तुम्हाला महान बनवू शकतो. भावनांपेक्षा योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णयच व्यक्तीचे भविष्य घडवतात."

भारताचे स्वातंत्र्य हे पूर्वजांच्या बलिदानाचे फळ असल्याचे सांगताना डोवाल यांनी तरुणांना इतिहासाचे स्मरण करून दिले. "फाशी, यातना आणि संघर्ष हा केवळ इतिहास नसून ती एक चेतावणी आहे. जर आपण इतिहासातून धडा घेतला नाही, तर भविष्यातील पिढ्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. कोणत्याही देशाला कमकुवत करण्यासाठी त्याचे मनोधैर्य तोडले जाते. तुमच्याकडे शस्त्रे असूनही जर इच्छाशक्ती नसेल, तर ती शस्त्रे निरुपयोगी ठरतात," असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनीही तरुणांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः तरुणांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असून, त्यांचे हे विचार थेट धोरण निर्मितीचा हिस्सा बनतील, असे त्यांनी सांगितले. मांडविया म्हणाले, "विकसित भारत हे केवळ स्वप्न नसून ती जगण्याची एक पद्धत असली पाहिजे. आमचे उद्दिष्ट केवळ पुरस्कार देणे नाही, तर एक लाख असे तरुण नेते तयार करणे आहे जे जमिनी पातळीवर देशाच्या विकासाचे भागीदार बनतील."

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या 'राष्ट्रीय युवा दिवस' निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी या डायलॉगच्या समारोप सत्रात सहभागी होतील. भारत मंडपम येथे होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान देश-परदेशातील सुमारे ३,००० युवा प्रतिनिधींशी संवाद साधतील. या स्पर्धेत निवडलेले १० गट राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर पंतप्रधानांसमोर सादरीकरण करतील. या वेळी पंतप्रधान विकसित भारताच्या ध्येयावर आधारित तरुणांच्या निबंधांचे संकलनही प्रकाशित करतील.
९ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित या उपक्रमात देशभरातील ५० लाखांहून अधिक तरुणांनी सहभाग नोंदवला आहे. डिजिटल क्विझ, निबंध स्पर्धा आणि राज्यस्तरीय सादरीकरण अशा तीन टप्प्यांतील खडतर निवडीनंतर या युवा नेत्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -