रमझानमध्ये थकवा जाणवत असल्यास वाचा सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांच्या मॅजिकल टिप्स

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर

 

अझहर आलम
 
रमझान महिन्याचे शेवटचे १० दिवस, ज्याला 'तिसरा अशरा' म्हटले जाते, उपवास करणाऱ्या मुस्लिमांसाठी सर्वात कठीण काळ असतो. २० दिवस पहाटेपासून संध्याकाळपर्यंत अन्नाशिवाय आणि पाण्याचा थेंबही न घेता उपवास केल्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होतो. लोकांना थकवा जाणवू लागतो आणि शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होते.

भारतातील अग्रगण्य पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. प्रदीर्घ उपवास आणि निर्जलीकरणामुळे शरीरात नेमके काय बदल होतात, हे त्यांनी यात स्पष्ट केले आहे. शेवटच्या अशरामध्ये शरीराची तंदुरुस्ती टिकवण्यासाठी आणि उपवासाचा ताण कमी करण्यासाठी योग्य वेळी योग्य आहार घेण्याच्या काही खास टिप्स त्यांनी दिल्या आहेत. या टिप्समध्ये दैनंदिन उपवासाच्या दिनचर्येत सहज समाविष्ट करता येतील अशा साध्या आणि नैसर्गिक पदार्थांवर भर दिला आहे.

आवळ्याचे सरबत
व्हिटॅमिन सी ने भरपूर असलेला आवळा हे पोषणाचे पॉवरहाऊस आहे. इफ्तार किंवा सुहूरमध्ये आवळ्याचे सरबत पिण्याचे अनेक फायदे आहेत. प्रथम, प्रदीर्घ उपवासामुळे श्वासाला येणारी दुर्गंधी रोखण्यासाठी याची मदत होते. दुसरे म्हणजे, आवळ्यातील व्हिटॅमिन सी हिरड्यांचे आरोग्य चांगले राखते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तिसरे म्हणजे, हे शरीरात लोह शोषून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरते, ज्यामुळे ऊर्जा टिकून राहते आणि थकवा येत नाही. आहारात आवळ्याचा समावेश केल्याने शरीर ताजेतवाने राहते आणि दीर्घकाळ उपवास करताना आरोग्याला आधार मिळतो.

दही किंवा ताक
दही आणि ताक पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पोटाला शांत ठेवण्यासाठी उत्तम आहेत. खजुरासोबत दही किंवा ताकाचे सेवन केल्याने शरीराचे तापमान कमी होते, पचनास मदत होते आणि दिवसभराच्या उपवासानंतर हलके वाटते. चवीसाठी आणि अधिक फायद्यांसाठी खजुराचे रायते किंवा दह्यात ताजे भाजलेले जिरे टाकून सेवन करता येते. यामुळे केवळ पचनच सुधारत नाही, तर आवश्यक पोषक तत्वांची पूर्तता होऊन हायड्रेशन राखले जाते. यामुळे दिवसभर उत्साही वाटण्यास मदत होते.

वरियाळी किंवा सोप
वरियाळी तिच्या थंड गुणधर्मांसाठी आणि गॅस, पोट फुगणे तसेच ॲसिडिटी कमी करण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. वरियाळीचे सरबत करून किंवा थोड्या खडीसाखरेसोबत ती चावून खाता येते. वरियाळी नैसर्गिक कुलंट म्हणून काम करते, ज्यामुळे उपवासाच्या काळात शरीर शांत आणि आरामदायी राहते. वरियाळीच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुरळीत राहते आणि जडपणा जाणवत नाही. परिणामी शरीर हलके आणि सक्रिय राहण्यास मदत होते.

आवळ्याचे सरबत, खजुरासोबत दही आणि वरियाळी यांचा समावेश केल्यास उपवासाचा अनुभव अधिक सुखद होऊ शकतो. हे पदार्थ केवळ ऊर्जा देत नाहीत, तर पचनाचे आरोग्य राखतात, पोट फुगणे टाळतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. उपवास हा आध्यात्मिक प्रवास असला तरी, शरीराचे योग्य पोषण केल्याने थकवा किंवा अशक्तपणा न जाणवता हा पवित्र महिना पूर्ण करता येतो.

ऋजुता दिवेकर या ख्यातनाम पोषणतज्ज्ञ आणि लेखिका असून त्या दिग्गज व्यक्तींना आहाराबाबत सल्ला देतात. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करीना कपूर खान यांच्याही त्या सल्लागार आहेत.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter