ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती "स्थिर असून ते बरे होत आहेत," अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी, ईशा देओल आणि हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर दिली आहे. ८९ वर्षीय अभिनेते गेल्या काही दिवसांपासून दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या.
अभिनेते 'व्हेंटिलेटर'वर असल्याच्या वृत्ताचे पुत्र सनी देओल यांच्या प्रतिनिधीने खंडन केले आहे.
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अफवा पसरल्यानंतर, त्यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हेमा मालिनी यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, "जे घडत आहे ते अक्षम्य आहे! उपचारांना प्रतिसाद देणाऱ्या आणि बरा होत असलेल्या व्यक्तीबद्दल जबाबदार चॅनेल्स खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात?". "हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदारपणाचे आहे. कृपया कुटुंबाला आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेला योग्य तो मान द्या," असेही त्या म्हणाल्या.
तत्पूर्वी, हेमा मालिनी यांनी सर्वांना धर्मेंद्र यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी सांगितले होते की, अभिनेते रुग्णालयात निरीक्षणाखाली असून, त्यांच्यावर "सतत लक्ष" ठेवले जात आहे.
अभिनेत्याची मुलगी ईशा देओलनेही इंस्टाग्रामवर पोस्ट करून खोट्या बातम्या न पसरवण्याचे आवाहन केले. तिने लिहिले, "माझे वडील स्थिर आहेत आणि बरे होत आहेत. आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या कुटुंबाला प्रायव्हसी (गोपनीयता) द्या. पापांच्या जलद बरे होण्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद."
सनी देओल यांच्या पीआर प्रतिनिधीनेही धर्मेंद्र "स्थिर आणि निरीक्षणाखाली" असल्याचे सांगितले. "कृपया त्यांच्या प्रकृतीबद्दल खोट्या अफवा पसरवण्यात गुंतू नका. सर्वांनी त्यांच्या जलद बरे होण्यासाठी प्रार्थना करावी आणि कुटुंबाच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करावा," असे या निवेदनात म्हटले आहे.
कुटुंबीय धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगत असले तरी, एका "इंडस्ट्री इनसायडर" (चित्रपटसृष्टीतील सूत्राने) मात्र धर्मेंद्र यांची प्रकृती "गंभीर" असल्याचे म्हटले आहे.
हेमा मालिनी, सनी देओल आणि ईशा देओल हे सर्व जण रुग्णालयात धर्मेंद्र यांच्यासोबत आहेत. सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांनी रुग्णालयात जाऊन कुटुंबाची भेट घेतली. अभिनेता गोविंदा देखील रुग्णालयात भेट देताना दिसला.