मुंबईतून एक अत्यंत महत्त्वाची आणि नवी सुरुवात झाली आहे. दाऊदी बोहरा समाजाने कुराणचे शिक्षण जगभरात पोहोचवण्यासाठी एक नवे डिजिटल व्यासपीठ सुरू केले आहे. युट्यूबवर 'सौत अल कुरआन अल करीम' या नावाने हे चॅनेल सुरू झाले आहे.
हे चॅनेल पूर्णपणे कुराणच्या पठणासाठी (तिलावत) वाहिलेले आहे. यात संपूर्ण कुराण शरीफची तिलावत शहजादा हुसेन बुरहानुद्दीन यांच्या आवाजात ऐकायला मिळते. ते हिज होलीनेस सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांचे सर्वात धाकटे चिरंजीव आहेत.
हा उपक्रम म्हणजे केवळ एक युट्यूब चॅनेल नाही. कुराणचे पारंपारिक ज्ञान डिजिटल युगाशी जोडण्याचा हा एक अत्यंत सुंदर प्रयत्न आहे. 'महद अल जहरा' या संस्थेने हा खास प्रोजेक्ट तयार केला आहे. कुराणचे पठण, पाठांतर आणि योग्य उच्चार शिकवण्यासाठी ही संस्था ओळखली जाते.
दुर्मिळ पठण शैली आता सर्वांसाठी खुली
या चॅनेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात 'खलफ अन हम्जा' या अत्यंत दुर्मिळ पठण शैलीत (रिवायत) कुराण वाचण्यात आले आहे. कुराण पठणाच्या दहा मान्यताप्राप्त पद्धतींपैकी ही एक आहे. ही पद्धत अत्यंत गुंतागुंतीची मानली जाते. तिची उच्चार शैली अगदी वेगळी असते. याच कारणामुळे ती सहसा ऐकायला मिळत नाही. आता पहिल्यांदाच ती संपूर्णपणे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कुराण पठणात उच्चार आणि लहेजा अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रत्येक पठण शैलीची स्वतःची एक वेगळी ओळख असते. 'खलफ अन हम्जा' या शैलीत अचूकतेची नितांत गरज असते. या चॅनेलच्या माध्यमातून आता विद्यार्थी आणि सामान्य लोक ही खास शैली अगदी सहज ऐकू शकतात. कुराण शिकणाऱ्यांसाठी ही एक मोठी पर्वणीच आहे.
'महद अल जहरा'चे मोलाचे योगदान
'महद अल जहरा' या संस्थेची स्थापना १९७६ मध्ये झाली. सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांनी तिची सुरुवात केली. कुराणचे शिक्षण अधिक भक्कम करणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. येथे विद्यार्थ्यांना हिफ्ज (पाठांतर) आणि तिलावत (पठण) या दोन्हीचे अत्यंत काटेकोर प्रशिक्षण दिले जाते. गेल्या अनेक दशकांत या संस्थेने हजारो हाफिज (कुराण तोंडपाठ असणारे) तयार केले आहेत.
१९९८ पासून शहजादा हुसेन बुरहानुद्दीन या संस्थेची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी येथील शिक्षणाचा दर्जा आणखी उंचावला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना केवळ पाठांतर शिकवले जात नाही. तर योग्य उच्चार आणि नियमांची सखोल समजही दिली जाते.
ते समाजाची प्रमुख शिक्षण संस्था असलेल्या 'अलजामेअतुस सैफियाह'चे प्रोव्होस्ट (Provost) देखील आहेत. येथे ते स्वतः विद्यार्थ्यांची परीक्षा घेतात. यातून विद्यार्थ्यांचे पाठांतर आणि पठण दोन्ही मजबूत असल्याची खात्री केली जाते.
क्यूआर कोडचा अभिनव प्रयोग
शहजादा हुसेन बुरहानुद्दीन हे स्वतः एक अत्यंत प्रसिद्ध 'कारी' (कुराण पठण करणारे) आहेत. कैरो येथील 'नकाबत कुर्रा अल कुरआन अल करीम' या अत्यंत प्रतिष्ठेच्या संस्थेचे ते मानद सदस्य आहेत. ही संस्था जगभरातील नामवंत कारींचा समूह मानली जाते.
त्यांचे शैक्षणिक योगदानही खूप मोठे आहे. त्यांनी 'किराअत जाहिरा लि किताब अल्लाह' नावाचे तीन खंडांचे पुस्तक लिहिले आहे. यात कुराणच्या विविध पठण शैली अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या आहेत. विद्यार्थ्यांना सहज शिकता यावे, यासाठी चार्ट्स आणि व्हिज्युअल गाईड्सचा सुरेख वापर करण्यात आला आहे.
या पुस्तकाचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या प्रत्येक पानावर क्यूआर कोड (QR Code) दिलेला आहे. विद्यार्थी तो स्कॅन करून थेट पठण ऐकू शकतात. यातून अभ्यास आणि सराव दोन्ही गोष्टी खूप सोप्या होतात. या महत्त्वाच्या कामाला 'अल अझहर युनिव्हर्सिटी'नेही प्रमाणित केले आहे. ही या क्षेत्रातील सर्वात नावाजलेली संस्था आहे.
एक लाख हाफिज तयार करण्याचे ध्येय
या नव्या चॅनेलची सुरुवात सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या दूरदृष्टीचाच एक भाग आहे. समाजाला कुराणशी जोडण्यासाठी ते नेहमीच प्रेरणा देत आले आहेत. प्रत्येक घरात कुराणचे शिक्षण पोहोचले पाहिजे, यावर त्यांचा विशेष भर असतो. प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी हाफिज असावा, अशी त्यांची मनापासून इच्छा आहे.
जगभरात एक लाख हाफिज तयार करण्याचे मोठे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. हा केवळ एक आकडा नाही. यामागे समाजाचे कुराणशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा उदात्त विचार आहे. डिजिटल माध्यमामुळे हे काम आता अधिक सोपे झाले आहे. आता कोणतीही व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही असली, तरी ती हे पठण ऐकू शकते. विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होत आहे.
भविष्यात आणखी शैलींचा होणार समावेश
'महद अल जहरा'चे वरिष्ठ सदस्य मुर्तजा जाफर यांनी या उपक्रमाचे मोठे कौतुक केले आहे. हा प्रोजेक्ट कुराणचे ज्ञान सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी मोठी मदत करेल, असे ते म्हणाले. विशेषतः 'खलफ अन हम्जा'सारखी गुंतागुंतीची पद्धत सर्वांसाठी उपलब्ध करणे, ही खरोखरच एक मोठी उपलब्धी आहे.
त्यांनी हेही स्पष्ट केले की हा प्रोजेक्ट इथेच थांबणार नाही. येणाऱ्या काळात आणखी अनेक पठण शैलींचे रेकॉर्डिंग यामध्ये जोडले जाईल. यात हफ्स अन आसिम, वरश अन नाफी आणि अल सुसि अन अबी अम्र यांसारख्या अत्यंत प्रसिद्ध पद्धतींचा समावेश असेल. भविष्यात हे चॅनेल कुराणच्या विविध शैलींचा एक अत्यंत मोठा डिजिटल संग्रह बनेल. यातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धती समजून घेणे खूप सोपे होईल.
आजच्या काळात डिजिटल माध्यम खूप प्रभावी ठरत आहे. अशा परिस्थितीत हा उपक्रम तरुणांना त्यांच्या धार्मिक मुळांशी जोडण्याचा एक उत्तम मार्ग ठरत आहे. परंपरा आणि तंत्रज्ञान हातात हात घालून चालू शकतात, हेच यातून सिद्ध होते. कुराणच्या पठणासारखे पारंपारिक ज्ञानही आधुनिक पद्धतीने अत्यंत प्रभावीपणे मांडता येते. यातून शिकणे तर सोपे होतेच, पण ते अधिकाधिक लोकांपर्यंतही सहज पोहोचते.
'सौत अल कुरआन अल करीम' चॅनेल आता ऑनलाइन उपलब्ध आहे. कुराण योग्य पद्धतीने वाचण्याची आणि समजून घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक मोठी पर्वणी आहे. ज्ञान वाटणे हीच खरी समाजसेवा आहे, हे दाऊदी बोहरा समाजाने यातून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. जेव्हा ही सेवा कुराणशी जोडलेली असते, तेव्हा तिचा प्रभाव अधिकच सखोल आणि चिरंतन होतो.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter