हज किंवा उमराहसाठी सौदी अरेबियाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अनेक महत्त्वपूर्ण सुरक्षा नियम लागू करण्यात आले आहेत. यात्रेकरूंचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ व्हावा यासाठी हे बदल करण्यात आले असून, व्हिसा प्रक्रियेपासून ते विमान प्रवासापर्यंतच्या नियमांचा यात समावेश आहे.
व्हिसासाठी बुकिंग अनिवार्य
सौदी अरेबियाच्या नव्या नियमांनुसार, आता उमराह व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वीच प्रवाशांना हॉटेल आणि स्थानिक वाहतुकीचे बुकिंग करणे बंधनकारक असेल. फसव्या हॉटेल ऑफर्सना आळा घालणे आणि यात्रेकरूंचा प्रवास अधिक सुनियोजित करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. 'नुसुक' (Nusuk) या अधिकृत प्लॅटफॉर्मवरून किंवा परवानाधारक ट्रॅव्हल एजंटमार्फतच हे बुकिंग करावे लागेल, अन्यथा व्हिसा मिळण्यास अडचणी येऊ शकतात.
विमानात पॉवर बँक वापरावर बंदी
यासोबतच, विमान प्रवासादरम्यानच्या सुरक्षेसाठी पॉवर बँक (पोर्टेबल चार्जर) वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. प्रवासी पॉवर बँक फक्त हँड बॅगेजमध्ये घेऊन जाऊ शकतील, पण विमानात मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज करण्यासाठी त्याचा वापर करता येणार नाही. लिथियम बॅटरीमुळे विमानात आग लागण्याचा किंवा स्फोट होण्याचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एमिरेट्स एअरलाईनने या नियमाची अंमलबजावणी सुरू केली असून, प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक आसनावर चार्जिंग पोर्ट उपलब्ध करून दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनांनी (IATA) देखील लिथियम बॅटरीच्या धोक्यांबाबत इशारा दिला होता. त्यामुळे, आता इतर आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सदेखील लवकरच असे कठोर नियम लागू करण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी प्रत्येक एअरलाईनच्या नियमांची माहिती घेऊनच प्रवासाची तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -