वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेतील गैरप्रकारानंतर आता सरकार अत्यंत सावध पावले उचलत आहे. २१ जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेचे आयोजन पूर्णपणे निर्दोष आणि सुरक्षित होण्यासाठी प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी भारतीय हवाई दलाचा (IAF) वापर करण्याच्या शक्यतेवर सरकार विचार करत आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या पर्यायावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते. 'नीट-युजी'च्या प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी हवाई दलाची विमाने वापरता येतील का, यावर मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. हा पर्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अंतिम मंजुरीसाठी ठेवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, २१ जूनच्या फेरपरीक्षेच्या तयारीवर खुद्द पंतप्रधान मोदी लक्ष ठेवून आहेत. परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक बारीक-सारीक माहिती त्यांना दिली जात आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते छपाई, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेपर्यंत संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या बैठकीला नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंग आणि शिक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
'नीट-युजी' परीक्षा ३ मे रोजी भारतातील ५५१ शहरांमध्ये आणि १४ परदेशी केंद्रांवर घेण्यात आली होती. जवळपास २३ लाख उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली होती. मात्र, पेपरफुटीच्या आरोपानंतर १२ मे रोजी ही परीक्षा रद्द करण्यात आली. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या तक्रारीवरून सीबीआयने (CBI) या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सीबीआयने देशभरात छापे टाकून आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून १३ आरोपींना अटक केली आहे. तपासातून प्रश्नपत्रिका फुटल्याचा मुख्य स्रोत समोर आला असल्याचे सीबीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.