दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडीतील फरार गुन्हेगारासह जनकपुरी अपघात प्रकरणातील मुख्य कंत्राटदाराला अटक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दिल्ली पोलिसांच्या पश्चिम जिल्ह्याच्या अँटी-ऑटो थेफ्ट स्क्वॉडच्या (AATS) पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीला अटक केली आहे. फरार गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे हे विशेष पथक तयार करण्यात आले होते.

८ मार्च रोजी या पथकाने २०२० मध्ये नोंदवलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली. या आरोपीला २७ सप्टेंबर २०२५ रोजी तिस हजारी न्यायालयातील जेएमएफसी-०६ न्यायालयाने फरार घोषित केले होते. या कारवाई दरम्यान पथकाला संबंधित आरोपी जेजे कॉलनी सावदा परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शिताफीने पकडले.

जुनैद ऊर्फ जुनी असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीवर यापूर्वी आठ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या अटकेबाबतची कायदेशीर कारवाई पंजाबी बाग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या अटकेमुळे मुंडका पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लागला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात, दिल्लीच्या पश्चिम जिल्ह्याच्या एएटीएस पथकाने मंगळवारी जनकपुरी येथील दुचाकीस्वाराच्या मृत्यू प्रकरणी राजस्थानमधील उदयपूर येथून मुख्य कंत्राटदाराला ताब्यात घेतले. हिमांशू गुप्ता असे या आरोपीचे नाव असून तो तिथे लपून बसला होता. आता त्याला नवी दिल्लीत आणले जात आहे. काही आठवड्यांपूर्वी जनकपुरी परिसरात दिल्ली जल बोर्डाने खोदलेल्या खड्ड्यात पडून एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सार्वजनिक सुरक्षा आणि नागरी देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते.

६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:०३ वाजता जनकपुरी पोलीस ठाण्यात एक पीसीआर कॉल आला होता. आंध्र स्कूलजवळ एका १५ फूट खोल खड्ड्यात एक माणूस पडल्याची माहिती यात देण्यात आली होती. जनकपुरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा जोगिंदर सिंग मार्ग ते सी२बी रेड लाइटच्या दिशेला दिल्ली जल बोर्डाने खोदलेल्या खड्ड्यात कमल ध्यानी हा व्यक्ती त्याच्या मोटारसायकलसह पडलेला आढळला. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला खड्ड्यातून बाहेर काढून हरी नगरमधील दीन दयाळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.