छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेला दिशा देणाऱ्या आणि राष्ट्रघडणीच्या मातृत्वाचे तेजस्वी प्रतीक असलेल्या राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय माता दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, अशी आग्रही आणि प्रेरणादायी मागणी साताऱ्यातील 'मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा' या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि खासदारांना सविस्तर निवेदन देऊन राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला.
संस्कारांची जननी : राजमाता जिजाऊ
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राजमाता जिजाऊ या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या संपूर्ण राष्ट्राला दिशा देणाऱ्या आदर्श मातृशक्तीचे प्रतीक होत्या. त्यांच्याच संस्कारातून न्यायप्रिय, धर्मनिरपेक्ष आणि माणुसकीवर आधारित राज्यकारभार करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडले. राजमाता जिजाऊ यांनी आपल्या पुत्राला स्त्री-सन्मान, अन्यायाविरुद्ध निर्भय लढा, प्रजाहितदक्ष शासन आणि सर्व धर्मांचा आदर करण्याचे संस्कार दिले. शिवाजी महाराजांनी स्त्रियांविषयी दाखवलेली संवेदनशीलता, सर्व धर्मीय संत, सैनिक व प्रजाजनांना दिलेला सन्मान, यामागे जिजाऊ मातेचेच संस्कार आहेत. असे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
'मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा' संघटनेचे संस्थापक सादिक शेख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, "राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका महापुरुषाला जन्म दिला, त्यांच्यावर चांगले संस्कार सुद्धा केले. आणि त्या संस्काराच्या माध्यमातून सर्वधर्मसमभावाची, स्त्री सन्मानाची फार मोठी शिकवण त्यांनी समाजाला दिली. त्यांनी केवळ स्त्री सन्मानाचा जागर केला नाही, तर शत्रूच्या स्त्रियांना सुद्धा सन्मान दिला. याच्यापेक्षा स्त्रीसन्मानाचे कोणतेही मोठे उदाहरण देशामध्ये असू शकत नाही. देशात तर हा दिवस साजरा व्हावाच परंतु सातारा जिल्हा ही मराठा साम्राज्याची राजधानी असल्याने, सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातूनही हा दिवस माता दिन म्हणून साजरा व्हावा, अशी मागणी देखील आम्ही केली आहे."
प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा
राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात 'राष्ट्रीय माता दिन' म्हणून साजरा व्हावा या मागणीचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवावे, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसेच सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातूनही हा दिवस 'माता दिन' म्हणून साजरा व्हावा, असे यावेळी सांगण्यात आले.
आजच्या काळात जेव्हा समाजात मातृत्वाचा सन्मान, स्त्री-सुरक्षा, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेची नितांत गरज आहे, तेव्हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय माता दिवस’ म्हणून साजरा होणे काळाची गरज असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. यामुळे सर्व धर्मांतील माता-भगिनींना प्रेरणा मिळेल, नव्या पिढीमध्ये सुसंस्कार रुजतील आणि शिवविचारांवर आधारित मजबूत राष्ट्रनिर्मितीस बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पालकमंत्र्यांचे आश्वासन
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या मागणीची दखल घेत ती मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, आचारसंहितेची अडचण नसल्यास सातारा जिल्ह्यात राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस 'माता दिन' म्हणून साजरा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी आणि सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनीही या मागणीला रास्त ठरवून त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी 'मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा' संघटनेचे संस्थापक सादिक शेख यांच्यासह अझहर मणेर, अरबाज शेख, आरिफ खान, शाहरुख शेख, राजू मुस्तफा, हाजी नदाफ, बशीर मुलाणी आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही मागणी केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून मातृत्व, मानवता आणि राष्ट्रीय एकतेचा गौरव करणारी ऐतिहासिक पायरी ठरेल, असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.