'आशिकी' गर्ल पलक मुच्छलचे सुपरहिट समाजकार्य!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायिका आणि समाजसेविका पलक मुच्छल हिने 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये (Guinness World Records) आपले नाव कोरले आहे. तिने देशभरातील ३,८०० पेक्षा जास्त गरीब मुलांच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत करून हे अतुलनीय मानवतावादी कार्य केले आहे.

पलक तिचा भाऊ पलाश मुच्छलसोबत 'पलक-पलाश चॅरिटेबल फाऊंडेशन' चालवते. या संस्थेद्वारे ती तिच्या कॉन्सर्टमधून (संगीताचे कार्यक्रम) मिळणाऱ्या कमाईचा मोठा हिस्सा या जीवन वाचवणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी दान करते. तिच्या या उल्लेखनीय प्रयत्नांमुळे तिला 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्येही स्थान मिळाले आहे, तसेच समाजसेवेसाठी अनेक राष्ट्रीय सन्मानही मिळाले आहेत.

पलकचा जन्म ३० मार्च १९९२ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे राजकुमार आणि अमिता मुच्छल यांच्या घरी झाला. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीच तिने आपल्या गायन प्रतिभेची चुणूक दाखवली. बालपणी एका रेल्वे प्रवासादरम्यान गरीब मुलांची बिकट अवस्था पाहून तिचे मन हेलावले आणि तिने आपल्या संगीताच्या देणगीचा उपयोग समाज बदलण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला.

मार्च २००० पासून, ती आणि तिचा भाऊ भारतभर आणि परदेशात कार्यक्रम करत आहेत. त्यातून ते हृदयविकाराने त्रस्त असलेल्या मुलांसाठी निधी उभारत आहेत.

तिची करुणा केवळ संगीतापुरती मर्यादित नाही. १९९९ मध्ये, पलकने कारगिल युद्धातील सैनिकांसाठी निधी गोळा करण्यासाठी घरोघरी जाऊन गाणी गायली होती. नंतर तिने गुजरात भूकंपग्रस्तांसाठी १० लाखांचे योगदान दिले. २०१३ या एकाच वर्षात, तिने २.५ कोटींहून अधिक निधी उभारला, ज्यामुळे ५७२ मुलांवर जीवन वाचवणाऱ्या हृदय शस्त्रक्रिया होऊ शकल्या.

आपल्या या कार्याबद्दल बोलताना पलक म्हणाली, "आम्ही सर्वात तातडीच्या शस्त्रक्रिया आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा कार्यक्रम (शो) होत नाहीत, तेव्हा आम्ही आमची बचत वापरतो, जेणेकरून आमच्या मुलांवरील शस्त्रक्रिया सुरू राहतील." तिने लोकांना आवाहन केले आहे की, त्यांनी जीव वाचवण्यासाठी जेवढे शक्य आहे तेवढे – अगदी १०० रुपये असले तरी – योगदान द्यावे.

२००६ मध्ये मुंबईत आल्यानंतर, पलकने 'दमादम्म' (२०११) या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकने बॉलिवूडमध्ये पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. त्यानंतर तिने 'मेरी आशिकी', 'कौन तुझे' आणि 'प्रेम रतन धन पायो' यांसारखी अनेक सुपरहिट गाणी दिली.

संगीतकार मिथुनसोबत विवाहबद्ध झालेली पलक मुच्छल आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे – केवळ तिच्या मधुर आवाजानेच नाही, तर तिच्या करुणेने भरलेल्या हृदयाने आणि माणुसकीप्रती असलेल्या अतूट वचनबद्धतेने.