लखनऊ विद्यापीठात मुस्लिम बांधवांच्या नमाजसाठी हिंदू विद्यार्थ्यांनी धरली सलोख्याची साखळी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
लखनऊ विद्यापीठातील विद्यार्थी
लखनऊ विद्यापीठातील विद्यार्थी

 

लखनऊ विद्यापीठाशी संलग्न असलेल्या समाजवादी छात्र सभा (SCS), नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) च्या विद्यार्थ्यांनी रविवारी आणि सोमवारच्या दरम्यानच्या रात्री ऐतिहासिक लाल बारादरीबाहेर ठिय्या आंदोलन केले. पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यापासून रोखण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने मुद्दाम लाल बारादरीमधील मस्जिद सील केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

परंतु हे सर्व सुरु असताना विद्यार्थ्यांच्या एका कृतीतून भारताच्या गंगा-जमुनी तहजीबचे दर्शन झाले आहे. मस्जिद बंद असल्याचे समजल्यानंतर या तीन विद्यार्थी संघटनांच्या हिंदू प्रतिनिधींनी मुस्लिम विद्यार्थ्यांना लाल बारादरीबाहेर नमाज अदा करता यावी यासाठी एकमेकांमध्ये हात गुंफून मानवी साखळी तयार केली होती. नमाज पठण करणारे मुस्लिम विद्यार्थी आणि त्यांच्या संरक्षणासाठी उभे असलेले विद्यार्थी नेते यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या गंगा-जमुनी तहजीबचे दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी  विद्यापीठ हे धर्म, जात, पंथ किंवा संस्कृतीच्या आधारावर भेदभाव करण्याचे ठिकाण नाही, असा संदेश यातून दिला आहे.

समाजवादी छात्र सभेचे प्रतिनिधी नवनीत कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, "लखनौ विद्यापीठ कॅम्पसमध्ये असलेली शतकानुशतके जुनी लाल बारादरी ही विद्यापीठाच्या स्थापनेपासून मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी नमाज पठणाचे ठिकाण राहिली आहे. रमजान महिन्यात प्रार्थना करणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ही ऐतिहासिक वास्तू सील करण्यात आली. परंतु आमच्या संघटनेतील हिंदू विद्यार्थ्यांनी मुस्लिम विद्यार्थी नमाज पठण करत असताना स्वतः पहारा दिला, कारण आमचा गंगा-जमुनी तहजीब वर विश्वास आहे."

ते पुढे म्हणाले की, "लाल बारादरी सील केल्यामुळे इफ्तार आत होऊ शकली नाही, त्यामुळे जातीय सलोख्याचे प्रतीक म्हणून इमारतीबाहेर इतर विद्यार्थ्यांसोबत इफ्तारचे आयोजन करण्यात आले."

राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते सलमान निझामी यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "लखनौ विद्यापीठात प्रशासनाने कॅम्पस मशीद बंद केल्यानंतर, हिंदू विद्यार्थ्यांनी नमाज पठण करणाऱ्या मुस्लिमांच्या संरक्षणासाठी मानवी साखळी तयार करून एकता दर्शविली आणि त्यांच्यासोबत उपवासही सोडला. हे भारताचे खरे सौंदर्य आहे..."
याबाबत प्रतिक्रिया देताना विद्यापीठाचे प्रवक्ते प्रा. मुकुल श्रीवास्तव म्हणाले, "ही ऐतिहासिक इमारत अत्यंत जर्जर अवस्थेत असून तिथे कधीही अपघात घडू शकतो. या इमारतीत सुरू असलेली बँक आणि कॅन्टीन यापूर्वीच बंद करण्यात आले होते. अलीकडेच एक भिंत कोसळल्यानंतर प्रशासनाने तिथे हालचालींवर बंदी घालणारे फलक लावले होते. तरीही विद्यार्थी आत जात होते, जे जिवावर बेतू शकते."

लखनौचे इतिहासकार दिवंगत योगेश प्रवीण यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, लाल बारादरी ही नवाब काळातील एकमेव लाल दगडाची इमारत आहे. १८ व्या शतकात ती बादशाह बाग म्हणून ओळखली जात असे. नवाब गाझीउद्दीन हैदर शाह यांनी १८१४ मध्ये याची पायाभरणी केली होती आणि १८२० मध्ये त्यांचा मुलगा नसीरुद्दीन हैदर शाह यांनी हे काम पूर्ण केले. लाल बारादरीमध्ये एकेकाळी शिक्षक संघटनेचे कार्यालय, बँक, कॅफेटेरिया आणि स्टाफ क्लब होता, परंतु इमारतीच्या कमकुवत अवस्थेमुळे १० वर्षांपूर्वी हे सर्व तिथून हलवण्यात आले होते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter