सध्या चांगला सिनेमा एका मोठ्या संघर्षातून जात असल्याचे मत दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी व्यक्त केले आहे. ओटीटीपूर्व काळातही हीच परिस्थिती होती आणि आताही चित्रपट निर्माते आपले प्रकल्प स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर घेऊन जातात, तेव्हा त्यांना प्रथम चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा सल्ला दिला जातो.
या संपूर्ण प्रक्रियेत 'हृदय आणि संवेदनशीलता जपणारा सिनेमा' भरडला जात असल्याची खंत दिग्दर्शकाने व्यक्त केली. वीस वर्षांपूर्वी 'हैदर', विक्रमादित्य मोटवानेचा 'उडान' आणि अनुराग कश्यपचा 'गँग्स ऑफ वासेपूर' यांसारख्या चित्रपटांसाठी पैसे उभे करणे सोपे होते. हे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाले आणि चोखंदळ प्रेक्षकांनी त्यांचे कौतुकही केले.
परंतु आता परिस्थिती बदलली आहे. विशाल भारद्वाज यांनी 'पीटीआय'शी बोलताना सांगितले की, "आता अशा चित्रपटांसाठी पैसे उभे करणे शक्य नाही. आता स्पष्ट विभागणी झाली आहे. विषयानुसार 'हे ओटीटीसाठी आहे' असे सांगितले जाते. मात्र ओटीटीवरील लोक म्हणतात की आम्हाला हे नकोय, आधी चित्रपटगृहात प्रदर्शित करा, मग आम्ही ते घेऊ. या प्रक्रियेत चांगल्या चित्रपटांना फटका बसत आहे." यासाठी एखाद्या "क्रांतिकारी पावलाची" गरज असून ते पाऊल कधी पडेल आणि ते एखाद्या चित्रपटामुळे असेल की नवीन माध्यमामुळे, हे सांगता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
चित्रपटगृहांचे सध्याचे स्वरूप निर्मात्यांसाठी कठीण असल्याचे सांगताना विशाल म्हणाले की, त्यांचे समकालीन आणि ज्यांचे ते कौतुक करतात असे अनेक दिग्दर्शक आता स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर कथा सांगत आहेत. "आपण चित्रपट निर्मितीच्या अत्यंत विचित्र आणि कठीण टप्प्यात आहोत. हे जागतिक स्तरावर घडत आहे असे मला वाटते. चित्रपटगृहांसाठी बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांनी आता पूर्णपणे वेगळे वळण घेतले आहे," असे विशाल म्हणाले.
अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी, श्रीराम राघवन, विक्रमादित्य मोटवाने आणि इम्तियाज अली यांसारख्या आपल्या समकालीनांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, बहुतेक सर्वजण सध्या ओटीटीसाठी काम करत आहेत. त्यांनी चित्रपटगृहांसाठी चित्रपट बनवले तरी ते नेहमीच यशस्वी होतात असे नाही. विक्रमादित्य मोटवाने आणि दिबाकर बॅनर्जी यांचे काम आवडत असूनही त्यांचे चित्रपट चित्रपटगृहात न दिसणे ही खेदजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
दिग्दर्शकाच्या मते, पूर्वी सॅटेलाईट टेलिव्हिजनच्या आगमनाने चित्रपटगृहांसमोर आव्हान उभे केले होते. तेव्हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पाच ते सहा महिन्यांनी टीव्हीवर यायचा. आज चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला चित्रपट अवघ्या आठ आठवड्यांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतो. "जर तुम्हाला चित्रपटगृहांसाठी चित्रपट बनवायचे असतील, तर तुम्हाला स्वतःकडे नवीन दृष्टिकोनातून पाहावे लागेल. हे सर्व करताना स्वतःची ओळख जिवंत ठेवणे हे एक आव्हान आहे. दरम्यानच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म ओरिजिनल फिल्म्स बनवत होते, पण आता तेही कमी झाले आहे. चांगल्या सिनेमाचा संघर्ष नेहमीच असतो, पण आता तो अधिक गडद झाला आहे," असे विशाल भारद्वाज यांनी स्पष्ट केले.
प्रेक्षकांमध्ये 'मला हा चित्रपट आताच पाहायचा आहे, मी आठ आठवडे वाट पाहू शकत नाही' अशी ओढ निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. अशा परिस्थितीत हृदय आणि संवेदनशीलता असणारा सिनेमा पराभूत होत आहे. २००३ मध्ये आलेल्या 'मकबूल' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरचा काळ दिग्दर्शकांसाठी सुवर्णकाळ होता, असे विशाल यांना वाटते. साधारण २००४-२००५ पासून कोरोना महामारी येण्यापूर्वीचा काळ निर्मात्यांसाठी उत्तम होता. तेव्हा तुम्ही काहीही बनवू शकत होतात आणि लोक 'हैदर'सारख्या चित्रपटांसाठी चित्रपटगृहात येत असत. 'गँग्स ऑफ वासेपूर', 'खोसला का घोसला', 'ओये लकी लकी ओये', 'उडान' यांसारखे चित्रपट याच काळात गाजले.
शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका असलेला 'ओ रोमिओ' हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित करणाऱ्या विशाल यांनी ओटीटीचे आगमन, तिकिटांचे वाढते दर आणि प्रदर्शनातील कमी होत असलेला कालावधी या गोष्टींना थिएटर व्यवसायातील घसरणीसाठी जबाबदार धरले आहे.
आपल्या दिल्लीतील मित्राचा अनुभव सांगताना ते म्हणाले, "माझे काही मित्र माझा चित्रपट पाहायला जाणार होते. त्यांनी मला सांगितले की तीन जणांसाठी ६,००० रुपये हवे आहेत. मी विचारले इतके पैसे का? तेव्हा त्यांनी सांगितले की एका सीटचे तिकीट १,९०० रुपये आहे. चित्रपटगृहांची रचना, पायाभूत सुविधा किंवा कर यामुळे ही किंमत जास्त असू शकते." तिकिटांचे दर जास्त असल्याने लोक ओटीटीची वाट पाहतात. पण ओटीटीवरही केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक स्तरावरील प्रचंड आशय उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत आता एका क्रांतिकारी बदलाची गरज असल्याचे विशाल भारद्वाज यांनी आवर्जून सांगितले.