अनुसूचित जातीतील तरुणांसाठी पुण्यात मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू; ड्रोन आणि ईव्ही टेक्नॉलॉजी शिकण्याची सुवर्णसंधी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि विज्ञान व तंत्रज्ञान उद्यान यांच्या वतीने पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यातील क्षण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि विज्ञान व तंत्रज्ञान उद्यान यांच्या वतीने पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यातील क्षण

 

पुणे, 

अनुसूचित जातीतील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि विज्ञान व तंत्रज्ञान उद्यान, पुणे यांच्या वतीने विशेष कौशल्य व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशनमध्ये हा सोहळा पार पडला.

सात आधुनिक अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण

या उपक्रमांतर्गत प्रामुख्याने सात तांत्रिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये ड्रोन सर्व्हिस टेक्निशियन, इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) मेंटेनन्स, ग्राफिक डिझायनर, सोशल मीडिया एक्झिक्यूटिव्ह, आयटी हेल्पडेस्क अटेंडंट, जीएसटी असिस्टंट आणि सीनियर असोसिएट (डेस्कटॉप पब्लिशिंग) अशा काळाची गरज असलेल्या विषयांचा समावेश आहे. तीन महिन्यांच्या या कालावधीत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असून, हे संपूर्ण प्रशिक्षण विनामूल्य आहे.

कौशल्य विकास हाच रोजगाराचा मार्ग

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एकनाथ मुंढे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "केवळ पारंपरिक पदवी शिक्षणावर अवलंबून न राहता कौशल्य विकास आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यातूनच आजच्या स्पर्धात्मक युगात रोजगाराच्या शाश्वत संधी उपलब्ध होतील."

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या विज्ञान व तंत्रज्ञान उद्यानाच्या प्रकल्प संचालिका सोनाली भट्टाचार्जी यांनी युवक सशक्तीकरणावर भर दिला. अनुसूचित जातीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रशासकीय सहकार्य

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नियोजनात बार्टीचे महासंचालक आणि विज्ञान व तंत्रज्ञान उद्यानाचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमास बार्टीचे विभाग प्रमुख (कौशल्य विकास) अनिल करांडे, कार्यालय अधीक्षक प्रज्ञा मोहिते, प्रकल्प व्यवस्थापक महेश गवई यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. विज्ञाने व तंत्रज्ञान उद्यानाचे प्रकल्प समन्वयक डॉ. मनोज कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रकल्प व्यवस्थापक वैभव निमगिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.