सोफिया फिरदौस : सर्वधर्मीय जनतेने निवडून दिलेल्या ओडिसाच्या पहिल्या मुस्लिम महिला आमदार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
सोफिया फिरदौस
सोफिया फिरदौस

 

श्रीलत एम.

सोफिया फिरदौस या देशातील मोजक्या मुस्लिम महिला आमदारांपैकी एक आहेत. २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी बाराबती कटक मतदारसंघातून एक नवा चेहरा म्हणून विजय मिळवला. विशेष म्हणजे त्यांनी मतदानाच्या अवघ्या एक महिना आधी आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. आजच्या जातीय राजकारणात सर्वात प्रभावी आणि आदर्श गोष्ट म्हणजे, या मतदारसंघातील मुस्लिम मतदारांची संख्या केवळ ३ टक्के आहे. तरीही सर्वधर्मीय जनतेने त्यांना कौल दिला.

सोफिया यांचा राजकारणातील उदय हा तसा योगायोगानेच झाला. २०२४ च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वी बाराबती कटक येथील काँग्रेस उमेदवाराविरुद्ध एका प्रकरणाचा निकाल आला आणि सर्व चक्रे फिरली. हे उमेदवार दुसरे कोणी नसून सोफिया यांचे वडील मोहम्मद मोकीम होते. खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली. अशा वेळी त्यांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या कार्यकर्त्यांनी तातडीने सोफिया यांच्याकडे धाव घेतली. सोफिया आधीपासूनच आपल्या वडिलांना कामात मदत करत होत्या. "वडिलांनी जिथे प्रचार थांबवला होता, तिथून पुढे सूत्रे हाती घेण्याची विनंती मला करण्यात आली आणि मला निवडणूक लढवण्यास सांगितले," असे त्या आपल्या मतदारसंघातून बोलताना सांगतात.
 

राजकारणातील त्यांचा सहभाग तोपर्यंत केवळ वडिलांना पाठिंबा देण्यापुरता मर्यादित होता. त्या म्हणतात, "मी माझ्या रिअल इस्टेट व्यवसायात खूप व्यस्त होते आणि राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. पण त्या कठीण प्रसंगी मी संघटनेला नकार देऊ शकले नाही, कारण मी त्यांच्याशी जोडलेली होते." जेव्हा उमेदवार बदलला गेला, तेव्हा निवडणुकीला फक्त एक महिना शिल्लक होता. तरीही बाराबतीमध्ये मोकीम यांची लोकप्रियता इतकी होती की त्यांच्या कन्येने भाजप उमेदवाराचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. या लढतीचे गांभीर्य सांगताना त्या नमूद करतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीही भाजपचा प्रचार केला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी पूर्ण महापात्रा हे एक प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ होते, त्यामुळे ही लढत सोपी नव्हती.

३९ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांच्या विजयामुळे काँग्रेसने बाराबती पुन्हा ताब्यात घेतली होती. कटकच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे लोक कंटाळले होते, असे त्या सांगतात. सोफिया यांच्यासाठी अल्पसंख्याक असणे ही राजकारणात अडचण ठरली नाही. त्या स्पष्ट करतात की, जेव्हा जेव्हा मुस्लिम उमेदवार, विशेषतः महिला जिंकतात, तेव्हा तिथे मुस्लिम मतदारांचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत असते. पण इथे परिस्थिती वेगळी होती. "आम्ही संपूर्ण मतदारसंघात परिचित आहोत आणि आम्ही इथल्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाग असतो. जेव्हा इथे रथयात्रा निघते, तेव्हा पहिली देणगी माझ्या वडिलांकडून दिली जाते," असे त्या सांगतात. "लोकांना इथले मुस्लिम वेगळे वाटत नाहीत. इथली जनता सुशिक्षित, पुरोगामी आहे आणि तिचा विकास तसेच बदलावर विश्वास आहे," असे त्या पुढे म्हणतात.

 
सोफिया यांच्याशी संवाद साधताना त्यांचा राजकीय अजेंडा स्पष्टपणे जाणवतो. त्या बाराबती कटकच्या वैभवाची यादीच सादर करतात. कटक ही जुनी राजधानी होती आणि तिथे अजूनही अनेक प्रशासकीय मुख्यालये आहेत. हायकोर्ट तिथे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाराबती हे सुभाषचंद्र बोस यांचे जन्मस्थान आहे, असे त्या अभिमानाने सांगतात. २३ जानेवारी रोजी नेताजींच्या जयंतीला उपराष्ट्रपतींनीही या ठिकाणाला भेट दिली होती. पण बाकी भारतीयांना हे माहित आहे का, असा सवाल त्या विचारतात. त्यांची ही यादी इथेच संपत नाही. प्रसिद्ध बाली यात्रा इथूनच सुरू होते. बाराबती क्रिकेट स्टेडियम आणि चांदीच्या नकुशीकामाचे केंद्र (Silver Filigree) याच मतदारसंघात आहे, ज्याला नुकताच जीआय (GI) टॅग मिळाला आहे. "आमची दुर्गापूजा बंगालमधील पूजेपेक्षाही जुनी आहे," असेही त्या आवर्जून सांगतात.

आज त्या किनारपट्टीवरील कटक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या दोन आमदारांपैकी एक आहेत. त्यांचे तरुण वय लोक त्यांना गांभीर्याने घेण्यापासून रोखते का, असे विचारले असता त्या म्हणतात की, राज्यातील एक परिचित चेहरा असल्याचा त्यांना आनंद आहे. "मी विधानसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले आहेत. तरुण आणि महिला मला एक गंभीर राजकारणी म्हणून पाहतात," असे त्या विश्वासाने सांगतात. अनेकांना त्यांचा उदय केवळ घराणेशाही वाटू शकतो. मात्र, मतदारसंघातील त्यांच्या कामाची लोक दखल घेत आहेत. त्या केवळ वडिलांची 'रिप्लेसमेंट' नसून स्वतःच्या हिमतीवर उभ्या असलेल्या नेत्या आहेत, हे त्यांनी सिद्ध केले आहे. याचे श्रेय त्या आपल्या वडिलांना देतात. वडिलांनी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले. त्या राजकारणात नव्हत्या तेव्हाही वडिलांनी त्यांना स्वतःच्या हिमतीवर निर्णय घेण्यास प्रोत्साहन दिले होते.
 

सोफिया यांनी आपल्या मतदारसंघातील तीन मुख्य समस्या ओळखल्या आहेत. पहिली म्हणजे पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय कामांतून कटकचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित करणे. यासाठी अनेक फाईल्स मंजुरीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. दुसरी समस्या चांदीच्या नकुशीकाम क्षेत्राला आर्थिक केंद्र म्हणून बळकट करणे ही आहे, ही मागणी एका वर्षात मान्य करण्यात आली. तिसरी समस्या रोजगाराची आहे. त्या कौशल्य विकास, सेमीकंडक्टर गुंतवणूक, आयटी पार्क्स आणि मोठ्या शिक्षण संस्थांची गरज यावर भर देतात. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी कटकला आहे, पण इतर संस्था भुवनेश्वरला गेल्या आहेत, असे त्या खेदाने नमूद करतात.

राजकारणामुळे जीवन कसे बदलले, यावर त्या म्हणतात, "मी आता पूर्णपणे लोकांची झाली आहे आणि नेहमी सर्वांसाठी उपलब्ध असते." त्यांचे पती एक व्यावसायिक आहेत आणि सासरच्या लोकांचा त्यांना पूर्ण पाठिंबा मिळतो. भविष्यात संसदेत जाण्याबद्दल विचारले असता त्या म्हणतात की हा निर्णय त्या जनतेवर सोडतील. "जर लोकांना मी आवडले आणि मला त्या पदासाठी पात्र समजले, तर ते नक्कीच होईल." स्वतःच्या समाजाबद्दल बोलताना त्या शिक्षणाच्या विषयावर चिंता व्यक्त करतात. मुस्लिम समाजातील, विशेषतः महिलांमधील शिक्षणाचे कमी प्रमाण हे प्रगतीतील मोठा अडथळा असल्याचे त्या मानतात.

सोफिया फिरदौस यांचा राजकारणातील प्रवेश परिस्थितीमुळे झाला असला, तरी त्यांची विधानसभेतील उपस्थिती आणि उत्साह खूप काही सांगून जातो. केवळ लोकसंख्येच्या जोरावर नव्हे, तर सर्व समाजाच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या त्या एक महत्त्वाच्या लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत. त्यामुळेच मुस्लिम महिला नेत्यांसमोर अनेक आव्हाने असली, तरी सोफिया राजकारणात आपला ठसा उमटवत राहतील, यात शंका नाही.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter